भगवान बुद्ध आणि ख्रिस्त यांच्या रांगेत जाऊन बसलेल्या राष्ट्रपिता म. गांधींची आज दीडशेवी जयंती आहे आणि ती जगभर साजरी होत आहे. गांधींजींवर गेल्या शंभर वर्षांत एक लाखांवर पुस्तके लिहिली गेली व तेवढ्याच पुस्तकात त्यांचे संदर्भ आले आहेत. गांधीजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचेच केवळ नेते नव्हते. साºया जगात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करणारे व त्यासाठी नि:शस्त्र माणसांना संघटित होण्याचा मार्ग दाखविणारे द्रष्टे महापुरुष होते. सामान्य माणूस शस्त्र घेऊन लढू शकत नाही. मात्र त्याची सहनशक्ती मोठी असते. गांधींनी या सहनशक्तीचे संघटन करून त्यातून अहिंसा व सत्याग्रह या दोन नव्या व अभिनव शस्त्रांची निर्मिती केली. हे शस्त्र एवढे प्रभावी व शक्तिशाली होते की त्यापुढे ज्या साम्राज्यावरून कधी सूर्य मावळत नव्हता ते ब्रिटिश साम्राज्य पराभूत झाले. परिणामी एकटा भारतच स्वतंत्र झाला नाही. ब्रह्मदेश, श्रीलंका, दक्षिण आशियातील व आफ्रिकेतील अनेक देशही तेव्हा स्वतंत्र झाले. त्यांच्याच प्रेरणेने नेल्सन मंडेलांना दक्षिण आफ्रिकेत स्वकीयांची सत्ता आणता आली व मार्टिन ल्युथर किंगला त्याचा वर्णविद्वेषविरोधी लढ्याच्या प्रेरणा दिल्या.अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा त्याचमुळे भारताच्या संसदेत भाषण करताना म्हणाले ‘तुमच्या देशात गांधी जन्माला आला नसता तर मी अमेरिकेचा अध्यक्ष कधी झालो नसतो’ त्याआधी आइन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ म्हणाला ‘गांधी नावाचा हाडामांसाचा माणूस कधी काळी या पृथ्वीतळावर आपली पावले उमटवून गेला यावर उद्याच्या पिढ्या कदाचित विश्वास ठेवणार नाहीत.’ त्यांच्या लढ्याने समाज बदलले, लोकांच्या वृत्ती बदलल्या व स्वत:पुरता विचार करणारी माणसे देश आणि समाज यांचा विचार करून त्यांच्या उत्थानात सहभागी होऊ लागली. राजा, सेनापती, धर्मसंस्थापक वा सत्ताधारी नसलेल्या एका सामान्य माणसाची ही असामान्य किमया होती. गांधीजी केवळ स्वातंत्र्य लढ्याचे नेते नव्हते. सामाजिक उत्थानाचे, दलितांच्या उद्धाराचे, सफाई कामगारांच्या कल्याणाचे, स्त्रियांच्या सबलीकरणाचे, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे, राष्ट्रीय एकात्मतेचे व साºया जगात मनुष्यधर्माचा स्वीकार होऊन जगाचे ऐक्य घडून यावे यासाठी होणाºया प्रयत्नांचे व प्रवाहांचे ते नेते होते. सारे जग आज अणुशक्तीच्या ज्वालामुखीवर वसले आहे. तिचा स्फोट झाला तर या जगात कुणीही व काहीही शिल्लक राहणार नाही. जगभरच्या हुकूमशाह्या जाव्या, साम्राज्य संपावी, युद्धांचा शेवट व्हावा, त्याचवेळी माणसातील उच्च-नीच भाव जावा, माणूस जात एका समान पातळीवर यावी, तिच्यात सुखसंवाद उत्पन्न व्हावा, अभाव संपावे आणि जगच त्यातल्या अखेरच्या माणसासह समृद्ध व्हावे हा त्यांचा ध्यास होता. गांधीजी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवीत. मात्र हिंदू धर्मातील अनिष्टांवर त्यांचा रोष होता. त्याला जडलेला अस्पृश्यतेचा कलंक जावा, त्याचे जातीपंथातले विभाजन जावे आणि त्याला त्याच्या मूळ वैश्विक व मनुष्यधर्माचे रूप प्राप्त व्हावे ही त्यांची तळमळ होती. त्याचवेळी त्यांचा अन्य धर्मांवर राग नव्हता. सगळे धर्म शेवटी एकाच सत्प्रवृत्तीची आराधना करतात असे ते म्हणत. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ किंवा त्यांच्या इतर प्रार्थना सर्व धर्मांमधील श्रद्धांचा व मूल्यांचा गौरव करणाºया होत्या. माणूस मुक्त असावा, त्याला कोणत्याही धर्माच्या, विचाराच्या, वादाच्या वा भूमिकेच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न करू नये, अशी त्यांची धारणा होती.