अमित शहा यांची भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हाच दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या एका राष्ट्रीय नियतकालिकाने ‘ही नियुक्ती भाजपाला आज मानवणारी असली, तरी उद्या अडचणीची ठरेल’ असे आपल्या मुखपृष्ठावर लिहून त्या विधानाचे समर्थन करणारा एक मोठा लेख प्रकाशित केला होता. नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत निकटवर्ती वर्तुळातले व विश्वासातले ते कार्यकर्ते असले, तरी त्यांच्यावर गुजरातच्या न्यायालयात अनेक खटले दाखल आहेत. खून, खंडणीखोरी आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे त्यात समाविष्ट असून, ते सध्या पॅरोलवर आहेत. सध्याचे राजकीय वातावरण बघता त्यांना सातत्याने पॅरोल मिळेल यात शंका नसली, तरी तो न्यायालयांच्या विश्वसनीयतेचाही कधीतरी प्रश्न ठरेल. एवढे सारे पाठीशी असतानाच ‘मुजफ्फरनगरची दंगल जरा आठवा’ अशी गंभीर धमकी सहारनपूरच्या नागरिकांना देण्याइतपत त्यांनी आपल्यावरील जबाबदारीचे भान आता गमावले आहे. पुढे जाऊन ‘जोवर उत्तर प्रदेशात तणावाचे वातावरण आहे, तोवर भाजपाला तेथे विजयाची शक्यताही मोठी आहे’ हे भयकारी वाक्य त्यांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांना ऐकविले आहे आणि आता ‘मुजफ्फरनगरच्या दंगलींचा बदला घेण्याची लोकसभेची निवडणूक ही संधी होती’ असे म्हणून त्यांनी आचारसंहितेचा भंगही केला आहे. त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेश सरकारने तो दाखल केला असल्यामुळे त्यावर ‘राजकीय सूडबुद्धीचा’ आरोप ठेवायला अमित शहा यांचा पक्ष अर्थातच मोकळा आहे. मात्र, शहा यांच्या मागे असलेली आरोपांची दीर्घ परंपरा पाहता हे गुन्हे कधीतरी दाखल होणे भागच होते. नंतर आलेल्या वृत्तात न्यायालयाने पोलिसांचे आरोपपत्र परत पाठविल्याचे म्हटले आहे. त्याची कारणे अजून स्पष्ट व्हायची आहेत. तथापि, न्यायालयांची अशी वर्तणूक त्यांच्याही भोवती संशयाचा घेरा उभा करणारी आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ११ जागांवर पोटनिवडणुका व्हायच्या आहेत. या सर्व जागा या अगोदर भाजपाने जिंकल्या असल्यामुळे याही वेळी त्या जागांवर भाजपाला विजय मिळेल, असेच सारे म्हणतात. परंतु, जनतेचा ‘मूड’ बदलला आहे. झारखंड, बिहार आणि कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांनी ते साऱ्यांच्या लक्षात आणूनही दिले आहे. त्यामुळे भाजपाचे उत्तर प्रदेशातील नेते तेथे थेट धमकीच्या भाषेवर आले आहेत. त्या राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष योगी आदित्यनाथ यांच्या फुत्कारवजा भाषणांमुळे राज्यात दंगली होतील म्हणून उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्यावर या आधीच भाषणबंदी लादली आहे व त्यांना लखनौ या राजधानीच्या शहरी यायला मनाई केली आहे. मात्र, हा मनाईहुकूम मोडून या आदित्यनाथांनी त्यांच्या सवयीनुसार सर्वत्र भडकावू भाषणे देण्याचे त्यांचे व्रत मात्र सोडले नाही. आदित्यनाथावरील बंदी ताजी असतानाच आता खुद्द भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच या हाणामारीत उडी घेऊन वरील प्रकारची उद्दाम विधाने केली आहेत. काँग्रेस पराभूत आहे आणि बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष पराभवाच्या धक्क्यातून सावरायचे आहेत. या स्थितीत आपण काहीही करू व बोलू शकतो हा भाजपा पुढाऱ्यांचा होरा आहे. परंतु, राजकारण स्थिर असले तरी कायदा, प्रशासन व न्यायालये या यंत्रणा त्यांचे काम करीत आहेत आणि ते त्यांनी करावे हीच त्यांच्याकडून अपेक्षाही आहे. आदित्यनाथ आणि शहा यांना अडवायला आता याच यंत्रणा समोर आल्या आहेत. त्यांची कारवाई किती परिणामकारक होते आणि तिचे राजकारण केवढ्या मोठ्या प्रमाणात केले जाते हे येत्या काही दिवसांत देशाला दिसणार आहे. आपल्याविरुद्धची कारवाई म्हणजे धर्माविरुद्धची कारवाई असे भ्रामक चित्र भाजपाच्या प्रचार यंत्रणेकडून उभे केले जाईलच. प्रत्येक गोष्ट थेट त्याच पातळीवर नेण्याची त्या पक्षाची सध्याची कार्यपद्धती आता जनतेच्याही चांगल्या परिचयाची झाली आहे. मात्र, आदित्यनाथ आणि शहा यांच्या उद्दाम भाषेचा उलटा परिणाम होण्याचीच शक्यता जास्त, कारण आपला समाज कोणत्याही विधायक आवाहनाचे स्वागत करणारा आहे. पण, कोणी उगाच धमकीवजा भाषा व आक्रमकपणाचा आव आणत असेल, तर त्याविषयीची त्याची प्रतिक्रियाही नेहमीच तीव्र राहत आली आहे. आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्याविषयीची त्याची प्रतिक्रिया पोटनिवडणुकांच्या निकालात दिसण्याची शक्यताही मोठी आहे. ती तशी दिसली तर दिल्लीच्या त्या नियतकालिकाचे शहा यांच्याविषयीचे भाकीत फार लवकर खरे ठरले, असे होणार आहे.
अमित शहांना अटकाव
By admin | Published: September 12, 2014 3:10 AM