नोकरीवर असलेल्या नोकरदारास कामगार कायद्याची व त्यातून मिळणाऱ्या अधिकाराची माहिती असते तशी आपल्या कर्तव्य व जबाबदारीची जाण असतेच असे नाही. मतस्वातंत्र्याचे वा अभिव्यक्तीचे तसेच काहीसे आहे. बोलताना, लिहिताना व इकडचे संदेश तिकडे धाडतानाही यासंबंधीचे भान बाळगले जात नाही, म्हणूनच अफवांचे बाजार तेजीत येतात व लोकांना हकनाक जीव गमावण्याची वेळ येते. सरकारला सोशल मीडियाला वेसण घालायची वेळ आली आहे तीदेखील त्यामुळेच.
चिथावणीखोर, सामाजिक सलोख्यास बाधा आणणाऱ्या खोट्या संदेशाचे आदान-प्रदान हा अलीकडे दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरू लागला आहे. कारण आलेल्या संदेशाची खातरजमा न करता त्यावर प्रतिक्रिया देण्याची वा अभिव्यक्त होण्याची सवय आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरे म्हणजे, सोशल माध्यमावर आलेला संदेश इकडून उचलून तिकडे फॉरवर्ड करण्यात बहुतेकांचा कल असतो. कारण स्वत: डोकं न लावता अगर संदेश लिखाणाची तसदी न घेता रेडिमेड माहितीचे प्रसारण करून आपली अद्ययावतता दर्शवून देण्याची त्यांची धडपड असते. त्यामुळे सर्वात अगोदर किंवा इतरांच्या पुढे राहण्याच्या प्रयत्नात संदेशाची सत्यता न पडताळता तो पुढे ढकलून देण्याची प्रवृत्ती बळावली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांना सजग होत, चुकीचे किंवा खोटे काय आहे ते तुम्हीच ओळखा हे सांगण्यासाठी मोहीम हाती घ्यावी लागली आहे. पण प्रश्न खरा हाच आहे की, हे दुसऱ्याने कुणी आपणास सांगण्याची मुळात गरज का भासावी? आपलेच आपणास हे का समजू अगर उमजू नये?
प्रत्येकाला आपले स्वत:चे भलेबुरे जसे कळते, तसे समाजासाठी काय चांगले वा तोट्याचे हे का कळत नाही किंवा त्या अंगाने विचार का केला जात नाही, हा यातील प्रश्न आहे. आपल्या सामाजिक जाणिवा तितक्या प्रगल्भ नाहीत, हे त्याचे उत्तर आहे. प्रगत साधनांमुळे माणूस प्रगत झाला, हातात अत्याधुनिक मोबाइल आल्याने जणू जग त्याच्या मुठीत आले; पण या जगात वावरायचे कसे याचे ज्ञान त्याच्या ठायी नाही. शिक्षण घेऊनही सुशिक्षितपणाचा अभाव आढळावा अशी ही स्थिती आहे. विशेष म्हणजे, तरु ण पिढी ही अधिक शिकली, सवरलेली आहे. पण तिच्या सामाजिक जाणिवा खूपच तकलादू असल्याचे दिसून येते. सोशल माध्यमाला सदोदित चिपकून वा बिलगून असणारी मंडळी त्यावरील अंगठेछाप प्रतिसादात अडकून बसते. खोट्या समाधानात स्वत्व हरवून बसलेली ही मंडळी मग विचार न करता दुसºयाच्या हातचे बाहुले होऊन बसते. दुसरीकडून आलेला कसलाही संदेश त्यातील सत्यता पडताळून न पाहता आपल्या संपर्कातील इतरांना पाठवून लोक मोकळे होतात, आपत्ती ओढवते ती त्यातूनच. सोशल माध्यमांवरील संदेशाचे आवागमान म्हणूनच चिंतेचा विषय होऊन बसला आहे.
समाजात तेढ निर्माण होणारे जे काही प्रसंग अलीकडील काळात घडलेत, त्यामागे अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या भडकावू संदेशांचा वाटा मोठा राहिल्याचे दिसून आले आहे. मुले पळविणाºयांची टोळी आल्यासारख्या अफवा पसरविणाºया संदेशांनीही अनोळखी इसमांबद्दल शंकेचे वातावरण निर्माण केले. अशा गैरसमजुतीच्या कारणातून देशभरात २७ निष्पापांचे प्राण घेतले गेले. म्हणूनच याबाबत समाजमन जागृत करण्याची गरज बनली आहे. व्हॉट्सअॅपसारख्या सोशल माध्यमांवर डोळे वटारले गेल्यावर त्यांनी अशी जनजागरणाची मोहीम हाती घेतली आहे, तसेच पोलीस खातेही शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी व पालकांना तसेच व्हॉट्सअॅप ग्रुप्सच्या प्रमुखांना जाणीव करून देत आहेतच. पण सुजाण नागरिक म्हणून आपणच आपली जबाबदारी ओळखून अशा अफवा पेरणाºया संदेशांना रोखले तर अप्रिय घटनांना संधी मिळणार नाही.