- अॅड. प्रकाश आंबेडकर, माजी खासदार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्षवेगवेगळ्या टप्प्यावर स्वातंत्र्य लढा सुरू असताना सवर्णांना स्वत:ला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य हवं होतं आणि उरलेल्यांना सवर्णांकडून आपलं स्वातंत्र्य पाहिजे होतं, अशी परिस्थिती होती. या सगळ्यांना वाटलं की, ब्रिटिश बेस्ट एम्पायर आहेत. त्यामुळे त्या वेळी जो वाद झाला, सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय स्वातंत्र्य? तर बाबासाहेब म्हणत होते की, सामाजिक स्वातंत्र्य आलं की राजकीय स्वातंत्र्य आलं. दोन्ही स्वातंत्र्य मिळाली तर देश उभा राहू शकतो आणि महात्मा गांधी म्हणत होते की, राजकीय स्वातंत्र्यातून सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य मिळेल. आज जे दिसतंय की, या लढ्यात बाबासाहेब जे म्हणत होते, तेच वास्तवात दिसत आहे. तेच वस्तुस्थितीला धरून होते असं आपल्याला म्हणता येईल.दुसऱ्या जागतिक महायुद्धात काँग्रेसची कोंडी झाली होती. जगामध्ये लोकशाही का हुकूमशाही असा जो लढा झाला, या लढ्यात काँग्रेसने हुकूमशाहीची बाजू उचलून धरली. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला महत्त्व देऊन ब्रिटिश चले जावची घोषणा दिली. त्याच्यामुळे एका बाजूला राजकीय स्वातंत्र्याचा लढा आणि दुसºया बाजूला सामाजिक स्वातंत्र्याचा लढा दोन्ही पातळ्यांवर सुरू होता. सामाजिक स्वातंत्र्याचा लढा आवश्यक होता. किंबहुना त्या लढ्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य निरर्थक आहे, हेच बाबासाहेब म्हणत होते. ते पुढे महाडच्या सत्याग्रहातून दिसले. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहातून अधिकच अधोरेखित झाले. या लढ्यानंतरही सवर्णांनी भूमिका काही बदलली नाही. मंदिराचा प्रवेश कायद्याने मान्य करण्यात आला आणि अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने बंदी करण्यात आली. पण, अजूनही कोणत्याही सवर्ण संघटनांनी अस्पृश्यता आणि मंदिर प्रवेश नाकारणे हे चुकीचे आहे, असा निषेधही केलेला नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक स्वातंत्र्याला बगल देण्यात आली. हे हिंदू कोड बिलाच्या प्रसंगातून दिसले आहे. त्याच्यामुळे स्वातंत्र्य हे सामाजिक आणि राजकीय अशा दोन लढ्यांचा भाग आहे, असं म्हटलं पाहिजे.आज कोरोनाचे थैैमान सुरूअसतानाही ज्या प्रकारच्या लोकशाहीविरोधी कृती केल्या जात आहेत, त्या पाहता राज्यघटनेचा ताबा सैैतानांनी घेतला आहे, असे म्हणता येण्यासारखी परिस्थिती आहे. हिंदू स्त्रियांना संपत्तीत वाटा देण्याचा निर्णय आता झाला आहे. त्याआधीच बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सर्वच स्त्रियांच्या उन्नतीचा मार्ग दाखविला होता. बाबासाहेबांची दूरदृष्टीबरोबर होती. स्वातंत्र्याची त्यांची व्यापक संकल्पना, जातिअंत, आर्थिक समता व स्त्री-पुरुष समतेसह राष्ट्र पुढे जाऊ शकते अन्यथा कष्टाने मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्याचा प्रश्न उभा राहतो.
Independence Day: सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य निरर्थक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 5:11 AM