इंटरनेटच्या सर्वव्यापी संचाराने जगभरातली सामाजिक आणि राजकीय समीकरणे बदलवायला घेतली, त्याच्या प्रारंभकाळाचा एक नायक म्हणजे ज्युलियन असांज! अमेरिकेसह अन्य देशांच्या गुप्त उचापतींची लक्तरे बेधडकपणे जगाच्या वेशीवर टांगणारे ‘विकिलिक्स’ हे संकेतस्थळ अडचणीच्या राजकीय (आणि पुढे आर्थिकही) गौप्यस्फोटांमुळे चर्चेत आले, त्याला आता बारा वर्षे उलटली.
सामान्य नागरिकांपासून ‘लपवून ठेवण्याची गुप्त रहस्ये’ नजरेआड ठेवणे आणि आपले राजकीय हेतू साधत राहणे आता नव्या तंत्रज्ञानाच्या युगात शक्य होणार नाही, याचा हा प्राथमिक सुगावा जगभरच्या जागरूक नागरिकांना दिलासा देणारा ठरला होता, हे खरे! सत्ताधाऱ्यांची गुपिते फोडून सत्याची पाठराखण करण्याची जबाबदारी असलेली पारंपरिक माध्यमे संशयाच्या भोवºयात आलेली असताना हा असा धाडसी आणि कुणाही भांडवलदाराच्या थैल्यांची गरज नसलेला आधुनिक पर्याय ही जणू नव्या फेरमांडणीची नांदीच आहे, म्हणून प्रारंभी विकिलिक्स आणि तत्सम प्रयोगांकडे पाहिले गेले. पण बघताबघता परिस्थिती बदलत गेली आणि एकेकाळी ‘सत्याचा पाठीराखा’ म्हणून जगभरात गौरवला गेलेला असांज आपल्या उचापतींमुळे ‘इन्फर्मेशन अनार्किस्ट’ म्हणून टीकेचा धनी ठरून कायद्याच्या कचाट्यात अडकला. २00६ साली असांजने विकिलिक्सची स्थापना केली. सामाजिक हिताची गुप्त माहिती उघड करू इच्छिणाºया ‘व्हिसल ब्लोअर्स’साठी त्याचा तो सुप्रसिद्ध ‘डेड लेटर बॉक्स’ खुला केला.
विविध देशांच्या नियम-कायद्यांच्या जंजाळातून या ‘व्हिसल ब्लोअर्स’ना संरक्षण देणारे इन्क्रिप्शन ही विकिलिक्सची खासियत! खाण्या-पिण्याची शुद्ध नसलेला हरफनमौला स्वभाव, सतत आपला ठिकाणा बदलत राहणे, गुप्त जागा शोधून विकिलिक्सचे काम चालवणे अशा अनेक कथांनी असांजला हीरो बनवले. त्याला जगवणे हे जणू आपले जीवितकार्य आहे अशा भावनेने स्वातंत्र्यवादी संघटना असांजच्या पाठी उभ्या राहिल्या. २0१0 च्या एप्रिल महिन्यात अमेरिकन सैनिक लष्करी हेलिकॉप्टरमधून इराकमधल्या सामान्य नागरिकांना गोळ्या घालून टिपत असल्याची एक चित्रफीत विकिलिक्सवर ‘लिक’ केली गेली आणि जगभर गदारोळ उठला. त्यामागोमाग अफगाणिस्तान आणि इराकच्या युद्धाशी संबंधित अमेरिकन संरक्षण खात्याची अतिसंवेदनशील अशी कागदपत्रे विकिलिक्सवर फुटली. त्याच वर्षी इंग्लंडमध्ये असांजला अटक झाली, जामीनही मिळाला, पण त्याला पुन्हा अडकवले ते स्वीडनने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटने!
स्टॉकहोम येथे एका महिलेशी जबरदस्तीने लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपाखाली असांज अडकला. ती लढाई लढत असताना अमेरिकेच्या प्रत्यार्पणातून वाचण्यासाठी असांजने इक्वेडोरकडे राजकीय आश्रय मागितला. या देशाच्या लंडन येथील वकिलातीत त्याने तब्बल सात वर्षे काढली. इक्वेडोरने असांजला पुरवलेले कवच काढून घेतल्याने लंडन पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे आणि असांजचे अमेरिकेला प्रत्यार्पण केले गेले तर पुढे काय? या प्रश्नावरून जगभरात पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे. २0१६ सालच्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाºया रशियन हस्तक्षेपाचा म्होरक्या असांजच होता, असा वहीम आहे. अमेरिकन लष्कराची माजी अधिकारी चेल्सी मैनिंग हिने असांजच्या मदतीने लष्करी संगणकाचा पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आता असांजची रवानगी अमेरिकेला केली गेलीच, तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासन असांजला अडकवेल आणि त्याचे निमित्त करून नेहमीच्या कामासाठी माहिती जमा करण्याच्या पत्रकारांच्या स्वातंत्र्यावरच अप्रत्यक्ष बंधने आणेल, असे इशारे अमेरिकन माध्यमे देऊ लागली आहेत.
सरकारच्या दृष्टीने गुप्त आणि संवेदनशील असलेली माहिती प्रसिद्ध करणे हा गुन्हा आहे की ती माहिती मिळवण्याच्या पद्धती आणि त्यासाठीचे प्रयत्न हा गुन्हा; या प्रश्नाला असांजच्या अटकेने आता पुन्हा तोंड फोडले आहे. अटकेतला असांज हे ट्रम्प यांच्यासाठी मोठे सावज ठरले, तर अमेरिकेत माध्यम-स्वातंत्र्याचा गळा दाबला जाईल, अशी धास्ती निर्माण होणे, याहून असांजचा दुसरा मोठा पराभव काय असेल?