‘तुम्हाला या देशात राहायचं असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त एकच मूल जन्माला घालता येईल. या नियमाचं कोणीही उल्लंघन केलं, तर त्याला आर्थिक दंड तर होईलच, पण त्याला तुरुंगाची हवाही खावी लागेल, शिवाय इतर अनेक फायद्यांपासून त्याला वंचित राहावं लागेल..’ - आपल्या देशाची लोकसंख्या झपाट्यानं वाढते आहे, हे पाहून चीननं काही वर्षांपूर्वी हा कायदा सक्तीनं लागू केला होता. १९८० ते २०१५ या काळात चीननं अतिशय कठोरपणे या कायद्याची अंमलबजावणी केली आणि आपल्या देशाची लोकसंख्या आश्चर्यकारकरित्या ‘कमी’ केली. तेच कारण आहे, ज्यामुळे आज चीनची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे आणि भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.!
ज्या सक्तीनं आणि कठोरपणे आपण ‘एकच मूल’ पॉलिसी राबवतो आहोत, त्याचे भविष्यात काय परिणाम होतील, हे चीनला तेव्हा माहीत नव्हतं. मात्र त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. जपाननंतर चीनचीही ओळख आता ‘म्हाताऱ्यांचा देश’ म्हणून होते आहे. त्यामुळे आपल्या देशातील तरुणांची संख्या वाढावी, यासाठी चीन अक्षरश: युद्धपातळीवर कामाला लागला आहे. जणू काही तरुणांनी मुलं जन्माला घालावीत, हेच या देशाचं प्रमुख उद्दिष्ट असावं, अशा ध्येयानं चीन सरकार झपाटलं आहे. यासाठी दर काही दिवसांनी चीन नवनव्या योजनांचा रतीब घालत आहे. चीननं नुकतीच एक नवी योजना आणली आहे. या योजनेद्वारे ज्या महिला मुलं जन्माला घालतील, त्यांना आता दर मुलामागे भरभक्कम पैसेही दिले जाणार आहेत.
एकच मूल धोरणामुळे चीनचे हात इतके पोळले आहेत, की आता लोकांनाच मूल नको आहे. चीन सरकार सोयी, सवलती आणि पैशांचे पेटारे घेऊन देशातल्या तरुणाईमागे धावत त्यांची विनवणी करीत आहे, पाहिजे ते घ्या, काय हवं ते सांगा, पण तुम्ही मुलं जन्माला घाला..! तरुणाई मात्र त्यापासून आणखी दूर दूर पळते आहे. चीनमधील बऱ्याच तरुण-तरुणींना तर आता लग्नच करायचं नाही. ज्यांनी लग्न केलंय, त्यांना मूल जन्माला घालायचं नाहीए. चीनमध्ये आधीच मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या खूप कमी झाली आहे. लग्नासाठी कोणी मुलगी तयार झालीच, तर नवऱ्या मुलाला तिला मोठा ‘हुंडा’ द्यावा लागतो. त्यामुळेही ज्या मुलांची लग्नाची इच्छा आहे, त्यांनाही पैशाअभावी मुलगी मिळत नाही. त्यासाठी आता सरकारनं लग्नासाठी मुलींना खैरात वाटतानाच देशातील हुंडा पद्धत रद्द करण्याचाही विडा उचलला आहे. लग्न आणि मूल जन्माला घालण्यासंदर्भात पूर्वापार चालत आलेल्या प्रथा, रूढी-परंपरांनाही आता ठेचून काढलं जात आहे. या सगळ्याच रूढी, परंपरा आता नव्या कायद्यानं बंद होतील.
या प्रकरणी सरकारनं अजून तरी नरमाईचं धोरण स्वीकारलेलं आहे. तरुणांनी लग्नं करावीत आणि मुलं जन्माला घालावीत, यासाठी चीन सरकार त्यांच्या विनवण्या करत आहे, पण जाणकारांचं म्हणणं आहे की, चीनचे ‘सत्ताधारी’ अजून काही काळ वाट पाहातील, नाही तर ते बळजबरीनं मुला-मुलींची लग्नं लावून देतील आणि जणू काही सक्तीनंच त्यांना मूलही जन्माला घालायला लावतील!
चीननं आपल्या या नव्या पॉलिसीला ‘न्यू एरा मॅरेज पॉलिसी’ असं नाव दिलं आहे. देशातल्या बड्या २० शहरांमध्ये ही पॉलिसी सुरूही झाली आहे. मात्र नव्या पॉलिसीलाही तरुणाई वाटाण्याच्या अक्षताच लावील, असा जाणकारांचा अंदाज आहे. तरुणाईनं मुलं जन्माला घालावीत, यासाठी अक्षरश: हातघाईवर आलेल्या चीन सरकारनं तरुण जोडप्यांना टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात सवलत, मुलांच्या पालनपोषणासाठी पालकांना मोठ्या प्रमाणात पैसा, त्यांना नोकरीत पगारवाढ, नवरा आणि बायको वेगवेगळ्या शहरांत नोकरीला असतील, तर त्यांच्या एकत्रिकरणाची सोय, मुलांना शाळेमध्ये मोफत प्रवेश, करिअरच्या अधिक संधी, घटस्फोटाला जवळपास बंदी, मूल तुम्हाला वाढवायचं नसेल, तर तेही आम्हीच वाढवू... अशा अनेकानेक साेयी आणि संधींची बरसात चीन सरकार तरुणांवर करीत आहे.
तरुणींना भीती करिअर, दुजाभावाची!चीनमध्ये महिलांना आजवर कधीच आपली अंडबीजं फ्रीज करण्याची, संरक्षित करून ठेवण्याची सोय नव्हती, पण महिलांनी आपली अंडबीजं संरक्षित करून ठेवली म्हणजे भविष्यात का होईना, त्या मूल जन्माला घालतील म्हणून त्यालाही आता परवानगी मिळणार आहे. पण तरीही तरुणाई या साऱ्या सुविधांना आणि पैशाला अजून तरी भुललेली नाही. तरुणींना लग्नामुळे आपलं करिअर संपेल, याची सर्वाधिक भीती वाटते. याशिवाय चीनमध्ये अजूनही महिलांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यम भूमिकेत राहावं लागतं, हेही एक कारण आहेच!