- नंदकिशोर पाटील
राज्यघटनेतील लोककल्याणकारी संघराज्याच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्यात पंचवार्षिक योजनांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. लोकशाहीची तत्त्वे तळागाळापर्यंत रुजवायची असतील तर सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, या नीतीवर पंचवार्षिक योजनांची आखणी करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होताच. त्यामुळे जोसेफ स्टालिन यांनी सोव्हिएत युनियनमध्ये यशस्वीपणे राबविलेल्या पंचवार्षिक योजनेचे प्रारूप नेहरूंनी भारतात आणले आणि १९५१ मध्ये पहिली पंचवार्षिक योजना लागू केली.
स्वतंत्र भारताच्या विकासाची वाट कृषी क्षेत्रातून काढता येऊ शकते, यावर ते ठाम होते. म्हणूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी-औद्योगिक विकास आणि सिंचन योजनांवर भर देण्यात अला. हिराकूड, भाक्रा-नांगलसारख्या धरणांची पायाभरणी केली. कधीकाळी अमेरिकेतील गव्हावर विसंबून राहणारा देश बघताबघता अन्नधान्याच्या बाबतीत नुसता स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देश बनला. नेहरूंची दूरदृष्टी आणि पंचवार्षिक योजनांची ही फलश्रुती आहे.
गेल्या ७४ वर्षांच्या कालखंडात आजवर बारा पंचवार्षिक योजना झाल्या. हरितक्रांती, श्वेतक्रांती, अणुऊर्जा, अण्वस्त्र निर्मिती, औद्योगिक विकास, संगणक क्रांती आणि जागतिकीकरण असे महत्त्वाचे टप्पे पार करत भारताची आज विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल सुरू आहे.
पंचवार्षिक योजनांचे फलित काय?- भारताच्या आर्थिक विकासाची पायाभरणी- सर्वसमावेशक विकास सूत्राची अंमलबजावणी- कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण- औद्योगिक विकासाला चालना- शिक्षणाचे सार्वत्रीकरण, साक्षरता वाढली- हरितक्रांती, धवलक्रांती- अवकाश संशोधनात भरारी- अण्वस्त्रांची निर्मिती- पायाभूत सुविधांचा विकास- दळणवळण सुलभ- सिंचन क्षमतेत वृद्धी- आदिवासी, मागास वर्गांचा विकास