‘आपण एक आंतरराष्ट्रीय व्यापारी आहोत, व्यापारासाठी वारंवार परदेशी जात असतो, तसेच आताही परदेशी आहोत, आपण पळपुटे नाही व भारतातील कायद्यावर आपला पूर्ण विश्वास आहे’ अशा अर्थाचे ट्विट करुन देशातील मद्यसम्राट (माजी?) विजय मल्ल्या यांनी त्यांचे निरपराधित्व सिद्ध करुन दाखविण्याचा लटका प्रयत्न केला आहे. गेल्या दोन तारखेस त्यांनी परदेशगमन केले आणि त्याची खबर केन्द्रीय गुप्तचर विभागाला होती असे आता उघडकीस आले असल्याने त्यांच्या या कथनावर बाकी कोणाचा जरी नाही तरी सरकारचा विश्वास बसायला हरकत नाही. याच ट्विटमध्ये मल्ल्या यांनी माध्यमांवर बऱ्यापैकी दुगाण्या झाडल्या असून आपण वेळोवेळी त्यांना जे उपकृत केले त्याची आठवण न ठेवता ते आपल्याविरुद्ध मीडिया ट्रायल चालवित असल्याबद्दल बरीच आदळआपटही केली आहे. त्याचबरोबर आपण आपली संपत्ती जाहीर करावी या माध्यमांच्या मागणीची रेवडी उडविताना ज्या बँकांनी आपल्याला कर्ज दिले त्यांच्याकडे ही सर्व माहिती उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. पण त्यांचा हा दावा स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी साफ धुडकावून लावीत मल्ल्यांनी त्यांच्या मालमत्तेचे विवरण द्यावे अशीच जाहीर मागणी केली आहे. थकित कर्ज वसूल करण्यासाठी गोव्यात असलेले मल्ल्या यांचे एक निवासस्थान आपल्या बँकेने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही असे म्हणताना भट्टाचार्य यांनी अप्रत्यक्षरीत्या संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. याचा अर्थ केवळ माध्यमेच नव्हे तर सरकारी यंत्रणाही मल्ल्यांनी ओशाळी करुन ठेवल्याचे यातून ध्वनित होते. बिचाऱ्या राजकारण्यांना मात्र मल्ल्यांनी सूट दिलेली दिसते.
मी ‘पळपुटा’ नाही!
By admin | Published: March 12, 2016 3:43 AM