लष्कर आणि आयएसआय या दोन्ही शक्तिशाली संघटनांचा पाठिंबा असणे, नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात डांबले जाणे आणि बिलावल झरदारी यांच्यावर अनेक बंधने लादली जाणे या तीनही बाबी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर इम्रान खान यांची निवड व्हायला कारणीभूत झाले. त्यांच्या संभाव्य वेळाची आगाऊ कल्पना आली नाही. देशी व विदेशी वृत्तपत्रांनी ते पंतप्रधानपदी निवडले जातील असे संकेत देणाऱ्या बातम्या व लेख अगोदरच प्रकाशित केले होते. शरीफ यांना त्यांच्या पंजाब प्रांतात तर बिलावल यांना सिंधमध्ये पाठिंबा मिळाला असला तरी पाकि स्तानचा सारा मुल्क इम्रानसोबत गेला व त्यांची निवड शक्य झाली. त्यांच्या या निवडीचे स्वागत फार जपून करावे लागणार आहे. कारण ‘काश्मीरचा गेली ७० वर्षे न सुटलेला प्रश्न आपण एका चुटकीसरशी सोडवू’ अशी भाषा ते एकेकाळी बोलत. पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे मध्यवर्ती सूत्र भारत द्वेष हेच आजवर राहिले आहे व काश्मीरचा प्रश्न त्यात महत्त्वाचा असल्याने पाकिस्तानी जनतेला इम्रान खान यांची भुरळ पडणे स्वाभाविक ही मानले जात आहे. त्यांच्या विजयाचे दुसरे महत्त्वाचे कारण देशातील मुल्ला-मौलवी व कट्टर धर्मपंथीयांशी त्यांचे असलेले मधूर संबंध. काही काळापूर्वी त्यांनी तालिबान या अतिरेक्यांच्या संघटनांना कोट्यवधी रुपयांचे साहाय्य केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. लष्कर, धर्मगुरू आणि अतिरेकी यांचा पाठिंबा जेव्हा मिळतो त्या नेत्याचे भावी राजकारण कसे असेल याची कल्पना करणे फारसे अवघड नाही. ‘मी भारताशी चांगलेसंबंध राखू इच्छितो, त्यासाठी भारताने एक पाऊल पुढे आले पाहिजे’ ही त्यांची भाषा त्यांच्या धोरणाची चुणूक दाखविणारी आहे. त्याचवेळी ‘अमेरिकेने पाकिस्तानला दूर लोटले असले तरी आम्ही चीनच्या मदतीने पुढे जाऊ’ हे त्यांचे म्हणणेही भारताला घेरण्याच्या पाकिस्तान व चीनच्या आजवरच्या धोरणाशी सुसंगत म्हणावे असेच आहे. त्यामुळे त्यांच्या खिलाडू असण्यावर किंवा त्यांनी आपला पहिला विवाह एका ज्यू स्त्रीशी केला या बाबींना फार महत्त्व देण्याचे कारण नाही. हे कडवे धर्मवादी, कट्टर भारतविरोधी आणि धर्म व राजकारण या दोहोत फरक न करणारे अतिरिक्त श्रद्धावादी पुढारी आहेत आणि पाकिस्तानातील कडव्या धर्मांधांचा त्यांना पाठिंबाही आहे. गेल्या काही दशकात भारताला पाकिस्तानातील फार थोड्या नेत्यांशी चर्चा करता आली. त्यात जन. मुशर्रफ होते, बेनझीर भुट्टो होत्या आणि नवाज शरीफ होते. त्याआधी व नंतरही त्या देशाचे नेतृत्व भारताच्या शत्रुत्वावर भर देणारे राहिले. राजकीय सत्तापदावर कुणीही असो, त्याला ताब्यात ठेवण्याची ताकद तेथील लष्कराने नेहमीच आपल्याकडे राखली आहे. झुल्फिकार अली भुट्टो या पंतप्रधानाला थेट फासावर लटकावण्याएवढी तेथील लष्कराची ताकद मोठीही आहे. शिवाय ते लष्कर कडव्या धर्मगुरुंशी संबंध राखणारेआहे. तालिबानांविरु द्ध लढण्यासाठी अमेरिकेने त्या लष्कराला केलेली सगळी मदत त्याने भारताविरुद्ध वापरली हा इतिहास ताजा आहे. झालेच तर पाकिस्तान ही अतिरेक्यांना आश्रय देणारी भूमी आहे असा ठरावही त्याचमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य केला आहे. त्या देशाला ‘अतिरेकी राष्ट्र’ म्हणायचे तेवढे जगाने बाकी ठेवले आहे. इम्रान खान यांना त्यांचे नाव जगाच्या पातळीवर मोठे करायचे असेल तर त्यांना हा इतिहास बदलणे भाग आहे आणि त्यासाठी लष्कर व धर्मांध शक्ती यांच्याशी झुंज देणेही आवश्यक आहे. सध्याची त्यांची स्थिती व क्षमता मात्र तेवढी नाही. ती उद्या वाढली आणि त्यांच्या देशाने भारताबाबत मैत्रीचे व स्नेहाचे धोरण आखलेच तर ती आश्चर्यकारक पण स्वागतार्ह म्हणावी अशी बाब ठरेल. मात्र त्यासाठी इम्रान खान यांना आपण काहीवेळ दिला पाहिजे व त्यांची आरंभीची पावले काळजीपूर्वक पाहिली पाहिजेत. खेळाडू राजकारणी झाला की त्याच्यातला खिलाडूपणा कमी होतो हा अनुभव इम्रान खान खोटा ठरवतील काय हा खरा प्रश्न.
इम्रान : 'ऑलवेल' नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 7:06 AM