भरपूर काम करायचं, कष्ट करायचे, पैसे कमवायचे आणि पुढे जायचं हेच तर असतं माणसाचं स्वप्न. ते पूर्ण करताना माणूस पळत सुटतो. धाप लागावी इतका दमून जातो. आपण हे कोणासाठी, कशासाठी करतोय असा प्रश्न धावणाऱ्या माणसाला पडतोही. पण या प्रश्नावर थांबावं, थोडा विचार करावा, पर्याय शोधावे इतपतही परवानगी त्याला त्याचं आयुष्य देत नाही. कमावती माणसं, शिकणारी मुलं.. सगळेच अखंड धावत असतात. यशस्वी व्हायचं तर हेच करावं लागतं, हे सर्वजणच करतात, अशी प्रत्येकजण स्वत:ची समजूत घालत पळत असतो. पण, जगण्यासाठी, यशासाठी अखंड पळणं, मरमर करत जगणं आणि जगण्याची चवच घालवून बसणं हे एका कुटुंबाने साफ नाकारलं. चौकटीत जगण्याची प्रचलित रीत सोडून हे कुटुंब एका चौकटीतून बाहेर पडून खुल्या आसमंतात मोकळेपणानं श्वास घ्यायला, खऱ्या आनंदासाठी मुक्तपणे जगायला बाहेर पडलं आहे, चक्क रस्त्यावर उतरलं आहे.
अमेरिकेतील अरिझोना राज्यातील फिनिक्स शहरात मॅकग्रथ कुटुंब. मे महिन्यापासून हे कुटुंब शहर सोडून भटकंतीला निघालं. तिशीतलं स्टीव्ह आणि वॅण्डी हे जोडपं, त्यांची ब्रॅडी, एन्सले ही मुलं, पिकाचू नावाचं मांजर आणि इस नावाचा शेफर्ड कुत्रा मे महिन्यापासून आरव्ही (रिक्रेशनल व्हेइकल- सर्व सुविधांनी युक्त अशी गाडी, ज्यात राहण्याची, स्वयंपाक करण्याची व्यवस्थाही असते.) मध्ये फिरत आहेत. स्टीव्ह आणि वॅण्डी या दोघांनीही मागच्या वर्षी नोकरी सोडून दिली. नोकरीच्या मागे धावणं, आठवड्यातले ४० तास एका ठिकाणी राबणं, फक्त वीकेण्डमध्येच कुटुंबासोबत जगणं या गोष्टींनी दोघेही हैराण झाले होते. शेवटी कशाला जगायचं असं, असा विचार करून दोघांनीही नोकरी सोडली. एका चक्रात बांधून टाकणाऱ्या दिनचर्येतून स्वत:ची सुटका करून घेतली. स्टीव्ह लष्कराच्या दवाखान्यातील इमरजन्सी रूममध्ये काम करायचा. अमेरिकेच्या युद्धप्रवण भागात सशस्त्र लष्करासोबतही त्याने काम केलेलं. पण धोरण ठरवणाऱ्यांना प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांची काही पर्वाच नसते. त्यांचे कागदी धोरण किती कुचकामी असतं याची जाणीव स्टीव्हला होत होती . वॅण्डी अमेरिकन हवाईदलात सुरक्षा कृती व्यवस्थापक म्हणून काम करायची. कामाच्या ताणाने वॅण्डी थकून गेली होती. कुटुंब म्हणून जगण्यातली मजाच गेली आहे, याची जाणीव स्टीव्ह आणि वॅण्डीला झाली आणि त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मुलांचं प्राथमिक शिक्षण संपलं आणि ते घराबाहेर पडले. कमीतकमी गरजांमध्ये जगण्याची सवय त्यांनी याआधीच स्वत:ला लावून घेतली होती. त्यांनी फिनिक्समधील आपलं घर ४ लाख डाॅलर्सला शेजारच्यांना विकलं. आता स्टीव्ह आणि वॅण्डी दोन मुलं आणि दोन पाळीव प्राणी यांच्यासोबत हे दोघे आरव्हीमधून अमेरिकेत फिरत आहेत आणि आरव्हीमध्येच राहात आहेत. त्यांचा रोजचा दिवस आता सहलीचा झाला आहे. सगळे खुश आहेत.
आरव्हीमधून संपूर्ण अमेरिका फिरायची आणि मग एका ठिकाणी स्थायिक व्हायचं असं स्टीव्ह आणि वॅण्डीने ठरवलं आहे. सध्या घर विकून जे पैसे आले आहेत त्यावर त्यांचा खर्च सुरू आहे. आपल्या रोड ट्रीपसाठी हे पैसे पुरतील एवढ्या गरजा त्यांनी मर्यादित केल्या आहेत. आता महिन्याला पेट्रोल, अन्न आणि फिरणं यासाठी त्यांना १२०० डाॅलर्स खर्च येतो, हा खर्च पूर्वीपेक्षा खूप कमी असल्याचं स्टीव्ह आणि वॅण्डी म्हणतात. रस्ता घेऊन जाईल तिथे जायचं, मनात येईल तिथे थांबायचं, आजचा दिवस छान गेला, उद्याचं उद्या पाहू असं म्हणत झोपी जायचं ही आयुष्यातली खरी गंमत, खरा आनंद आणि जगण्यातलं खरंखुरं थ्रिल जगण्याच्या शर्यतीतून बाहेर पडल्याशिवाय अनुभवताच आलं नसतं असं स्टीव्ह आणि वॅण्डी म्हणतात. हा आनंद घेत ते संपूर्ण अमेरिकेत फिरणार आहेत. आणि जेव्हा थांबायचं ठरेल तेव्हा इटलीतील बासिलिकाटा प्रांतातील लॅट्रोनिका या छोट्या गावात राहाणार आहेत. या गावात त्यांनी एक छोटंसं घर घेतलं आहे. स्टीव्ह आणि वॅण्डीची एवढीच काय ती संपत्ती. सतत मिळवण्याचा हव्यास सोडून जे मिळेल ते स्वीकारायचं असं ठरवलं तर जगणं आपल्याला खूप भरभरून देतं हेच स्टीव्ह आणि वॅण्डीचा हा अनिश्चित प्रवास सांगतो.
मुलांचं आरव्ही स्कूलिंग आपल्या मुलांना पुस्तकाच्या बाहेरचं खरंखुरं जगणं अनुभवायला मिळतं आहे, याचा स्टीव्ह आणि वॅण्डीला खरा आनंद आहे. मुलं मुक्त वातावरणात सुरक्षित शिकत आहेत. आपल्या शाळेत गोळीबार तर होणार नाही ना, याची त्यांना भीती वाटत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात कुटुंबाबरोबर ब्रॅडी आणि एन्सलेचं आरव्ही स्कूलिंग त्यांना खऱ्या अर्थाने माणूस बनवेल असा विश्वास स्टीव्ह आणि वॅण्डीला वाटतोय!