- रामदास आठवले( केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री)भारत हे विविधतेने संपन्न राष्ट्र आहे. आपल्या देशात अनेक प्रांत आहेत़ त्या प्रत्येक प्रांतात वेगळी बोली भाषा, संस्कृती, पेहेराव आणि रीतीरिवाज आहेत. अनेक जाती-धर्म आहेत. विविध भाषा, जाती-धर्म असतानाही या सर्व विविधतेला एकतेमध्ये गुंफून राष्ट्रीय एकता साधण्याची किमया संविधानकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जगाने ‘ज्ञानसूर्य’ म्हणून गौरव केला आहे. जपानपासून अमेरिकेपर्यंत संबंध जग महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवाधिकार आणि लोकशाही चळवळीचे द्रष्टे प्रेरणास्थान मानत आहेत. त्यामुळे लोकशाहीचे महान तत्त्वचिंतक ठरलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जे संविधान दिले आहे, ते अतुलनीय आणि जगातील सर्वश्रेष्ठ संविधान ठरले आहे. भारतीय संविधानाने जी मूल्ये दिली आहेत, ती संविधानिक मूल्ये केवळ भारतालाच नव्हेतर, संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत. वैश्विक स्तरावर भारतीय संविधानाचे सर्वश्रेष्ठ संविधान असे महत्त्व सिद्ध होत आहे.भारतीय संविधानाच्या सारनाम्यातच या संविधानिक मूल्यांचा उल्लेख आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता आणि न्याय या मूल्यांचा उल्लेख आहे़ प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री या मूल्यांची पेरणी संविधानात करण्यात आली आहे. या संविधानिक जीवनमूल्यांची जशी भारताला गरज आहे तशी संपूर्ण जगालासुद्धा आहे. संविधानात बंधुत्व हा शब्द भारतासमोर संपूर्ण विश्वात श्रेष्ठ राष्ट्र होण्याचे उद्दिष्ट्य ठेवतो; पण त्याच वेळी सर्व देशांशी बंधुत्व बाळगण्याचे उद्दिष्ट्य सांगतो. अमेरिकेसारखी महासत्ता होण्याची लालसा ठेवणारे राष्ट्र बंधुत्वाचे महान तत्त्व पाळू शकत नाहीत. बंधुत्वाच्या शिकवणुकीतून जे राष्ट्र तयार होईल ते राष्ट्र भविष्यात महासत्ता झाले तरी अमेरिकेसारखे केवळ भौतिक महासत्ता न होता बंधुत्वाचे महान तत्त्व पाळणारे राष्ट्र होईल. भारताला अडीच हजार वर्षांपूर्वीपासून बंधुत्वाची परंपरा आणि शिकवण आहे.भारतात अडीच हजार वर्षांपूर्वी बौद्ध धम्म स्थापन झाला. बौद्ध धम्म काळातच भारतात सोन्याचा धूर निघत होता. त्या काळात जगातील अत्यंत संपन्न राष्ट्र भारत होते. आज आपले लोक उच्च शिक्षणासाठी अमेरिका, युरोपला जातात; मात्र त्या काळात जगभरातील ज्ञानपिपासू विद्यार्थी भारतातील नालंदा, तक्षशिला या विद्यापीठांमध्ये येत असत. भारताला बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा लाभला आहे़ या धम्माचा जगभर प्रसार झाला. भारतातील धम्म जगातील प्रत्येक राष्ट्रात पोहोचला त्याचे कारण त्या धम्मातील मानवतावादी वैज्ञानिक आणि समतावादी तत्त्व. बौद्ध धम्मानेच जगाला सर्वप्रथम ‘बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय’ हा लोकशाहीचा विचार दिला. बौद्ध काळात जे सभेचे नियम होते, बौद्ध धम्मात भिक्खू संघात जे नियम होते, बौद्ध धम्माने जगाला जसे सर्वप्रथम सत्य, अहिंसा आणि बंधुत्वाचे तत्त्व शिकविले तसेच लोकशाहीचे, समतेच,े न्यायाचे तत्त्वही बौद्ध धम्मानेच जगाला सर्वप्रथम शिकविले आहे. भारताने आणि भारतीय संविधानाने लोकशाहीचा विचार जगातील अन्य कोणत्याही राष्ट्राकडून उसणा घेतलेला नाही़ फ्रेंच राज्यक्रांतीच्याही किती तरी आधी भारतात लोकशाहीचा, समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा विचार जगात सर्वप्रथम महाकारुणी तथागत गौतम बुद्धांनी मांडला. भगवान बुद्धांच्या धम्मातूनच आपण लोकशाहीची तत्त्वे स्वीकारली असून ती मूल्ये भारतीय संविधानात समाविष्ट केली असल्याचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. आपल्या देशात अजून सामाजिक आणि आर्थिक समता स्थापित झालेली नाही. सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करून संविधानातील समतावादी भारत साकार करणे हाच खरा संविधानाचा गौरव ठरेल.सामाजिक समतेचा पाया अधिक मजबूत केला तरच राजकीय लोकशाही, राजकीय समता टिकेल. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन तत्त्वांतील एक तत्त्व जरी गळाले तरी सर्व लोकशाहीचा अंत झाल्यासारखे होईल. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केली पाहिज़े नाहीतर सामाजिक आणि विषमतेची दाहकता भोगणारा वर्ग लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा इशारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. याचा आपण विचार करून संविधानिक मार्गाने देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यातूनच संविधानातील खरा भारत साकारू शकेल.जागतिकीकरणाच्या युगात जगभरातील राष्ट्रे एकमेकांच्या जवळ आलेली आहेत. जगच जवळ आले आहे. वेगवेगळ्या देशांत लोक उदरनिर्वाहासाठी स्थायिक झाले आहेत. अनेक देशांत विविधता वाढत आहे. जगातील सर्वाधिक विविधता असणाऱ्या राष्ट्राचे सर्वश्रेष्ठ मूल्यांचे भारतीय संविधान बदलत्या जागतिकीकरणाच्या युगात संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितच भारतीय संविधानाचा अभिमान वाटत असून, संविधानाचे शिल्पकार महामानवडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ७०व्या संविधान दिनी विनम्र अभिवादन!
संविधानातील भारत हाच खरा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 6:16 AM