देशात राहुल गांधींएवढा ‘राष्ट्रीय’ प्रतिमा असणारा दुसरा नेता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:53 AM2019-05-28T04:53:57+5:302019-05-28T04:54:10+5:30
परवाच्या निवडणुकीत एकटे राहुल गांधीच मोदींना तोंड देताना दिसले.
परवाच्या निवडणुकीत एकटे राहुल गांधीच मोदींना तोंड देताना दिसले. बाकीचे सारे आपापल्या गल्लीतील हाणामाऱ्यांतच तोंड वाजविताना दिसले. स्थानिक पक्षांनी त्यांची कोंडी केली नसती तर या जागा दुपटीने वाढल्या असत्या. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय त्यांच्या पक्षाएवढाच देशालाही मान्य होणारा नाही. पक्षाच्या पराभवाची जबाबदारी शिरावर घेणे हा त्यांचा विचार नैतिक असला तरी राजकारणाची आजची स्थिती पाहता तो चुकीचा ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. नरेंद्र मोदींचा अपवाद वगळला तर आज देशात राहुल गांधींएवढा ‘राष्ट्रीय’ प्रतिमा असणारा दुसरा नेता नाही. प्रादेशिक पुढाऱ्यांना असलेली त्यांच्या पर्यायांची कल्पना सा-या देशाला या निवडणुकीत आली आहे. त्यांच्यातील कोणताही पुढारी ‘राष्ट्रीय’ मुकुट धारण करू शकत नाही, हे स्पष्ट झाले. परवाच्या निवडणुकीत एकटे राहुल गांधीच मोदींना तोंड देताना दिसले. राहुल गांधींचा पक्ष देशातील सात राज्यांत सत्तेवर आहे. त्यांच्या पक्षाचे ५२ उमेदवार लोकसभेत निवडून आले आहेत. स्थानिक पक्षांनी त्यांची कोंडी केली नसती तर या जागा दुपटीने वाढल्या असत्या. राष्ट्रीय पक्षाबाबत त्या बारक्या पक्षांनीही अंतर्मुख होऊन विचार करणे आता गरजेचे आहे. आपसात लढून मोदींना सत्ता द्यायची की, एकत्र येऊन आपण सत्ता मिळवायची हा त्यांच्यापुढचा आताचा प्रश्न आहे. (नावे मोठी असली तरी जनता सोबत असल्याखेरीज विजय मिळत नाही हे त्यांनाही आता कळले असावे) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांची राहुल गांधींना असलेली जाण जशी या निवडणुकीत दिसली तशी शेतकरी, कामगार, दलित व बेरोजगार, महिलांचे प्रश्नही त्यांनी कमालीच्या अभ्यासपूर्णरीतीने मांडले. राफेल घोटाळा, नोटाबंदी, जीएसटी या गोष्टींनी समाजात निर्माण केलेला असंतोषही त्यांनीच मांडला. ते ममतांनीही केले नाही. शरद पवारांनी केले नाही. अखिलेश आणि मायावतींना तर त्या प्रश्नाशी काही कर्तव्य आहे की नाही असेच जनतेला अखेरपर्यंत वाटत राहिले. राष्टÑीय प्रश्न, राष्टÑीय पक्ष, राष्टÑीय प्रतिमा व राष्टÑीय नेतृत्व या स्तरावरील गोष्टी राहुल गांधींना अनुकूल आहेत. शिवाय त्यांच्यामागे शंभर वर्षांचा त्याग व देशभक्तीची प्रतिमा उभी असल्याने त्यांना मानणाºयांचा वर्ग साºया देशात आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी तीन राज्यांत भाजपचा पराभव केला.
तर पंजाब व कर्नाटक ही राज्ये ताब्यात ठेवली. निवडणूक म्हटले की, त्यात जय-पराजय येणारच. त्यामुळे हा पराभव त्यांनी व चाहत्यांनी एवढा मनावर घेण्याचे कारण नाही. गांधी व नेहरू या दोन नावांना असलेली राष्टÑीय मान्यता देशातील तिसºया नावाला नाही आणि राहुल गांधी हे साºयांचे प्रतिनिधी वाटत आहेत. त्यांच्या सुदैवाने ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांच्यासारखे राष्टÑीय प्रतिमा असलेले युवा नेते त्यांच्या सोबतीला आहेत. जुनी माणसे पक्षाला प्रतिष्ठा देतात तर नवीन माणसे त्याला गतिमान करून पुढे नेतात. राहुल गांधींना त्यांचा चांगला वापर करता येईल. शिवाय मोदींची प्रतिमा अजून स्वच्छ नाही. अमित शहांच्या मागे खटल्यांचे गुºहाळ आहे. समाजातील मोठे पण सामान्य व गरिबांचे वर्ग त्यांच्यावर नाखूश आहेत. ही स्थिती व्यवस्थित हाताळणे, इतर पक्षांची समजूत घालून त्यांना संघटित करणे व पक्षाचा सामान्य जनतेशी असलेला संबंध आणखी मजबूत करणे त्यांना व त्यांच्या वरिष्ठ सहकाºयांना जमणारे आहे.
राज्याराज्यातील हट्टी व हेकेखोर पुढारी त्यांचे वजन गमावून बसले आहेत आणि त्यांच्या मागे जाऊन आपण विजयापर्यंत पोहोचू शकत नाही, हे त्यांच्या अनुयायांनाही समजले आहे. पक्षांतर करून व भाजपचे तिकीट मिळवून निवडून आलेल्या काही जणांची जनमानसातील प्रतिमा खुजी आहे. या स्थितीत आपले अध्यक्षपद कायम राखून जुन्या व नव्यांना सोबत घेऊन आणि प्रादेशिकांना जवळ करीत राहुल गांधींना पुढे जाता येणार आहे. वय त्यांना अनुकूल आहे आणि देशातील ग्रामीण भाग, अल्पसंख्य, दलित, गरीब व कनिष्ठ मध्यमवर्ग हेही त्यांच्या सोबत आहेत. म्हणून राजीनाम्याची भाषा न वापरता लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे ‘पुनश्च हरिओम’ म्हणून पुढे जाणे राहुल गांधींचे कर्तव्य आहे. ही त्यांची राष्टÑीय जबाबदारीही आहे.