चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि त्या देशाचे पंतप्रधान ली केकियांग यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा संदेश पाठवून त्यांचे अभीष्टचिंतन केले आहे. आंतरराष्ट्रीय सौजन्याच्या प्रथेनुसार अशा अभीष्टचिंतनांची उत्तरे तात्काळ येतात वा दिली जातात. मात्र झी किंवा जियाबो यांना त्या सौजन्याची जाण नसावी किंवा मोदींचा संदेश आजच्या स्थितीत त्यांना दखलपात्र वाटला नसावा. त्यांनी मोदींना कुठलेही उत्तर पाठविले नाही. त्याऐवजी त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने व संरक्षण खात्याने भारताला एक खलिता पाठवून डोकलाम क्षेत्रातून आपले सैन्य तात्काळ मागे घ्या अन्यथा आम्हाला तेथे जास्तीचे लष्कर पाठवावे लागेल अशी धमकी ऐकविली आहे. प्रत्यक्षात तिबेटच्या दक्षिणेला चीनने त्याच्या लष्कराच्या तीन मोठ्या ब्रिगेडस् आता उतरविल्या आहेत. शिवाय तोफखान्याची पथकेही तेथे तैनात केली आहेत. भूतान, सिक्कीम, भारत व चीन यांच्या सीमा ज्या डोकलाम क्षेत्रात एकत्र येतात तेथे भारतीय सेना चीनच्या सैन्यासमोर गेल्या दीड महिन्यांपासून उभी आहे. या सेनेने चीनचे त्या क्षेत्रातील बांधकाम रोखून धरले आहे. चीनच्या मते तो प्रदेश त्याचा असल्यामुळे त्यात रस्ते व अन्य बांधकाम करण्याचा त्याला अधिकार आहे. भारताचा आक्षेप या प्रदेशाच्या मालकीबाबतचा जसा आहे तसाच तो चिनी बांधकाम भारताच्या उत्तर सीमेवर एक लष्करी आव्हान उभे करील असाही आहे. सबब दोन देशांची सैन्ये समोरासमोर उभी आहेत आणि त्यांची सरकारे परस्परांशी एक निष्परिणाम पत्रव्यवहार व बोलणी करण्यात गुंतली आहेत. चीनची आताची धमकी गंभीर आहे. आपण आपले सैन्य मोठ्या प्रमाणावर डोकलाम क्षेत्रात उतरविणार आहोत असे त्याने भारताला सांगून टाकले आहे. तसे सांगताना ‘एकदा पर्वत हलवता येईल पण चीनचा इरादा कोणालाही विचलित करता येणार नाही’ असेही त्याने म्हटले आहे. शिवाय त्या देशाला कोणतीही पूर्वसूचना न देता प्रत्यक्ष युद्ध सुरू करण्याची सवय आहे आणि ती भारताने १९६२ मध्ये अनुभवली आहे. आश्चर्य याचे की हे सारे घडत असताना याचा ज्या दोन देशांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे ते भूतान व नेपाळ हे देश त्याविषयी गप्प राहिले आहेत. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी भारताने घेतली असल्यामुळे त्यांचे हे मौन एकीकडे समजण्याजोगे पण दुसरीकडे त्यांची कृतघ्नता उघड करणारेही आहे. भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवल हे सध्या चीनमध्ये त्या सरकारच्या अधिकाºयांशी चर्चा करीत आहेत. पुढे चीनमध्येच होऊ घातलेल्या ब्रिक्स परिषदेतही या वाटाघाटी स्वतंत्रपणे चालू राहतील असे भारताचे म्हणणे आहे. चीनचे अधिकारी मात्र त्याविषयी आपले कोणतेही मत व्यक्त करताना दिसले नाहीत. हा प्रकार आपली अगतिकता व चीनची मग्रुरी सांगणारा आहे. एवढ्या सबंध काळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याखेरीज जगातल्या एकाही राजकीय नेत्याने या स्फोटक परिस्थितीबद्दल आपले मत जाहीर केले नाही. ट्रम्प यांनीही या स्थितीत युद्ध नको, वाटाघाटी हव्या असा सल्ला भारत आणि चीन यांना दिला आहे. मात्र चीनचा हट्ट असा की भारताने त्याच्या सैन्याची पथके डोकलाममधून मागे घेतल्याशिवाय आम्ही कोणतीही चर्चा करायला तयार नाही. अशी धमकी समोर असताना सैन्य मागे घेणे आणि चीनला सारी मोकळीक देणे ही बाब भारतासाठी पराभव ठरणारी आहे. जगातला कोणताही देश अशी मानहानी सहजगत्या पत्करणारही नाही. मात्र चीनची धमकी आणि त्याने भारताच्या उत्तर सीमेवर आणलेले सैन्य लक्षात घेता हे प्रकरण फार काळ चिघळत ठेवणे हेही भारताला परवडणारे नाही. केवळ सैन्य तैनात करून चीन थांबला नाही. त्याने तिबेटच्या पर्वतक्षेत्रात रणगाडे आणण्याचेही धारिष्ट्य केले आहे. चीनची युद्धविषयक तयारी मोठी आहे. तो अण्वस्त्रसज्ज देश आहे आणि त्याचे नाविक दल पॅसिफिक महासागरापासून हिंद महासागरापर्यंत आपला प्रभाव दाखविणारे आहे. शिवाय चीनच्या हवाई दलातही लढाऊ विमानांची संख्या फार मोठी आहे. त्या देशाने पाणबुड्यांचे एक मोठे पथक तयार केले असून त्याच्या जोडीला अनेक विमानवाहू जहाजेही आणली आहेत. अंगात पहिलवानी ताकद असलेल्या एखाद्या मुजोर माणसाने शेजारच्यांना आपल्या सामर्थ्याच्या धमक्या द्याव्या तसा हा चीनचा प्रकार गुंडगिरीच्या पातळीवर जाणारा आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम उल सुंग जे करतो नेमके तेच आता चीनने भारताबाबत करायला सुरुवात केली आहे. सबंध दक्षिण आशिया हे आपले प्रभाव क्षेत्र असावे ही त्यामागची त्या देशाची महत्त्वाकांक्षा आहे. त्याच्या सुदैवाने या क्षेत्रातील पाकीस्तान, श्रीलंका व म्यानमारसह अतिपूर्वेकडील देशही त्याच्या लष्करी सामर्थ्याने धास्तावून त्याच्या प्रभावाखाली गेले आहेत. शिवाय त्याने केलेल्या प्रचंड आर्थिक मदतीच्या ओझ्याखालीही ते राहत आहेत. चीनला आजपर्यंत नमविता न आलेला दक्षिण आशियातील एकमेव देश भारत हा आहे. त्यामुळे त्याचे लक्ष भारतातील लोकशाही विस्कळीत करणे हे राहणार आहे. चीनची हुकूमशाही हा साºया जगाच्या टीकेचा विषय आहे आणि त्याचेही त्या देशाच्या राज्यकर्त्यांना वाटणारे वैषम्य मोठे आहे. अशावेळी भारताची वाटचाल खंबीर असणे व त्याचवेळी ती लवचिक असणेही त्याच्या हिताचे आहे.
‘आधी चर्चा’: भारत, ‘आधी माघार’: चीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 2:03 AM