-ऋषिराज तायडे
मुद्द्याची गोष्ट : सोशल मीडियावर तुम्हाला अचानक तुमचीच आक्षेपार्ह चित्रफीत व्हायरल झाल्याचे दिसले तर... एवढेच नव्हे, तर त्या माध्यमातून तुम्हाला खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला तर... सध्या चर्चेत असलेल्या डीपफेक तंत्रज्ञानाचा त्यासाठीच सर्रास वापर केला जात आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या नावाने नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओही त्याचाच प्रकार होता. जाणून घेऊ या. काय असतो हा प्रकार...
कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रोग्रामिंग अल्गोरिदमचा वापर करत डीपफेक प्रणालीमध्ये एखाद्या व्यक्तीचे असंख्य फोटो, व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यावर प्रोसेसिंग केल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरावर जोडले जातात. या तंत्रज्ञानाची किमया इतकी खास आहे, की संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्वचेचा रंग, चेहऱ्यावरील डाग किंवा सुरकुत्या, एवढेच नव्हे बोलताना चेहऱ्याची होणारी हालचाल अगदी हुबेहूब तयार केली जाते. आतापर्यंत केवळ चेहऱ्याची केलेली अदलाबदल ही सहजपणे लक्षात येत होती; मात्र डीपफेक तंत्रज्ञानामुळे चेहरा तर सहजपणे बदलला जातोच, पण त्याच्या शरीराच्या आकृतीतदेखील बदल केला जातो आणि ते सहजासहजी ओळखताही येत नाही.
किती आहे धोका?
डीपफेक तंत्रज्ञानाचा सर्वाधिक धोका आहे तो कायदा, माध्यम व राजकीय क्षेत्राला. एखाद्या खटल्यात पक्षकारांकडून पुरावा म्हणून सादर केलेले व्हिडीओ डीपफेकद्वारे तयार केल्यास थेट न्यायव्यवस्थेचीच फसवणूक केली जाऊ शकते.राजकीय नेते तर या तंत्रज्ञानाला सहज बळी पडू शकतात, कारण त्यांची अनेक भाषणे, छायाचित्रे इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. त्याचाच वापर करून एखाद्या नेत्याची उणी-दुणी काढायची असल्यास त्याचा बनावट व्हिडिओ सहजपणे बनवता येतो. सध्या मर्यादित लोकांच्या हाती असलेले हे तंत्रज्ञान जर सर्वसामान्यांच्या हाती लागले तर काय होईल? जेवढी ऊर्जा हे तंत्रज्ञान तयार करायला खर्ची घातली, तेवढीच ऊर्जा डीपफेक तंत्राने तयार केलेल्या चित्रफीत ओळखण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे याचा गैरवापर अधिक झाल्यास धोका अधिक आहे.
स्वतः कशी काळजी घ्याल? सोशल मीडियावर खासगी फोटो-व्हिडीओ शेअर करू नये.सोशल मीडिया अकाऊंटचा पासवर्ड सुरक्षित ठेवणे.सुरक्षित अँटिव्हायरसचा वापर करणे.फोटो व व्हिडीओला वॉटरमार्क करणे.
कसा ओळखणार डीपफेक व्हिडीओ?
व्हिडीओत चेहऱ्याचे हावभाव व आवाजात गडबड असणेव्यक्तीचा आवाज आणि त्याच्या लिपसिंकमध्ये गोंधळव्हिडीओमध्ये वारंवार पॉज आणि डिस्टर्बन्स दिसतो.