- रवी टाले
एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञान किंवा आयटी हा परवलीचा शब्द झाला आहे. विदा (डेटा) आणि माहितीची साठवणूक व पाहिजे तेव्हा वापर करण्यासाठी केलेला संगणकाचा वापर म्हणजे माहिती तंत्रज्ञान! अर्थात माहितीच्या आदानप्रदानात महत्वपूर्ण भूमिका बजावत आलेल्या रेडिओ, टेलिव्हिजन, टेलिफोन आणि मोबाइलसारख्या तंत्रज्ञानाचा समावेशही माहिती तंत्रज्ञानाच्या व्यापक व्याख्येत करावा लागतो. भारतात रेडिओचे आगमन ब्रिटिश कालखंडातच झाले. मात्र, टेलिव्हिजनचे आगमन आणि प्रसार देशात उशिराच झाला. टेलिफोनही ब्रिटिशांनीच भारतात आणला; मात्र तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यास विसाव्या शतकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला. मोबाइलचा प्रसार मात्र भारतात फार झपाट्याने झाला. आज तर देशातील दैनंदिन व्यवहार मोबाइलच्याच बळावर सुरू आहेत.
१९६७ मध्येच टाटा उद्योग समूहाने भारतात आयटी क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली होती. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही भारतातील पहिली आयटी कंपनी! त्यानंतर सहा वर्षांनी मुंबईत सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन (सिप्झ) उभारण्यात आला. सिप्झ हे भारतातील पहिले आयटी पार्क! १९८० पासून सिप्झमधून सॉफ्टवेअरची निर्यात होत आहे. आताही आयटी निर्यातीत भारत पुढे असून जगातील अनेक आयटी कंपन्यांमध्ये भारतीयांचे वर्चस्व आहे. तिथे अनेक जण बॉस आहेत...
संगणक युगाचा प्रारंभस्व. राजीव गांधींनी देशात संगणकीकरणाच्या युगाचा प्रारंभ केल्यानंतर आयटी क्षेत्र झपाट्याने विस्तारले. आज भारत हा जगातील सर्वात मोठा आयटी निर्यातदार देश आहे! त्यामुळे आयटी क्षेत्राचा वेलू गगनावरी गेला, असे निश्चितपणे म्हणता येते.
७९% देशाला निर्यातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलापैकी तब्बल ७९ टक्के महसूल एकटे आयटी क्षेत्रात मिळवून देते. येत्या काळातही समृद्ध, संपन्न व बलशाली भारताच्या निर्माणामध्ये आयटी क्षेत्र खूप मोलाची भूमिका बजावेल.