तुम्हाला कोणता ऋतू आवडतो? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा..? एखादा ऋतू आवडण्याची किंवा न आवडण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील; पण या वातावरणाचा आपल्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर निश्चतपणे परिणाम होत असतो. मग तो मानव असो किंवा पशू, पक्षी, प्राणी. थोडीशी माहिती घेतली किंवा थोडा अभ्यास केला, निरीक्षण केलं तर लक्षात येईल, वर्षाच्या कोणत्या काळात, विशेषत: कोणत्या ऋतूत आपल्याला अस्वस्थ वाटतं? केव्हा आपली चिडचिड जास्त होते? आपल्याला राग केव्हा जास्त येतो आणि केव्हा आपण जास्त धुसफुसत असतो..?जाऊ द्या, एखाद्या पोलिस स्टेशनला जा, तिथल्या नोंदी तपासा किंवा तुमच्या ओळखीचा एखादा पोलिस अधिकारी असेल, तर त्याला विचारा, वर्षाच्या कोणत्या काळात गुन्ह्यांचं प्रमाण जास्त असतं..?
मुळात आपण कधी या दृष्टीनं विचारच केलेला नसतो. कोणीही म्हणेल, गुन्हा हा गुन्हा असतो. गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस केव्हाही गुन्हा करू शकतो. तो काही ऋतू पाहून गुन्हा करतो का? - पण जगभरातील गुन्हेगारी संदर्भातल्या नोंदी तपासल्या तर लक्षात येईल, विशेषत: उन्हाळ्यात जास्त प्रमाणात गुन्हे घडून येतात. उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाच्या तलखीनं माणूस आधीच ‘तापलेला’ असतो, त्यात त्याच्या थोडं काही मनाविरुद्ध घडलं की त्याच्या संतापाचा पारा वाढतो आणि त्या अवस्थेत त्याच्या हातून बऱ्याचदा नको तो गुन्हाही घडून जातो.
जगभरात यासंदर्भात आजवर अनेक अभ्यास झाले आहेत आणि त्या प्रत्येक अभ्यासात हाच निष्कर्ष निघाला आहे, की उन्हाळ्यात हिंसाचारात जास्त प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या काळात कायदा-सुव्यवस्थेकडे जास्त लक्ष द्या, किंबहुना बाहेरचं तापमान फार वाढू देऊ नका म्हणजे लोकांचं आंतरिक तापमानही खवळून उठणार नाही, थोडक्यात पर्यावरणाकडे लक्ष द्या. ग्लोबल वॉर्मिंगमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, असाही त्याचा निष्कर्ष काढता येतो. या दोन्ही गोष्टींत जर वाढ होऊ दिली नाही, तर लोकांचं मानसिक स्वास्थ्य तर नीट राहीलच, शिवाय लोकांची माथीही ‘थंड’ राहतील, भडकणार नाहीत! अमेरिकेत अलीकडच्या काळात यासंदर्भात दोन विस्तृत अभ्यास करण्यात आले. दोन्हींचे निष्कर्ष समान आहेत. त्यातला ताजा अभ्यास सांगतो,
उन्हाळ्याच्या दिवसांत, त्यातही ज्या दिवशी तापमान अधिक असतं, अशा दिवसांत लोक जास्त आक्रमक होतात. त्यांचा आपल्या मेंदूवरचा ताबा निसटतो आणि अशा अवचित क्षणी ‘इच्छा’, ‘मानसिकता’ नसतानाही त्यांच्याकडून गुन्हा घडून जातो. या अभ्यासानुसार अमेरिकेत उन्हाळ्यात गुन्हेगारीचं प्रमाण चार टक्क्यांनी तर सामूहिक हिंसाचारात तब्बल १४ टक्क्यांनी वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. स्पेनमधला अभ्यास आणखी एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधतो. स्पेनमध्ये उन्हाळ्यात रस्ते अपघातांमध्ये जवळपास आठ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांतच आपली जास्त चिडचिड का होते? कारण या दिवसांत आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्समध्ये वाढ होते. उन्हाळ्यात जसजसं तापमान वाढत जातं, तसतसं आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल या हार्मोनमध्येही वाढ होत जाते आणि त्यामुळे आपल्या शरीर-मनाचा तोल बिघडतो. उन्हाळ्याचे दिवस वाढले आणि पावसाळा दूर गेला तर त्याचाही विपरीत परिणाम आपल्या मेंदूवर होतो. मेंदूतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. यामुळे काही जण डिप्रेशनमध्ये जातात, काही जण पटकन चिडतात, नेहमीच्या गोष्टींचाही त्यांना ताण यायला लागतो. कामं बिघडायला लागतात. हा बिघडलेला तोलच मग आपल्या हातून गुन्हे घडवून आणतो.
यासंदर्भातलं आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे उन्हाळ्यात तरुण मुलांकडून होणारे गुन्हे जास्त वाढतात. कारण याच काळात त्यांना शाळा-कॉलेजेसला सुटी असते. मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी कमी होतात. ‘समाजात’ मिसळण्याचं प्रमाण तुलनेनं कमी होतं. त्यात शरीराची काहिली करणारं ऊन! यामुळे तरुणांमधली आक्रमकता वाढते. त्यांच्यातल्या ऊर्जेला अयोग्य दिशा मिळते आणि छोट्याशा कारणानंही त्यांची माथी भडकतात. अर्थातच त्यांच्याकडून होणारे गुन्हेही वाढतात..!
६९,५२५ कुत्र्यांचा अभ्यास! या निष्कर्षाला पुष्टी देणारा आणखी एक रंजक अभ्यास अमेरिकेत करण्यात आला. २००९ ते २०१८ या काळात अमेरिकेतील आठ शहरांतील ६९,५२५ कुत्र्यांचा अभ्यास करण्यात आला. त्याशिवाय माकडं आणि उंदरांवरही तापमानाचा काय परिणाम होतो, याचं निरीक्षण करण्यात आलं. कुत्रे, माकडं आणि उंदरांंचंही उन्हाळ्यात ‘डोकं’ फिरतं, हे त्यातून सिद्ध झालं. याच काळात कुत्रे माणसांना जास्त चावतात. हे प्रमाण दिवसाला तीन, तर वाढ तब्बल अकरा टक्के होती!