‘फेअर’ म्हणजे गोरा की नि:पक्षपातीपणे वागणारा? अर्थ ज्याचा त्याने काढायचा आहे. दिसण्याचा आणि बुद्धिमत्तेचा संबंधच नाही; पण शेवटी या दिसण्यालाच भावनेची जोड देत व्यापार केला जातो. नाव बदलण्याची वेळदेखील नेमकी हीच कशी असते..? पुढच्या पिढीचा व्यवहार दिसण्यावरच जास्त होईल, असे ६२ वर्षांपूर्वी ग. दि. माडगूळकरांना कळाले असावे. त्यामुळेच त्यांनी- ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक’ हे गाणे लिहिले असावे. गदिमांवर सुंदर आणि कुरूपतेचा संस्कार ‘पी हळद हो गोरी’ अशा म्हणींनी केला असावा असे वाटेलही; पण गदिमां थोडेच म्हणींवर विसंबून बसले? स्वत:चे रूपडे न पाहणाऱ्या त्या कुरूप पिलास त्यांनी पाण्यात चोरून पाहायला लावलेच..! आणि काय आश्चर्य,‘एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले,भय वेड पार त्याचे, वा-यासवे पळाले,पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक,त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक..!’जे गदिमांना तेव्हा कळाले ते अजून आम्हाला उमजलेदेखील नाही. त्यामुळेच तर ‘फेअर’ नसणारे स्वत:ला गोरेगोमटे समजू लागले आणि ‘लव्हली’ नसणारे स्वत:ला ‘फेअर’ समजू लागले. आता कोणी म्हणेल की याच गदिमांनी-‘गोरी-गोरी पान, फुलांसारखी छान,दादा मला एक वहिनी आण...’हे गीत लिहिलं ना; पण ते बालगीत होतं. बालकांच्या कल्पनाशक्तीला साजेसं होतं. आपण मात्र समाज म्हणून पुन्हा पुन्हा ‘गोरी-गोरी पान’मध्ये अडकत जातो आणि अजूनही आपण बालबुद्धीतच आहोत हे सिद्ध करत राहतो. आपल्याला संधी मिळूनही आपण बालबुद्धीच्या पलीकडे जात नाही. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर जगात वांशिक रूढीबद्धतेविरुद्ध आवाज उठताना जागतिक पातळीवरच्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने सहानुभूतीची गुंतवणूक करत आपले ‘प्रॉडक्ट’ नव्याने विकण्यास काढले. यातच सगळे काही आले. चर्चा सुरू झाली ती ‘फेअर अॅण्ड ‘लव्हली’ या ब्रँड नेममधून ‘फेअर’ शब्द काढण्याच्या निर्णयामुळे. वंशवादविरोधी चळवळीचा आणि नाव बदलण्याचा काहीही संबंध नाही, आम्ही ब्रँडच्या उत्क्रांतीवर अनेक वर्षांपासून काम करत आहोत, असे कंपनी सांगते, मात्र वंशवादाविरोधी चळवळ वेगात असतानाच नाव बदलण्याचा निर्णय घेते. त्यामुळे कंपनीची प्रतिमा ‘फेअर’ होईल आणि प्रॉडक्ट ‘लव्हली’ वाटेलही. मुळात ‘फेअर अॅण्ड लव्हली’ हे फक्त प्रॉडक्टचे नाव नाही.
कंपनीची प्रतिमा ‘फेअर’ होईल आणि प्रॉडक्ट ‘लव्हली’ वाटेलही; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 3:05 AM