- डॉ. राजेंद्र बर्वे(ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ)
कोलकाता, बदलापूर, उरण.. अशा कित्येक दुर्घटनांचा आक्रोश, जनक्षोभ आणि आंदोलनांच्या बातम्यांचा आगडोंब उसळतो आहे. भयावह, संताप आणणारे, उद्विग्न आणि हताश करणारे हे वास्तव आपण जगतो आहोत. मनोविकारतज्ज्ञ म्हणून निराश मन:स्थितीतल्या स्त्रियांशी बोलताना एक प्रश्न विचारायला क्षणभर तरी माझी जीभ चाचरते. तो प्रश्न विचारल्यानंतर अनेक क्षण शांतता पसरते. विशीतली तरुणी असो की, सत्तरीतली वृद्धा; समोरची स्त्री गप्पच. मग थोड्या वेळाने बांध फुटतो. खूप अश्रू आणि हुंदके, नि:श्वास आणि तळतळाट..
मनात कोंबून ठेवलेले तपशील बाहेर पडतात. (बहुतेक) एकटी घरात किंवा परिसरात, परिचित किंवा नात्यातलीच व्यक्ती.. भाऊ, काका, मामा, पाहुणा, कधी तर वडिलांनीच केलेला अतिप्रसंग.. नुसतेच तोंड दाबून केलेले चाळे, कधी अंगाची घुसळण, कधी प्रत्यक्ष संभोग, कधी अनैसर्गिक संभोग आणि त्यानंतर बदललेले नातेसंबंध, मनाची घुसमट, कुशीत डोके खुपसून रडणे, आत्महत्येचे विचार, प्रचंड भीती, एकटेपणाचा भयगंड, नजर वर करून बघण्याची धास्ती. कधीच बऱ्या न झालेल्या या जखमा आणि जखमी करणाऱ्या माणसाविषयीचा तिरस्कार, लैंगिक संबंधाविषयी तिटकारा, पुरुषांबद्दल आणि जगाबद्दलच दाटून आलेल्या संशयाने घेरलेले मन. स्वतःच्या शरीराची शिसारी. प्रौढ वयात वैवाहिक संबंधानंतर होणाऱ्या लैंगिक संबंधाविषयी प्रचंड गोंधळ, कधी एकदा हे नष्टकर्म संपून मोकळा श्वास घेईन, अशी प्रबळ इच्छा.
स्त्रियांच्या पूर्वेतिहासात दडलेले हे वास्तव हा जागतिक अनुभव आहे. याखेरीज वैवाहिक जीवनातली लैंगिक घुसमट. त्याबद्दल तर बोलायचीही चोरी. सामाजिक आक्रोशात न उमटणारे हे उसासे. ते ऐकू येत नाहीत. ही आहे आपली कौटुंबिक स्थिती! ‘पूर्वी नव्हतं हो असं!’- म्हणणाऱ्यांना विचारा, कोणत्या आंधळ्या, बहिऱ्या जगात वावरता हो तुम्ही? पूर्वी तर अशा लंपट पुरुषांना घरातच आयत्या स्त्रिया मिळायच्या. परित्यक्ता, विधवा वहिनी, नाहीतर आश्रित म्हणून आलेली मेव्हणी, भाची, पुतणी, शेजारीण, स्वयंपाकीण, कोणीही!!’ आता हे थांबायला पाहिजे. बलात्कार करणाऱ्याला फाशी द्या, त्याची धिंड काढा; पण घराघरांतले हे अत्याचार चव्हाट्यावर कसे येणार?
अखेर, या सगळ्या समस्यांचं उत्तर कौटुंबिक नातेसंबंध, आई-मुलीचं नातं, विश्वास आणि मोकळा संवाद यातच आहे, हे नक्की! पण हा संवादच घडत नाही नीट मोकळेपणाने. कारण आपल्या मुला-मुलींशी संवाद कसा करावा? त्यांच्याशी काय बोलावं? प्रसंग आलाच तर कसा धीर द्यावा? सोबत कशी करावी? संवाद करताना टीकेचे धारदार शब्द कसे टाळावेत? तिरकस बोलण्यातून कसे बोचकारू नये? - याची समज पालकांना दुर्दैवाने नाही. त्यांना विचारता येतं; पण आपल्या मुला-मुलींची नीट विचारपूस करता येत नाही. या विषयावर बोलायचा धीरच होत नसेल आणि कदाचित अशा लैंगिक शोषणाला त्या मुलीची आईच बळी पडली असेल तर? तीच संभ्रमित आणि दुखावलेली असेल तर? - असेलही! नक्कीच. जनजागृती, कायद्यात बदल हे तर हवेच; पण आता नागरिक म्हणून आपली कुटुंबं जागी व्हायला हवीत. शाळा-कॉलेजात, कामाच्या ठिकाणी समुपदेशकांची उपलब्धता असावी. पीडित मुला-मुलींशी मोकळेपणानं बोलणाऱ्या एजन्सी असाव्यात.
पण आपल्या मुला-मुलींशी बोलावं कसं? १) संवादाकरिता पुरेसा अवकाश आणि खासगीपणा मिळेल याची खात्री करावी. वेळ आणि इतर गोष्टी (मोबाइल, घरगुती कामं) बाजूला साराव्यात. २) शांतपणे आपलं निवेदन करावं. म्हणजे गेले काही दिवस तुझ्यात बदल दिसतोय, तुझं लक्ष नाहीय, बावरलेली दिसते/दिसतो आहेस, असं...३) झाल्या गोष्टींविषयी शांतपणे बोलावं. बोलू द्यावं. असं कसं घडलं? का घडलं? खोटं बोलू नको, कोणावरही आरोप करू नकोस!- अशी दटावणी नकोच.४) तुझ्यावर माझा विश्वास आणि प्रेम आहे, याची खात्री स्पर्शाने आणि कृतीनेही द्यावी. हे एकदा सांगून पुन्हा-पुन्हा न सांगता शांतपणे वाट पाहावी. आपलंच मूल आहे, आपणच त्याच्या सर्वाधिक जवळचे आहोत, हे लक्षात घेऊन अवसर आणि अवकाश द्यावा.हा संवाद सहज, शांतपणे व्हावा. दबलेली कुजबुज नको. राग, चिडचिड नको. तुम्ही ऐकलंत, ऐकून घेतलंत, तर मुलं-मुली बोलतात! पालक हे सर्वांत उत्तम मानसोपचारक असू शकतात, हे विसरू नका.
(संदर्भ : ‘राही’ ही संस्था आणि विक्रम पटेल यांच्या गोव्यामधील पाहणीचे अहवाल)