संजीव साबडे
भारत व पाकिस्तान क्रिकेट सामने आता या दोन देशांमध्ये नव्हे, तर बाहेरच खेळले जातात. दोन देशांतले कमालीचे कटुत्व हे अर्थातच त्याचे कारण. सामन्याच्या वेळी दोन्ही संघांतील खेळाडू, सामना स्टेडियममध्ये व टीव्हीवर पाहणारे चाहते आणि समालोचक युद्धभूमीवर असल्यासारखे वागतात आणि बोलतात. जे म्हटले जाते, ते दोन देशांतील सामन्याच्या वेळी खरे वाटत नाही.
क्रिकेट हा सज्जन लोकांचा खेळ आहे, असे संजीव साबडे व शेफाली या दोघींनीच केल्या. पण रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउनमध्ये महिला क्रिकेट विश्वचषकासाठी भारत व पाकिस्तान या दोन संघांत झालेल्या पहिल्या सामन्यात कुठेही तणाव दिसला नाही. दोन्ही देशांच्या महिला संघांत जिंकण्याची प्रचंड जिद्द दिसत होती, पण कटुता अजिबात दिसली नाही. भारताची आघाडीची खेळाडू स्मृती मानधना बोटाला झालेल्या दुखापतीमुळे मैदानात उतरू शकली नाही. पण, तिची अनुपस्थिती जेमिमा रॉड्रिग्ज आणि शेफाली वर्मा यांनी अजिबात जाणवू दिली नाही. त्या दोघींची फलंदाजी अप्रतिम होती. पण, आपल्या जेमतेम एक वर्षाच्या आणि अंगावर पिणाऱ्या मुलीला घेऊन आलेली पाकिस्तानची कप्तान बिस्माह मारूफ हिचेही कौतुक करायला हवे. तिच्या नाबाद ६८ धावाही वाखाणण्याजोग्या होत्या. तिच्यामुळेच पाकिस्तानचा संघ भारतीय महिलांना १५० धावांचे आव्हान देऊ शकल्या. त्यापैकी ८६ धावा तर जेमिमा व शेफाली या दोघींनी केल्या.
अंतिम फेरीपर्यंत भारताचा महिला संघ बऱ्याचदा गेला. पण, एकदाही विश्वचषक जिंकू शकला नाही, तर पाकिस्तानी संघ एकदाही अंतिम फेरीपर्यंत गेलेला नाही. दोन्ही देशांत त्याची सल नक्की आहे. त्यामुळे तो चषक एकदा तरी जिंकण्याची इच्छा दोन्ही संघांत असणे स्वाभाविक आहे. रविवारी खेळाडूंच्या देहबोलीतून ते जाणवत होते.. पण, प्रतिस्पर्धी संघांच्या सर्वच खेळाडूंचे आपापसातील वागणे अत्यंत प्रेमाचे व जिव्हाळ्याचे होते. स्लेजिंग म्हणजे अपशब्द वापरण्याची प्रवृत्ती पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सर्रास दिसते. तसे रविवारी अजिबात दिसले नाही. समालोचकांची भाषा नेहमीप्रमाणे आक्रस्ताळी नव्हे, तर अतिशय संयमी होती. जेमिमा रॉड्रीग्जइतकेच बिस्माह मारूफच्या फलंदाजीचे कौतुक समालोचक करीत होते आणि तिच्या खेळाला भारतीय प्रेक्षक, तर जेमिमाच्या चौकारांना पाकिस्तानी प्रेक्षक जोरदार दाद देत होते. कर्णधार म्हणून मारूफच्या कामगिरीची वाहवा झाली आणि कप्तान हरमनप्रीत कौरने स्मृती मानधनाच्या गैरहजेरीत आपल्या सहकाऱ्यांच्या आधारे स्पर्धेतील पहिल्याच सामन्यावर भारताचा ठसा उमटवला.
तिसऱ्या देशात, दक्षिण आफ्रिकेत हा सामना झाल्याने दोन्ही देशांतील प्रेक्षक आपापसातील दुश्मनी विसरून विनोद करीत होते, हसत होते. घरी टीव्हीवर सामना पाहणाऱ्यांसाठीही सुटीच्या दिवशी ही आनंदाची पर्वणी होती. सामना संपल्यानंतर मुलाखतीत भारतीय कप्तानाने पाकिस्तानी खेळाडूंचे कर्णधार मारूफचे कौतुक केले. त्यानंतर मारूफने पाकिस्तानी महिला संघाची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यातील चुका मोकळेपणाने व्यक्त केल्या आणि भारतीय फलंदाजीला तोंड भरून दाद दिली.
गेल्या वर्षभरात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चमकलेली मिताली राज हिच्यासह झुलन गोस्वामी, रुमेली धर करुणा जैन आणि वनिता व्हीआर अशा पाच भारतीय खेळाडूंनी निवृत्ती घेतली. मात्र, त्यानंतरही संघातील इतर मुलींनी भारतीय आव्हान कायम ठेवले आहे. रिचा घोष या अवघ्या १९ वर्षांच्या तरुणीने शेवटी जे तडाखेबंद चौकार लावून भारताला विजयाकडे नेले, त्यावरून हे सिद्धच झाले. तिच्याच वयाच्या शेफाली वर्माच्या रविवारच्या खेळाचे वर्णन समालोचकांनी स्फोटक असे केले आहे. हरमनप्रीत कौरने काहीसे निराश केले. मात्र, त्याचा सामना जिंकण्यावर परिणाम झाला नाही. सर्वच खेळांमध्ये एखादा संघ जिंकतो, एखादा हरतो. त्याला कधीच देशाचा पराभव मानता कामा नये. आयपीएलमुळे तर टीमच्या विजयापेक्षा टीम स्पिरिट महत्त्वाचे दिसू लागले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात ते दिसले. त्यामुळे खेळ अधिक रंगतदार ठरला. अगदी ना. धों. महानोर यांच्या कवितेच्या ओळीत या खेळाने लळा लाविला असा असा की...' असा बदल करण्यासारखा!
sanjeevsabade1@gmail.com