भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूंत चुका समजून घेऊन त्या सुधारण्याची क्षमता आहे. आफ्रिका-इंग्लंडमध्ये झालेल्या चुकांवर गंभीररीत्या मंथन करण्यात आले. संघाच्या या परिश्रमाला यश आले. ऑस्ट्रेलिया दौºयात कसोटी आणि वन डे मालिका जिंकणा-या संघाने कामगिरीतील सातत्याच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयासाठी ७१ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. इतक्या वर्षांत आॅस्ट्रेलियाला त्यांच्या देशात लोळविणे भारताला जमले नव्हते. विराट आणि त्याच्या सहकाºयांनी ते सोपे करून दाखवले. यामागे खेळाडूंचे परिश्रम तर होतेच शिवाय सांघिक भावनेचे बळ होते. समोर एखादे ध्येय ठेवणे, ते गाठण्याची जिद्द बाळगणे, चिकाटी तसेच आत्मविश्वासाने प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश तुमच्यामागे धावते हे भारतीय संघाने सिद्ध केले. भारताचा आॅस्ट्रेलिया दौरा सामूहिक कामगिरी अधोरेखित करणारा ठरला. आफ्रिका आणि इंग्लंडमधील पराभवामुळे कुठल्याही स्थितीत भारताला जिंकणे गरजेचे झाले होते. भारताने सुरुवातीपासूनच आॅस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले. १९४७-४८ पासून भारताने आॅस्ट्रेलियाचे किमान बारा दौरे केले, पण उसळत्या खेळपट्ट्यांवर मात करण्यासाठी २०१९ हे वर्ष सुफळ ठरले. भारतच नव्हे तर आशियातील कुठल्याही संघाला आॅस्ट्रेलियात मालिका विजय मिळवता आलेला नाही. मालिका सुरू होण्यापूर्वीपासून भारताला विजयाचा दावेदार संबोधण्यात येत होते. चेंडू कुरतडल्याच्या आरोपात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत आॅस्ट्रेलिया कमकुवत वाटतो, असे अनेकांचे मत होते. पण कोणताही संघ आपल्या घरी अधिक बलवान असतो. आॅस्ट्रेलिया तर प्रत्येक बाबतीत सरस होता. दोन खेळाडूंची अनुपस्थिती त्यांना तितकी जाणवली नाहीच. कमकुवत संघावर भारताने मालिका विजय नोंदवला, असे कुणी म्हणणे हास्यास्पद ठरेल. भारताच्या सांघिक कामगिरीचे बळ आणि २० कसोटी बळी घेणारी बलाढ्य गोलंदाजी ही विजयाची द्विसूत्री ठरली, हे टीकाकारांना कबूल करावेच लागेल. आॅस्ट्रेलियाने प्रत्येक सामन्यासाठी सर्वोत्तम संघ निवडला होता. भारतीय गोलंदाजांनी वर्षभरात २५० हून अधिक गडी बाद केले. आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियात शमी, ईशांत, उमेश, बुमराह या जलद गोलंदाजांसह फिरकी माºयापुढे प्रतिस्पर्धी फलंदाज नतमस्तक झाले. आॅस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत होती हे एक वेळ कबूल केले तरी गोलंदाजी मात्र नक्कीच बोथट नव्हती. खेळपट्ट्यादेखील त्यांनी त्यांना लाभदायी ठराव्यात अशाच तयार केल्या होत्या. पाच महिन्यांआधी इंग्लंडमध्ये विराट एकटा लढला, त्यामुळे ३०० वर धावा उभारता आल्या नव्हत्या, पण येथे एक-दोन नव्हे तर दरवेळी किमान चार फलंदाज योगदान देत राहिले. विराटच्या सोबतीला पुजारा आणि ऋषभ पंतसारखे युवा फलंदाज होते. एकूणच दुसºया कसोटीचा अपवाद वगळता संपूर्ण मालिकेत भारताने दहशत गाजवली. क्रिकेटचा दर्जा उंंचावण्यात रणजीचे योगदान कमी नाही. यामुळे मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विजय शंकर हे युवा गवसले. मयंकच्या रूपात चांगला सलामीवीर पर्याय म्हणून पुढे आला आहे. अनेक वर्षांनंतर आशियाबाहेर वेगवान गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत भारतीय फलंदाज वरचढ ठरले. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा पाहून चाहते सुखावले. फलंदाजांनी धावा उभ्या केल्यामुळे गोलंदाजांची हिंमत वाढत गेली, मग त्यांनीही चोख काम करीत प्रतिस्पर्धी फलंदाजांचा सफाया केला. आॅस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयाने भारतीय संघामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. धोनी, कोहली, चेतेश्वर पुजारा यासारखे खेळाडू हे ‘रोल मॉडेल’ आहेत. काहींच्या मते धोनी हा क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडूंपैकी एक असला तरी त्याचे पाय जमिनीवरच आहेत. मे महिन्यात विराट आणि सहकाºयांना आणखी नव्या दमाने उतरावे लागणार आहे. त्यासाठी खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. गेल्या काही दिवसांत उपयुक्त गोलंदाजांना आराम देण्याचे धोरण अवलंबण्यात आले. विश्वचषकात बुमराह, भुवनेश्वर आणि शमी हे फिट असायला हवेत. कुलदीप, जडेजा, चहल हे फिरकीचे त्रिकूटही सज्ज असेल. आॅस्ट्रेलियात मिळालेला विजय म्हणजे फक्त सुरुवात आहे. खरी परीक्षा विश्वचषकामध्ये होईल. विराट कोहलीच्या डोळ्यासमोर विश्वचषकाचे ध्येय आहे. ते गाठण्यासाठी त्याने वर्षभरापासून जिद्दीने तयारी सुरू केली आहे. सर्व काही मनाप्रमाणे घडल्यास भारत तिसºयांदा विश्वविजेता बनू शकतो, पण त्यासाठी सांघिक कामगिरीचीच गरज असेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी सांघिक प्रयत्न फळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 3:45 AM