त्याचमुळे धर्मांध, जात्यंध व विचारांध प्रवाहांचा व व्यक्तींचा त्यांच्यावर रोष होता. ज्यांचे राजकारण केवळ एकारलेपणावर अवलंबून उभे होते त्यांना गांधींचा सर्वधर्मसमभाव व देशाचा सर्वसमावेशक विचार आवडणाराही नव्हता. अशाच एकारलेल्या विचाराने वेडे झालेल्या माथेफिरूने त्यांच्यावर त्यांच्या वृद्धापकाळी तीन गोळ्या झाडून त्यांचा खून केला. मात्र त्याने गांधी संपले नाहीत. त्यांचा देह अनंतात विलीन झाला असला तरी त्यांचा विचार साºया विश्वाने स्वीकारला. भारताचे गांधी जगाचे झाले. आज साºया जगाने अहिंसेची आराधना चालविली आहे. त्यासाठी जागतिक संस्था व संघटना स्थापन झाल्या आहेत. युद्धविरोधी व अण्वस्त्रविरोधी आंदोलने जगात उभी झाली आहेत. मात्र जोवर माणसाच्या मनातले एकारलेपण व अहंता संपत नाहीत तोवर जागतिक शांतता ही स्थापन व्हायची नाही. त्यासाठी एका गांधीचे जगणे व मरणे पुरेसे नाही. गांधींच्या मारेकऱ्यांचे वारसदार अजून जगात व भारतात आहेत. शांतताप्रेमी, समतावादी, पुरोगामी व आधुनिक विचारांच्या माणसांच्या हत्या करणे त्यांनी अजून थांबविले नाही. त्यांच्यातल्या काहींचा वेडसरपणा असा की त्यातल्या काहींनी अलीकडेच गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून त्याचाही आनंद साजरा केला. जो साºया जगाची चिंता करतो, तो एखाद्या संकुचित विचारांमागे जाणाºयांना नेहमीच अडचणीचा ठरत असतो. म्हणूनच सॉक्रेटिसला विष दिले गेले, येशूला सुळावर चढविण्यात आले, लिंकनची हत्या झाली आणि जगभरच्या साधूसंतांचा छळ झाला. जगाला स्वातंत्र्य हवे असते आणि सगळेच देश त्यासाठी लढत व जिंकत असतात. मात्र जगातले सगळे स्वातंत्र्य लढे शस्त्रांच्या साहाय्याने व रक्तरंजित झालेले जगाने पाहिले. एकट्या भारताचा स्वातंत्र्य लढा रक्त न सांडता केवळ लोकांच्या सहनशक्तीच्या व स्वातंत्र्य प्रेमाच्या, प्रेरणेच्या बळावर यशस्वी झाला. म्हणून जगात गांधी एकच झाला आणि आहे. त्याच्या जवळपास पोहोचणेही मग इतरांना जमले नाही. ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांचे हसे झाले व ते जगाला आपलेही वाटले नाहीत. गांधींचा लढा जगाला व देशाला कायमची प्रेरणा देणारा आहे. तो त्यांच्या मृत्यूने संपला नाही. त्यांच्या विचारांच्या हत्येनेही तो संपायचा नाही. आज भारतात गांधीविरोधी विचाराचे, एकारलेल्या हिंदुत्वाचे, माणसातल्या विषमतेचे व स्त्रियांच्या दुबळीकरणाचे वारे वाहत आहेत. अल्पसंख्याकांच्या हत्या व दलितांचा छळ वाढला आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पुसण्याचा व जनतेला त्याचा विसर पाडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. मात्र असे प्रयत्न याआधीही झाले आणि ते अपयशी झाले. गांधींएवढाच त्यांचा विचार अजरामर आहे.त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या अनुयायांच्या आठवणी जगात आळवल्या जात आहेत. जगाला स्थैर्य व समृद्धी लाभायची असेल आणि त्याला उद्याचा दिवस शांती व समाधानाचा लाभायचा असेल तर त्याला गांधीजींच्याच मार्गाने जावे लागणार आहे. आज त्यांचा विरोध करणारेही हे वास्तव मनोमन समजणारे आहे. अजून जगाचे काही भाग हुकूमशहांच्या टाचेखाली आहेत. जगातला धर्मद्वेष, वर्णद्वेष व उच्च-नीच भाव अजून संपायचा आहे. मात्र हे संपवायचे तर त्याचा मार्ग हा गांधींचाच मार्ग आहे. तो न्यायाचा, नीतीचा, खºया मनुष्यधर्माचा आणि सुख व शांतीचा आहे. माणसे अजूनही प्रामाणिक आहेत. आपण नीतीने जगावे असे अजूनही अनेकांना वाटत आहे. माणसामाणसातील दुरावा जावा अशी ही अनेकांची भावना आहे. जोवर या भावना शिल्लक आहेत तोवर गांधीही आपल्यासोबत राहणार आहेत. त्यामुळे गांधी हे जगाला लाभलेले कायमचे व विश्वासाचे आश्वासन आहे. हा गांधी आपल्या देशात झाला, वाढला व त्याने हा देश एकत्र केला, ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. त्याचे स्वप्न पूर्ण करणे ही देश व समाज यांची आताची जबाबदारी आहे. या प्रयत्नांपासून भरकटलेली माणसे जगाएवढेच आपलेही अकल्याण करून घेणारी आहेत. त्यांचीही सद्बुद्धी जागेल व जगाला चांगल्या आणि नीतीच्या मार्गाने जाण्याची असलेली इच्छा कायम राहील हीच जगाची गांधीजींना वाहिलेली खरी श्रद्धांजली असेल. आज त्यांचे पुण्यस्मरण करताना त्यांचा विचार, आचार व त्यांची समत्वबुद्धी यांचे आपल्या जीवनात आचरण करण्याची प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. खºया भारतीयाचे व खºया मनुष्यधर्माचे तेच खरे रूप आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
महात्मा गांधींच्या विचारांचे अमरत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 6:10 AM