नवा पाकिस्तान उभे करण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेले ख्यातनाम क्रिक्रेटपटू आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांना पद सोडावे लागले. पंचाहत्तर वर्षांच्या पाकिस्तानात एकाही पंतप्रधानाने पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली नाही. त्याच माळेत इम्रान खानदेखील जाऊन बसले आणि परकीय सत्तेमुळे आपले सरकार अस्थिर करण्यात आल्याचा आरोप करत नव्याने राजकीय लढाई सुरू करण्याची घोषणा केली. आजवर तीन पंतप्रधानांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाले; पण इम्रान खान हे पराभूत होणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत ३४२ सदस्य आहेत. बहुमतासाठी १७२ सदस्यांची गरज असताना इम्रान खान यांच्या पक्षाला १५५ जागा मिळाल्या होत्या. काही मित्रपक्षांच्या मदतीने ते सत्तेवर आले होते. त्या मित्रपक्षांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांचे २३ सदस्य होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने हातमिळवणी केली आहे. याच दोन पक्षांमध्ये पूर्वी विस्तव जात नव्हता. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ विरुद्ध दिवंगत नेत्या बेनझीर भुत्तो यांच्यात अनेक वर्षे संघर्ष होता. इम्रान खान तीन वर्षे सात महिने पंतप्रधानपदी राहिले. मात्र, त्यांच्या कार्यकाळात देशाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच गेली.
देशाच्या डोक्यावर ढोबळ उत्पन्नाच्या ४३ टक्के इतका विदेशी कर्जांचा डोंगर आहे. चलनाचे अवमूल्यन झाले, महागाईने कळस गाठला आहे, शिवाय परराष्ट्रीय धोरण त्यांना नीट सांभाळता आले नाही. चीनचा प्रभाव पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर वाढल्याने त्या देशाच्या कलेने परराष्ट्रीय धोरण स्वीकारावे लागते. नेहमी अमेरिकेच्या छायेखाली राहणाऱ्या पाकिस्तानवर आता अमेरिका पण रूसली आहेे. अशाप्रकारे चोहोबाजूने संकटात सापडलेल्या इम्रान खान यांना राजकीय मुत्सद्दीपणा दाखविता आला नाही.
अर्थव्यवस्थेला सावरता आले नाही. परिणामी स्वपक्षातही असंतोष वाढीस लागला. या सर्व घडामोडींत भारताच्या परराष्ट्र धोरणांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले तेव्हा विरोधकांनी त्यांच्यावर तोंडसुख तर घेतलेच, शिवाय भारत आवडत असेल तर त्या देशात जाऊन राहण्याचा सल्ला दिला जाऊ लागला. इम्रान खान यांनी शरीफ-भुत्तो या घराण्यांच्या भ्रष्ट कारभाराने त्रस्त झालेल्या पाकिस्तानी जनतेला आवाहन करत सत्ता संपादन केली. मात्र, त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते, अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था सांभाळणे महत्त्वाचे होते. अफगाणिस्तानचे युद्ध संपल्याने अमेरिकेने पाकिस्तानची मदत कमी केली. परिणामी पाकिस्तानने चीनवर अवलंबून राहणे वाढविले. त्याची किंमत मोजावी लागली. रशिया-युक्रेन युद्धामध्ये पाकिस्तानच्या भूमिकेला फारसे महत्त्व नव्हते. संपूर्ण पाश्चिमात्य राष्ट्रे रशियाच्या विरोधात असताना इम्रान खान यांनी मास्कोची वारी केली. त्यावर चीनही रागावला. अमेरिकेने मदतीचा हात आणखी आखडता घेण्याचा निर्णय घेतला. ही सर्व परिस्थिती हाताळणे इम्रान खान यांना जमले नाही.
इम्रान खान यांना सर्वच राष्ट्रांचा पाठिंबा गमवावा लागला. त्यामुळे अखेर इम्रान खान यांना सरकार गमवावे लागले. मुस्लिम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीकडे बहुमताइतकी सदस्यसंख्या असल्याने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे छोटे बंधू शाहबाज शरीफ यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला. माजी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनीच शाहबाज शरीफ यांचे नाव सुचविले आहे. त्यामुळे त्यांची निवड होणार हे स्पष्ट होते. शाहबाज शरीफ यांचा पंजाब प्रांतात प्रभाव आहे. पंजाबचे तीनवेळा मुख्यमंत्रिपद त्यांनी भूषविले आहे. प्रशासनाचा त्यांना अनुभव आहे शिवाय सध्या ब्रिटनमध्ये राहणारे त्यांचे बंधू माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे.
पाकिस्तानच्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर नवाझ शरीफ यांचे लंडनहून रमजान संपताच आगमन होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानची बिघडलेली अर्थव्यवस्था आणि पक्षाचे बहुमत नसताना विद्यमान नॅशनल असेंब्लीची उर्वरित दीड वर्षे सरकार चालविणे ही तारेवरची कसरत आहे; शिवाय इम्रान खान यांचा पक्ष तेहरिक-ए-इन्साफ सातत्याने रस्त्यावर उतरून असंतोषात भर घालत राहणार आहे. भारताने या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून सीमेवर आणि विशेष करून काश्मीरमध्ये दक्ष राहिले पाहिजे. पाकिस्तानचे सत्तांतर हे दक्षिण अशिया खंडात असंतोषाची ठिणगीच असणार आहे.