महाराष्ट्रातील शेती, रोजगार, पाणी, वीज, महागाईचे वगैरे बाकी सगळे प्रश्न जणू संपले आहेत आणि सकाळी-संध्याकाळी मशिदींमधून भाेंग्यांवर पढली जाणारी नमाज, त्यामुळे लोकांची होणारी झोपमोड, ध्वनिप्रदूषण, त्यावरचे आक्षेप, प्रतिभोंगे लावून हनुमान चालिसा पठणाचा इशारा, त्यातून धार्मिक तणाव हीच एक समस्या शिल्लक आहे. गेल्या जवळपास महिनाभरातील गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती ते आठवडाभरावर आलेली रमजान ईद व अक्षय्य तृतीयेचे सण ज्या पद्धतीने साजरे होताहेत ते पाहता तरी असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पाडवा मेळाव्यात मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यापासून महिनाभर महाराष्ट्रात राजकीय भोंग्यांचा दणदणाट सुरू आहे.
शिवाजी पार्कवरच्या पाडवा मेळाव्यानंतरही काही प्रश्न अनुत्तरित राहिल्यामुळे राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेऊन भूमिका आणखी स्पष्ट व ताठर केली. पुढच्या मंगळवारी, ३ मे रोजी रमजान ईद व अक्षय्य तृतिया असल्याने तोपर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले नाहीत तर मनसैनिक मशिदींसमोर प्रतिभोंगे लावून हनुमान चालिसा पठण करतील, असा इशारा त्यांनी दिला. हे सारे वरवर धार्मिक दिसत असले तरी ते तसे नाही. हा प्रश्न धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे, ध्वनिप्रदूषणाचा आहे, हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरीही महाविकास आघाडी सरकारमधल्या तिन्ही घटकपक्षांच्या नेत्यांनी राज ठाकरे हे सारे भाजपच्या इशाऱ्यावर करीत असल्याचा प्रत्यारोप करीत आहेत. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळे तणावाचे वातावरण कमी होते की, काय म्हणून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व बडनेऱ्याचे आमदार रवी राणा या पती-पत्नींनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानापुढे हनुमान चालिसा पठण करण्याच्या स्टंटसाठी मुंबई गाठली.
या दाम्पत्याची स्टंटबाजी भाजपच्या नेत्यांना हवीच आहे, फक्त त्यांना पुढे येऊन राज ठाकरे यांचे समर्थन करायचे नाही. या पृष्ठभूमीवर, सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली. अपेक्षेनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला नव्हते. हा मुद्दा ज्यांनी पेटविला, त्या राज ठाकरे यांनी आपले प्रतिनिधी पाठवून दिले. राणा दाम्पत्यावर राज्य सरकारने केलेले अत्याचार म्हणजे हिटलरशाही असल्याचा आरोप करीत विधानसभेचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले. परिणामी या बैठकीत होणाऱ्या चर्चेचा व निर्णयाचा संभाव्य आंदोलनावर काहीही फरक पडणार नाही, हे स्पष्टच झाले होते. तरीदेखील गृहमंत्री वळसे पाटील व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर मांडलेल्या मुद्यांवर गंभीरपणे विचार व्हायला हवा. मुळात मशिदी किंवा इतर प्रार्थनास्थळांवरील ध्वनिवर्धकांचा व पोलिसांचा तसा थेट संबंध नाही.
यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व त्यावर आधारित केंद्र सरकारच्या सूचना मुख्यत्वे ध्वनिप्रदूषणाशी, पर्यावरणाशी संबंधित आहेत. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत देशात कुठेही भोंगे वाजणार नाहीत, हा या सूचनांचा गाभा आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत वाजणाऱ्या भोंग्यांचा आवाज किती असावा हे शहरे व गावांमधील परिस्थितीवर अवलंबून आहे. इस्पितळे, शाळांच्या परिसरात तो आवाज कमी असावा, असे निर्देश आहेत. तेव्हा, सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत ध्वनिवर्धक पूर्णपणे बंद करता येणार नाहीत, हे गृहमंत्र्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. रात्रीच्या वेळेचा आवाज केंद्र सरकारने घालून दिलेल्या मर्यादेत आहे की, नाही हे, पोलीस पाहत आहेत. याउपरही काही बंदी वगैरे आणायची असेल, काही राजकीय पक्षांना ती आणावी वाटत असेल तर केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठीच निर्णय घ्यावा, असे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे.
थोडक्यात, राज्य सरकारने राज ठाकरे व प्रभूतींनी महाविकास आघाडीच्या दिशेने वळविलेले भोंग्याचे तोंड गृहमंत्री व पर्यावरणमंत्र्यांनी दिल्लीच्या दिशेने वळविले आहे. मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न समाधानकारक मानून राज ठाकरे त्यांचा ३ मे रोजीचा इशारा मागे घेणार नाहीत, हे मनसेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे किंवा गेला बाजार भारतीय जनता पक्ष अथवा नवनीत राणा, रवी राणा यांच्यासारखे राज्य सरकारविरुद्ध तुटून पडलेले कुंपणावरील घटक यापुढेही सरकारचे काही ऐकण्याची शक्यता दिसत नाही. भोंगे व प्रतिभोंगे वाजतच राहणार, ध्वनिप्रदूषण कमी होण्याऐवजी वाढणार.