- भारतकुमार राऊत (लोकमतचे माजी संपादक, माजी खासदार)
भारत-चीन सीमांवर वातावरण अत्यंत तणावपूर्ण व स्फोटक आहे, हेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत व गुरुवारी राज्यसभेत केलेल्या विस्तृत निवेदनांतून स्पष्ट झाले. त्यामुळेच आता ‘बर्फ वितळू लागले आहे’ या अलीकडच्या काळात ऐकू येऊ लागलेल्या वदंताना अर्थ नाही, हेही राजकीय जाणकारांच्या ध्यानात आले आहे. गेले चार महिने चीनने ज्या प्रकारच्या लष्करी हालचाली व सैन्याची जमवाजमव लडाखपासून अरुणाचलपर्यंतच्या बर्फाच्छादित प्रदेशात सुरू केली, त्यामुळे आता केव्हाही युद्धाची ठिणगी पडणार, असे दृश्य दिसू लागले होते.
दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या विषयात एका बाजूला चीन व दुसऱ्या बाजूला जागतिक राष्ट्रे यांच्यात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मुळात जयशंकर यांचा स्वभाव नेमस्त आणि त्यातून ते भूतपूर्व नोकरशहा. त्यामुळे या वादातील त्यांच्या उपस्थितीची फारशी दखल निर्ढावलेल्या चिनी नेत्यांनी घेतली नाही व कधी लडाख तर कधी अरुणाचल प्रदेश इथल्या चिनी सैन्याच्या बेकायदा हालचाली चालूच राहिल्या. त्याचीच गंभीर दखल घेऊन राजनाथ सिंह तातडीने स्वत:च लडाखच्या युद्धग्रस्त भागात गेले व त्यांनी तिथल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतानाच बर्फाळ प्रदेशात बोचºया थंडीत तळ ठोकून उभ्या भारतीय जवानांचे मनोबलही उंचावण्याचा परिणामकारक प्रयत्न केला.१९६२मध्ये चीनने भारतावर हल्ला केला व भारताला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्यानंतर तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेव्हाचे संरक्षणमंत्री व्ही.के. कृष्ण मेनन यांना दूर करून त्या पदावर महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांना आणले. या पदाची सूत्रे हाती घेताच ऐन थंडीच्या कडाक्यात यशवंतराव थेट उत्तर सीमेवर पोहोचले व तिथे हिमालयाच्या पर्वतराजींत खंदकांत व कापडी छावण्यांत राहणाºया भरतीय जवानांची त्यांनी भेट घेतली. हेच काम राजनाथ सिंह यांनी केले.राजनाथ सिंह यांची देहयष्टी व स्वभाव सीमांवर लढणाºया जवानांसारखाच रांगडा आहे. त्यांना सैनिकांची भाषा व मन:स्थिती समजते. स्वत: राजनाथ सिंह लडाखला येऊन गेल्याने एका बाजूला भारतीय जवान व दुसºया बाजूला मस्तावलेले चिनी राज्यकर्ते या दोघांचीही भाषा आमूलाग्र बदलली. भारताच्या दृष्टीने हे सुचिन्ह ! राजनाथ सिंह यांनी भारत-चीन वादाबद्दल लोकसभेत विवेचन केले, तेव्हा काँग्रेससह विरोधी बाकावरील खासदारांनी सभात्याग केला. त्यामुळेच राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत पुन्हा भाषण करण्याचा निर्णय घेतला व यावेळी प्रश्नोत्तरेही होतील, असे आश्वासन दिले. त्यामुळेच त्यांचे राज्यसभेतील भाषण निर्विघ्न पार पडले. यावेळी काँग्रेसचे गुलाम नबी आजाद व माजी संरक्षणमंत्री ए.के. अँथनी यांच्यासह सर्वांनी भारताच्या भूमिकेचे स्वागत केले. त्यामुळे भारताची बाजू अधिक मजबूत झाली आहे.भारत-चीन यांच्यातील वैराला जुनी पार्श्वभूमी आहे. चीनवर माओ-त्से-तुंग व चाऊ एन लाय या जोडगोळीची सत्ता असल्यापासूनच चीनने भारताच्या विरुद्ध लष्करी कारवाया सुरू केल्या होत्या. एका बाजूला ‘हिंदी-चिनी भाई भाई’ अशी घोषणा चाऊ देत असतानाच दुसºया बाजूला हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये चिनी सैन्य घुसत होते. लष्करी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून नेहरूंनी शांततेचे धोरण कायम ठेवले. अखेर व्हायचे तेच झाले व ऐन आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या थंडीत चिनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ हिमालयाच्या शिखरांवरून भारतात घुसली. भारतीय सैन युद्धाच्या तयारीत नव्हतेच, शिवाय सैन्याकडे पुरेशी शस्रसामग्रीही नव्हती. त्यामुळेच सैन्याला मानहानीकारक पराभव पत्करून माघार घ्यावी लागली. त्याचा साद्यंत वृत्तांत जनरल बी. एन. कौल यांच्या ‘द अनटोल्ड स्टोरी’ या ग्रंथात आहेच.माओच्या निधनानंतर कर्मठ साम्यवादाच्या जागी चीनने ‘मार्केट सोशालिझम’ अंगीकारला व बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये बीजिंगमध्ये दिसू लागली. पण सुंभ जळला, तरी पीळ मात्र कायम असल्याचे चीनच्या भारताविषयीच्या अनेक धोरणांमुळे वारंवार दिसून आले. नजीकचा पूर्वेतिहास पाहिला, तर चीन आजही भारताला ‘मित्र’ नव्हे, तर ‘शत्रू’च मानतो, हे स्पष्टच आहे. राजीव गांधी व पी.व्ही. नरसिंह राव या दोन पंतप्रधानांनी चीनचे अधिकृत दौरे केले. त्यामुळे संबंध सुधारले, असे वाटू लागले. १९९३ व १९९६मध्ये उभय देशांत जे सामंजस्य करार झाले, त्याप्रमाणे लडाख जवळील गलवान टेकड्यांच्या परिसरात कुणीही लष्करी कारवाई करायची नाही, तसेच त्या भागांत सैनिकांनी शस्रेही बाळगू नयेत असे ठरले. पण जून महिन्यात ‘गलवान’ प्रकरण घडले. अशा तप्त व तणावपूर्ण स्थितीत इतक्यात दिलजमाई होण्याची शक्यताच नाही, हे स्पष्ट आहे.राजनाथ सिंह यांचे लोकसभेतील निवेदन यासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे काही डाव्या मंडळींच्या नाकाला मिरच्या झोंबणे नैसर्गिक व क्रमप्राप्त आहे. पण राष्ट्राभिमान व राष्ट्र संरक्षण या गोष्टी सध्या अधिक मोलाच्या व महत्त्वाच्या आहेत. आता थंडीचे दिवस येत आहेत.अशा काळातच चीनकडून युद्धाचा अधिक धोका संभवतो. भारत व चीन यांची उत्तरेपासून ईशान्येपर्यंत पसरलेली दुर्गम सीमारेषा पाहिली, तर इतक्या मोठ्या सीमेवर भारताला सैन्य उभे करावे लागणार आहे. हे काम अशक्य नसले, तरी सोपेही नाही. अशा वेळी शक्यतो युद्धजन्य परिस्थिती टाळणे महत्त्वाचे. मात्र ही शांतता सशाची नसून सिंहाची आहे, इतका संदेश संरक्षणमंत्र्यांच्या भाषणातून चीनला पोहोचला, तरी पुरे !