- किरण अग्रवालनात्यांना एक गंध असतो. नाते जितके गहिरे, तितका त्याचा सुगंध अधिक. त्यामुळे नाती ही फुलांसारखी जपावी, असे नेहमी सांगितले जाते. नात्यांमधले नाजुकपण यात सामावलेले असल्याचे लक्षात यावे. नात्यांची वीण घट्टच असावी. ती उसवू न देण्याची सर्वांची अपेक्षा असते व तसा प्रयत्नही केला जातो; परंतु अपवादात्मक संज्ञेत मोडणाऱ्या का होईना, काही घटना अवतीभोवती घडताना दिसून येतात तेव्हा एकूणच समाजव्यवस्थेला तर हादरे बसतातच शिवाय नात्यांमधल्या असुरक्षिततेचा, हिंसेचा मुद्दा उपस्थित होऊन त्यामागील कारणांचा शोध घेतला जाणे गरजेचे ठरून जाते.मुंबईतील वडाळा पोलिसांकडे सासूची हत्या करणाऱ्या सुनेविरुद्ध गुन्हा नोंदविला जाऊन तिला अटकही करण्यात आली आहे. नाशकात मामीनेच आपल्या नवविवाहित भाचीला पैशांसाठी विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पैशांकरिताच मुलाने आपल्या आईचा खून केल्याची घटनाही उघडकीस आली आहे. मनमाडमध्ये चौथे लग्न करत संबंधित नवरदेवासह त्याच्या कुटुंबीयांची फसवणूक करू पाहणाऱ्या लातूरच्या एका टोळीलाच पकडण्यात आले आहे... या झाल्या अगदी आज-कालमधील घटना; पण त्या प्रातिनिधिक ठराव्यात, कारण अशी अनेक प्रकरणे अधूनमधून समोर येत असतात. अगदी वासनांध पित्याकडून आपल्याच मुलीवर अत्याचार केले गेल्याचेही प्रकार समोर आले आहेत. नात्यांना काळिमा फासणारे हे प्रकार आहेत; पण याचसोबत हुंड्यासाठी होणा-या छळाचे प्रकारही कमी होताना दिसत नाहीत आणि विशेष म्हणजे, हुंडाबळीच्या प्रकरणात महिलाच महिलेच्या शत्रू ठरलेल्याही दिसून येतात. अर्थात, हे अपवादात्मक असले तरी या अशा घटना समाजमनावर परिणाम करणा-या ठरतात. नात्यांमधला संशय अगर अविश्वास वाढीस लावू पाहणाऱ्या या घटनांबद्दल कायद्याच्या कक्षेत जो न्यायनिवाडा वा शिक्षा व्हायची ती होईल व होतेही; परंतु समाजशास्रींनीही याकडे लक्ष पुरवणे गरजेचे बनले आहे.मागे, म्हणजे २००५च्या नॅशनल फॅमिली एण्ड हेल्थ सर्व्हेची जी आकडेवारी हाती आली होती त्यानुसार आपल्याकडे घरगुती हिंसाचाराचे प्रमाण ३३.५ टक्के आढळून आले होते, तर १५ ते ४९ वयोगटातील महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण ८.५ टक्के असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. समाजातील लोकलज्जा, भीती व कौटुंबिक पुरुष प्रधानकी आदि कारणांमुळे असंख्य महिला पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचतही नाहीत, हा भाग वेगळाच. कुटुंबात पतीने पत्नीवर हात उगारणे किंवा कसल्या का कारणातून होईना अवमानजनक बोलणे हा तर अधिकारच समजला जाऊन पोलिसांकडे गेले तरी ते गुन्हा न नोंदवता घरी पाठवून देताना दिसतात. हुंडा प्रतिबंधक व कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा यासारखे कायदे असतानाही हे घडून येते. वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा, अशी मानसिकता बाळगणाऱ्यांकडून मुलाऐवजी मुलगी जन्मास आल्यानंतर होणारा ‘ती’चा छळ अगर उपेक्षा हादेखील यातील चिंतेचा विषय ठरावा. या सर्वच बाबतीत नातेच पणास लागते, म्हणूनच नात्यांमधील आपलेपणाचे, विश्वासाचे, मर्यादांचे-ममत्वाचे बंध सैल होताहेत का, हा प्रश्नच पडावा.मुळात, संस्कारांत कमतरता राहिली तर हे प्रकार घडून येतात, हेच याचे उत्तर देता यावे. कौटुंबिक विभक्तपणातून आजची पिढी एकटी होत चालली आहे. जरा काही चुकले तर तिचा कान धरणारा कुणी उरला नाही. आजी-आजोबा गावात आणि मुलं नोकरी-व्यवसायासाठी शहरात येऊन राहणा-या मम्मी-डॅडींसोबत. आई-वडिलांनाही मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यात सोशल माध्यमांचे फॅड व त्यातील प्रत्येकाचेच गुंतणे इतके वाढले आहे, की एकाच घरात, छताखाली सोबत राहूनदेखील मुले पालकांपासून व पालक हे मुलांपासून विभक्त झाल्यासारखे वागताना-राहताना दिसून येतात. अशातून कसे वा कोणते व्हावेत संस्कार, हा प्रश्न आपसूक निर्माण होतो. नोकरी व करिअर मागे धावणा-या पालकांना वेळ कुठे आहे संस्कारांचे धडे द्यायला? फिल्मी कॉन्सर्ट्सना गर्दी वाढत चालली आहे, तर कीर्तन-प्रवचनांना येणारी संख्या रोडावत, हे आजचे चित्र आहे. यातील सारेच चुकीचे, चिंतेचे आहे अशातला भाग मुळीच नाही; पण कुटुंबातल्या घटकांचे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होते आहे व जिथे असे होते आहे तिथे नात्यांचे बंध सैल होत जाताना दिसतात. चिंतेचा, समस्येचा, काळजीचा किंवा विचाराचा मुद्दा तो आहे. हे सैल होऊ पाहणारे बंध घट्ट कसे करता अगर राखता यावेत? जगण्यासाठी धावण्याच्या स्पर्धेमागे न लागता कुटुंबीयांसाठी वेळ दिला गेला तर त्यातून नात्यांची वीण नक्कीच मजबूत होऊ शकेल. मुलांचे एकारलेपण घालवून त्यांना कुटुंबीयांच्या नात्यासोबत उमलू दिले, तर त्यातून हे बंध बळकट होतील. प्रत्येक कुटुंबातील पालकांनी व समाजात पुढारपण करणा-या नेत्यांनी, समाजशास्त्रींनी याकडे गांभीर्याने बघायला हवे इतकेच यानिमित्ताने.
नात्यांचा बंध का होतोय सैल?
By किरण अग्रवाल | Published: June 27, 2019 8:03 AM