बर्फाचे तट उजळून गेले!
जम्मू-काश्मीरच्या लडाख भागातील उत्तुंग पर्वतरांगांवर, हाडे गोठवणाऱ्या थंडीत आमनेसामने उभे ठाकलेल्या भारतीय आणि चिनी सैन्यांनी माघारी फिरत एकमेकांना मिठाई वाटून दिवाळी साजरी केली! समस्त देशवासीयांसाठीच नव्हे, तर जगासाठी आनंदाची पखरण करणारी अशी ही बातमी आहे. आशिया खंडातील या दोन प्रमुख आणि अण्वस्त्रसज्ज देशांनी दिवाळीच्या मुहूर्तावर दाखवलेल्या या समजूतदारपणाने तणाव निवळून वातावरण सकारात्मक झाले आहे. गोठलेले संबंध पुन्हा पूर्ववत होण्याच्या अपेक्षेने हिमालयाच्या दोन्ही बाजूंना उबदारपणाची जाणीव होऊ लागली आहे.
चीनने एप्रिल २०२० मध्ये भारताच्या जम्मू-काश्मीरमधील लडाख प्रदेशात अचानक घुसखोरी केली. १५ जून २०२० रोजी गलवान येथे दोन्ही सैन्यांत झालेली झटापट म्हणजे उभय देशांतील संबंधांचा नीचांक होता. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. त्यातून चीनने घुसखोरी केलेल्या पँगाँग त्सो, गोग्रा, हॉट स्प्रिंग्ज या भागांतून सैन्य मागे घेण्याची तयारी दाखवली. ती प्रक्रिया लगेच पारही पडली. मात्र, देप्सांग पठार आणि डेमचोक या भागातून चीन सैन्य मागे घेण्यास तयार नव्हता. गेली चार वर्षे चाललेल्या कूटनीती चर्चेतून फारसे काही निष्पन्न होत नव्हते. पण गेल्या आठवड्यात ही कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली.
लडाखच्या देप्सांग आणि डेमचोक या भागांतून सैन्य मागे घेऊन तेथे लष्करी गस्त घालण्याबाबतचा करार झाल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी गेल्या सोमवारी जाहीर केले. त्या पाठोपाठ रशियातील कझान येथे पार पडलेल्या ब्रिक्स या संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची संघर्षानंतर प्रथमच समोरासमोर अधिकृत चर्चा झाली. त्यातही या कराराला दुजोरा देण्यात आला. सीमेवरील तणाव निवळून सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांच्या खास प्रतिनिधींमध्ये विस्तृत चर्चा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी होऊन दोन्ही देशांच्या सैनिकांनी मिठाई वाटून दिवाळी गोड केली. ती एक दिवाळी होती, १९६२ सालची.
पंचशील करार आणि त्यानंतर निर्माण झालेले हिंदी-चिनी भाई-भाईचे वातावरण गढूळ करत चीनने ऐन दिवाळीच्या दिवशी हिमालय पार करून लडाख आणि अरुणाचल प्रदेशात (तत्कालीन नेफा- नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी) आक्रमण केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि समस्त भारतवासीयांच्या काळजात खंजीर खुपसत विश्वासघात केला. तेव्हा साऱ्या भारतवासीयांच्या मुखी एकच भावना होती - बर्फाचे तट पेटुनि उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. आणि, आजची दिवाळी आहे. साडेचार वर्षांपूर्वी चीनने पुन्हा केलेल्या आगळिकीवर पांघरूण पडून दोन्ही सैन्यांनी मिठाई वाटली आहे. आता तेच बर्फाचे तट प्रेमाने उजळून निघाले आहेत.
हिमालयाच्या दोन्ही कुशींवर वसलेल्या जगातील दोन पुरातन संस्कृतींच्या मैत्रीची ग्वाही देत आहेत. युरोप-अमेरिका अंधारात चाचपडत होते, तेव्हा याच दोन संस्कृतींनी जगाला प्रकाशित केले होते. नालंदा-तक्षशिला यांसारख्या ज्ञानपीठांनी क्षितिज तेजाळले होते. इकडे भगवान बुद्धांनी जीवनाचा नवा मार्ग उजागर केला होता, तर तिकडे कन्फ्युशिअसचे तत्त्वज्ञान समाजाला दिशा देत होते. फाहियान, हुआनश्वांग यांसारख्या प्रवाशांनी दोन्ही संस्कृतींमधील बंध अधिक दृढ केले होते. ढाक्याची मलमल आणि चीनचे रेशीम रोमची बाजारपेठ फुलवत होते. दोन्ही देशांनी साम्राज्यवादी शक्तींविरुद्ध दिलेला लढा आफ्रिका आणि समस्त जगातील पिचलेल्या देशांसाठी सारखाच प्रेरणादायी ठरलेला.
आधुनिक जगात स्वतंत्रपणे दोघांनीही पाय ठेवले ते केवळ दोन वर्षांच्या अंतराने. त्यानंतरही भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूंनी दोन्ही देशांसाठी प्रगतीचे स्वप्न पाहिले ते एकत्रच. त्यातूनच नेहरूंची ‘एशियन मन्रो डॉक्ट्रिन’ साकारली होती. आशिया केवळ आशियावासीयांसाठी असेल. त्यात पाश्चिमात्यांची ढवळाढवळ नसेल. साम्राज्यवादाचा विस्तार होण्यापूर्वी जागतिक सकल उत्पन्नाच्या चाळीस टक्के वाटा एकत्रितपणे केवळ भारत आणि चीन यांचा होता. आता दोनशे वर्षांनंतर जागतिक अर्थकारणात ती परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. हा प्रवास संघर्षमय न होता सहकार्याचा झाला तर सर्व आशिया आणि जगासाठी तो तेजाची नवी कवाडे खुली करणारा ठरू शकतो. ऐन दिवाळीत उजळून निघालेले बर्फाचे तट आगामी प्रकाशपर्वाची ग्वाही देत आहेत.