आज दसरा. दसऱ्याला सीमोल्लंघनाचे महत्त्व मोठे. सीमोल्लंघन म्हणजे काय? - तर नव्या गोष्टींना सुरुवात करायची आणि आपली सीमा ओलांडायची! आयकर विभाग सध्या तेच करतो आहे आणि आपले जाळे त्यांनी थेट परदेशापर्यंत विस्तारले आहे. परदेशात असलेल्या संधी, जीवनशैली या व अशा कारणांमुळे अनेक भारतीयांनी परदेशाचा मार्ग स्वीकारला आहे.
अर्थात, भारतीय लोक परदेशात स्थिरावले तरी तिथे मिळवलेल्या उत्पन्नातून भारतातील आपल्या शहरात - गावात घर, जमीन घ्यायची हेदेखील नित्याचे आहे. मात्र, आजवर हे व्यवहार केले तरी या व्यवहारांच्या अनुषंगाने आपल्या आयकराचे काय होते किंवा ते विवरणात कसे दाखवायचे, दाखवावेच लागते का, या प्रश्नांचा कुणी फारसा विचार केला नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत आयकराचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आपण देशात किंवा परदेशात केलेले सर्व व्यवहार आयकर विभागाच्या एका क्लिकवर उपलब्ध झाले आहेत; आणि यातूनच मग परदेशात मालमत्ता घेतलेल्या किंवा परदेशात राहून भारतात मालमत्ता खरेदी केलेल्या लोकांना आयकर विभागातर्फे वसुलीच्या नोटिसा जारी होण्यास सुरुवात झाली आहे. मुळात नोटीस येते कशी हे पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे.
आजच्या घडीला कोणताही आर्थिक व्यवहार करायचा म्हटला तरी आपल्याला पॅन व आधार कार्ड सादर करणे बंधनकारक झालेले आहे. त्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार केला तरी त्याद्वारे आपल्या पॅन व आधारची माहिती त्यात सादर होते व संगणकीकरणामुळे ते विनासायास आयकर विभागापर्यंत पोहोचते. त्यामुळेच जर आपण आर्थिक व्यवहार केले आणि ते आयकर विवरणात नमूद केले नाही, तर आपला हेतूच करचोरीचा असल्याचे मानून या नोटिसा जारी केल्या जातात. परदेशात राहणाऱ्या मात्र भारतात मालमत्ता खरेदी केलेल्या, परंतु ते व्यवहार भारतातील आयकर विवरणात न दाखवणाऱ्या सुमारे २० हजार लोकांना आयकर विभागाने नोटिसा जारी केल्या आहेत!
आयकर विभागाची नोटीस आली असे समजले तरी अनेकांच्या पोटात गोळा येतो. मात्र, हे असे का होते हे नीट समजून घेणे गरजेचे आहे. तसेच, जर योग्य काळजी घेतली तर अशा नोटिसादेखील टाळणे सुलभ होईल. भारतीयांतर्फे परदेशात केल्या जाणाऱ्या किंवा परदेशातून भारतात होणाऱ्या व्यवहारांमध्ये काळ्या पैशांचे व्यवहार वाढीस लागू नयेत म्हणून हे व्यवहार आपल्या आयकर विवरणामध्ये दाखविणे आता बंधनकारक आहे.
यातील पहिला मुद्दा, अनिवासी भारतीयांतर्फे परदेशातून भारतात होणाऱ्या व्यवहारांचा. जरी तुम्ही परदेशात स्थिरावले असाल, पण जोवर तुम्ही परदेशी नागरिकत्व घेत नाहीत तोवर भारतामध्ये तुम्हाला आयकर विवरण भरणे बंधनकारक आहे. जरी भारतात तुमचे काहीही उत्पन्न नसले तरीदेखील आयकराचे शून्य विवरण भरणे गरजेचे आहे. जर तुम्ही परदेशातून भारतात काही व्यवहार केलेले असतील तर तेदेखील आयकर विवरणामध्ये नमूद करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही परदेशी पैसा वापरून किंवा भारतातील पैशांतून भारतामध्ये काही स्थावर मालमत्ता खरेदी केली असेल तर त्या मालमत्तेचा तपशील तुमच्या विवरणात नमूद करणे बंधनकारक आहे. त्या मालमत्तेद्वारे तुम्हाला जर काही भाडे मिळत असेल तर ते उत्पन्नही विवरणात नमूद करणे गरजेचे आहे.
आता याच्या उलट मुद्दा, जर तुम्ही भारतात राहात असाल आणि परदेशात काही मालमत्ता खरेदी केली तर त्या खरेदीचा तपशील तुम्हाला आयकराच्या वार्षिक विवरणात नमूद करणे बंधनकारक आहे. अलीकडेच भारतात राहणाऱ्या महिलेने परदेशात मालमत्ता खरेदी केली होती. मात्र, त्याचा तपशील तिने विवरणात नमूद केला नाही. त्यानंतर तिला आयकर विभागाने नोटीस जारी केली होती. हे प्रकरण आयकर न्यायाधिकरणापर्यंत गेले. परदेशात खरेदी केलेल्या मालमत्तेचा तपशील भारतीय आयकर विवरणात सादर करायचा असतो, याची आपल्याला माहिती नव्हती, असा मुद्दा तिने न्यायाधिकरणासमोर मांडला. मात्र, कायदा, नियम माहीत नाही, हा युक्तिवाद असू शकत नाही, असे नमूद करीत संबंधित महिलेला न्यायाधिकरणाने १० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. दरवर्षी आयकराच्या विविध तरतुदींमध्ये सुधारणा होत असतात. याची जर तुम्हाला माहिती नसेल तर कर सल्लागाराचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते. अशा स्थितीत आपल्याला नोटिशीचा नजराणा येण्याची शक्यता राहात नाही. अन्यथा, आयकर विभाग सीमोल्लंघन करून तुम्ही जिथे असाल तिथे, तुमच्या ‘घरी’ पोहोचेल हे नक्की!