- संदीप प्रधानमध्यरात्री प्रबोधिनीच्या कॉन्फरन्स रुममध्ये लगबग सुरू होती. अर्थमंत्री अरुण जेटली, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थसचिव, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर वगैरे जमले होते. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रेझेंटेशनला सुरुवात केली. मित्रो, पुढील वर्षी निवडणुका आहेत आणि आपण पाच वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून सर्वे, जनमत चाचण्या करून घेतल्या आहेत. सरकारची लोकप्रियता उतरणीला लागली आहे हे तर स्पष्ट दिसतेच. मात्र त्यामध्ये वेगवेगळी कारणे आहेत. काश्मीरमधील वाढता दहशतवाद, अशांतता वगैरेमुळे आपल्या ‘राष्ट्रवादा’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. लागलीच आपण तेथील सरकार खाली खेचले. याखेरीज रोजगार, नोटाबंदी, जीएसटी वगैरे कारणांमुळे लोकप्रियता घटण्यास हातभार लागला आहेच. परंतु एक कारण सर्वाधिक गंभीर असून त्यावर सर्व सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी बोट ठेवले आहे. ते अर्थात लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याच्या वचनाचे. सुरुवातीला आपण असे वचन दिले नसल्याचे बोललो. त्यानंतर तो ‘चुनावी जुमला’ असल्याचे सांगत वचन दिल्याची कबुलीच दिली. १५ लाखांच्या आशेवर अनेक महिला, मुली, युवक बसले होते. त्यांची स्वप्ने भंगल्याचे निष्कर्ष आपण आपल्या स्वयंसेवकांकडून देशभरात करून घेतलेल्या इंडिपेंडन्ट सर्वेक्षणातूनही दृगोच्चर झाले आहेत. त्यामुळे आता एक खास योजना आपण राबवणार आहोत. आपल्या योजनेला आपण अगोदर नाव ठेवतो. त्यानुसार या योजनेचे नाव ‘असतील तर मिळतील’ (एटीएम) हे आहे. नाशिकमधील एका एटीएम सेंटरमधून पाचपट पैसे बाहेर आले तो अपघात नसून या योजनेची ट्रायलहोती, सहस्रबुद्धे हसत बोलत होते. त्याकरिताचा दिवस ठरला आहे. देशभरातील एटीएममधून अचानक पाचपट पैसे बाहेर येतील. एकावेळी जास्तीत जास्त २० हजार म्हणजे एका व्यक्तीला एक लाख रुपये मिळतील. त्याच व्यक्तीला पुन्हा कुठल्याही एटीएममध्ये आपले तेच कार्ड वापरता येणार नाही. नोटाबंदीवेळी होत्या तेवढ्याच म्हणजे १७.८२ लाख कोटींच्या नोटा सध्या उपलब्ध आहेत. मात्र या योजनेकरिता अतिरिक्त नोटांची छपाई सुरू केली आहे. सर्वसाधारणपणे सरासरी प्रत्येकाने ५ ते ७ हजार रुपये विथड्रॉ केले तर त्याला २५ ते ३५ हजार रुपये द्यावे लागतील. याकरिता नोटांची वाहतूक करणाºया किमान सव्वा लाख अतिरिक्त व्हॅन, लाखभर कर्मचारी वगैरे देशभर लागतील. निर्णय करून बैठक संपली... ठरलेल्या दिवशी देशभर एटीएमसमोर रांगा लागल्या...पंतप्रधानांनी टिष्ट्वट केले : चार वर्षे देशाने ‘मन की बात’ ऐकली आज ‘धन की बात’ होत आहे.जाणते राजे शरद पवारांचे टिष्ट्वट : पंतप्रधान आजही अनेक बाबतीत माझाच सल्ला घेतात.खा. संजय राऊतांचे टिष्ट्वट : हा दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार असून जनता त्याला भुलणार नाही. स्वबळावर आम्ही ठाम आहोत.मिलिंद नार्वेकर तातडीने ‘मातोश्री’वर गेले आणि उद्धव ठाकरेंना म्हणाले की, आठवले, ठाकरे, मोदी (एटीएम)ला आता पर्याय नाही.
असतील तर मिळतील (एटीएम)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:55 AM