- संतोष देसाईमहाराष्ट्रातील सत्ता गमावणे हा भाजपसाठी मोठाच धक्का होता. ती ज्या पद्धतीने गमावली, ते आणखीनच धक्कादायक होते. त्यांचा सहकारी शिवसेनेने वेगळी चूल मांडण्याचे ठरविल्यावर भाजपने त्या स्थितीला तोंड देण्याचे प्रयत्न केले, पण ते प्रयत्न त्या पक्षावरच उलटले. सत्ता टिकविण्यासाठी त्याने जे प्रयत्न केले, ते संशयास्पद होते. त्यामुळे अगोदरच खालच्या पातळीवर गेलेले राजकारण आणखी रसातळाला गेले. मोदी-शहा हे सर्वश्रेष्ठ आहेत, ते अजेय आहेत, या भावनेला त्यामुळे तडा गेला.
महाराष्ट्रातील सत्ता हातची घालविणे व सत्ता हातून जाण्यामागची कारणे हा खरा प्रश्नच नाही. अलीकडच्या काळात राज्या-राज्यांत पक्षाला ज्या तऱ्हेने अपयशाला तोंड द्यावे लागत आहे, तो त्या पक्षासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्या पक्षाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील सत्ता गमावली. गुजरातमधील सरकार कसेबसे टिकवून ठेवले. कर्नाटक आणि हरयाणात त्या पक्षाला तडजोडी करून सत्ता टिकविता आली. महाराष्ट्रातही निसटता विजय मिळाला होता, पण तोही सहयोगी पक्षामुळे हातचा गमावला. वास्तविक, हरयाणा व महाराष्ट्रात भाजप बहुमताने विजयी होईल, असे वाटत होते, पण त्यांची कामगिरी निराशाजनक ठरली. केंद्रातील सत्ता प्रचंड मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर राज्यातील भाजपची दुर्गती ही कोड्यात टाकणारीच आहे.
विरोधी पक्ष अजूनही सावरलेले नसताना होणारी भाजपची दुरवस्था बुचकळ्यात पाडणारी आहे. काँग्रेस पक्ष अजूनही गर्तेतून बाहेर येऊ शकलेला नाही. गांधी घराण्याच्या प्रभावाखाली तो पक्ष असून, त्याची अवस्था बुडत्या जहाजासारखी झाली आहे. त्या पक्षाकडे केंद्रात नेतृत्वाचा अभाव आहे आणि स्थानिक नेतृत्वाच्या अपयशाने ऱ्हास होत आहे. राज्यात जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांच्याजवळ देण्यासारखे नवे असे काही नाही. शरद पवार हे थकलेले असूनही एकाकी झुंज देताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मतदारांना काही नवीन देतील, ही शक्यता उरलेली नाही. संपूर्ण देशभरातील प्रादेशिक पक्षांची स्थिती याहून वेगळी नाही. एके काळी हे पक्ष उत्साहाने भरलेले होते, त्यांच्यात प्रादेशिक आकांक्षा प्रफुल्लित झाल्या होत्या, पण आता त्यांच्यापाशी कोणत्याही नव्या कल्पना नाहीत, ही त्यांची शोकांतिका आहे.
त्यामुळे सत्तारूढ पक्षासमोर जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, ते त्यांनी स्वत:च निर्माण केलेले आहेत. त्यापैकी प्रमुख आहे, आर्थिक विकासात सुरू असलेली घसरण. अलीकडे जी.डी.पी.चे जे आकडे समोर आले आहेत, ते प्रत्यक्षात येणाऱ्या अनुभवाचीच खात्री करणारे आहेत. सध्या जी मंदी आली आहे, ती समाजातील सामान्य घटकालासुद्धा भेडसावते आहे. नोटाबंदीचा परिणाम घातक ठरला, त्यात भर पडली ती शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटांची. त्यामुळे जी माणसे आपल्या देशाचे आर्थिक इंजिन सुरू राहावे, यासाठी प्रत्यक्ष काम करीत होती, ती प्रभावित झाली आहेत.
कसेही करून निवडणुका जिंकायच्या, या विचाराने भाजपला पछाडले असून, तीच त्या पक्षाची मुख्य समस्या बनली आहे. त्यांना राज्यात जे अपयश येत आहे, त्याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती बळावली आहे. त्याऐवजी अन्य पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात आणून संख्या वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे भाजपच्या मूळ स्वरूपातच परिवर्तन होत आहे. नवे नेते सत्तेच्या लोभापायी पक्षात येत आहेत. जुन्या आर्थिक अपराधाबद्दल शिक्षा होऊ नये, हाही त्यांचा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावानांच्या तोंडचा घास मात्र हिरावला जात आहे. आपल्या पराभवाचे रूपांतर विजयात करण्याच्या हव्यासापायी भविष्यातील आणखी मोठ्या पराभवाचे बीजारोपण आपण करीत आहोत, हे भाजपच्या लक्षातच येत नाही.
महाराष्ट्राच्या अनुभवातून आणखी एक गोष्ट लक्षात येते. ती ही की, या पक्षाला सहकारी पक्षांसोबत जुळवून घेणे अशक्य होत चालले आहे. निवडणूक निकालानंतर शिवसेनेसोबत कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतील, याचा अंदाज पक्षाला यायला हवा होता. आपण बहुमतातच येऊ, या अतिविश्वासाने त्या पक्षाने स्वत:समोर जे प्रश्न उभे केले, त्यातून पक्षाला मार्ग काढता आला असता.
यापुढे दुबळ्या सहयोगी पक्षांना सोबत न घेता आपण स्वबळावर सत्तेत येऊ शकतो, या आत्मविश्वासाने पक्षाने निवडणुकांना सामोरे जाण्याची गरज आहे. तसे न केल्यास जनमानसात चुकीचा संदेश प्रसारित होण्यास मदतच मिळणार आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या शपथविधीमध्ये मराठा सत्तेची प्रतीके पाहावयास मिळाली. स्थानिक शक्ती एकत्र आल्यामुळे निर्माण झालेले सामर्थ्य केंद्रीय सत्तेला महाराष्ट्रात आव्हान निर्माण करू शकले, हेही चित्र त्यातून देशासमोर गेले.
पक्षाचा अजेंडा केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी प्रभावशाली ठरत असला, तरी तो राज्यपातळीवर तेवढा परिणामकारक ठरताना दिसत नाही. झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार येथील निवडणुकीत या पक्षाची क्षमता सिद्ध होणार आहे. आपल्या देशाच्या अर्थकारणाची घसरण अशीच सुरू राहिली आणि पक्षाचा सांस्कृतिक अजेंडा हाच पक्षाला निवडणुकीत यश मिळवून देत राहील, या भ्रमात जर भाजप राहिला, तर त्या पक्षाला भविष्यात आणखी वाईट बातम्यांना तोंड द्यावे लागेल, हे त्या पक्षाने लक्षात घ्यायला हवे.
(लेखक फ्युचर ब्रण्डचे माजी सीईओ आहेत.)