- सुकृत करंदीकर
(सहसंपादक, लोकमत, पुणे)
भारताची अशीच पडझड १९७४ मध्ये झाली होती. फक्त ४२ धावांत खुर्दा झाला तोही पहिल्या डावात तीनशे धावांचा टप्पा ओलांडलेला असताना. त्यावेळी सुनील गावस्कर होता, ‘स्क्वेअर ड्राइव्ह’चा बादशहा गुंडप्पा विश्वनाथ होता. अजित वाडेकर, एकनाथ सोलकर, फारुख इंजिनिअर हेही होते. आत्ता विराट, पुजारा, अजिंक्य, पृथ्वी, मयांक या सगळ्यांनी मिळून छत्तीसच धावा केल्या. एक नोंदवलं पाहिजे की अजित वाडेकरांच्या संघाला टी-ट्वेन्टी-वनडेचं वारंसुद्धा लागलेलं नव्हतं तरी त्यांचा संघ ४२ धावात तंबूत परतला होता. फरक इतकाच की, त्यांच्यासमोर इंग्लिश गोलंदाजी होती. आत्ताच्या भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियन तोफखाना होता. भारतच कशाला; इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज या सगळ्यांच्या वाट्याला असली नामुष्की कधी ना कधी आलेली आहेच. कसोटी क्रिकेटमधल्या सर्वात नीचांकी धावसंख्येची मानहानीकारक नोंद तर न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडनं इंग्लंडविरुद्ध स्वतःच्याच देशात खेळताना सर्वबाद २६ची मजल कशीबशी गाठली होती. ऑस्ट्रेलियाची कसोटीतली नीचांकी धावसंख्या ४२ आहे. हीच ऑस्ट्रेलिया सर्वबाद ४४ अशीही गुंडाळली गेली आहे. दोन्हीवेळा इंग्लिश मारा समोर होता.
- यालाच तर म्हणतात क्रिकेट ! एखादा दिवस इतका खराब उगवतो की, तो उगवला नसता तरच बरं असं वाटावं. ॲडलेड कसोटीतला तिसरा दिवस भारतीय संघासाठी असाच होता. तेवढ्यावरून ‘नव्या फलंदाजांकडं तंत्रज्ञानच नाही’, ‘टी-व्टेन्टीनं फलंदाजीचा आत्मा हिरावून घेतलाय’, ‘पैसा फार मिळतो यांना म्हणून माजलेत सगळे,’ अशी मापं काढत बसायची नसतात. याच भारतीय खेळाडूंनी अनेक दिमाखदार विजय मिळवून दिले आहेत हे विसरता येणार नाही. आत्ताच्याच संघात किमान तीन-चार फलंदाज एवढे स्फोटक आहेत, की दिवस त्यांचा असेल तर ते एकट्यानेच एक-दोन षटकातच ३६ धावा फटकावू शकतील. प्रत्यक्ष मैदानातली लढाई जिंकण्याआधी मनातलं युद्ध जिंकावं लागतं. सांघिक खेळात सगळ्यांनाच मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर असावं लागतं. जे ठरवलं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठीची जिद्द दाखवावी लागते. सत्तरच्या दशकातला क्लाइव्ह लॉइडचा वेस्ट इंडिजचा संघ किंवा नव्वदीच्या उत्तरार्धातल्या स्टीव्ह वॉचा आणि पुढे रिकी पॉंटिंगचा ऑस्ट्रेलियाचा संघ सार्वकालिक सर्वोत्तम का ठरला?- कारण त्या संघातला प्रत्येकजण क्रिकेट कौशल्यांमध्ये तर अव्वल होताच; पण जोडीला ‘संघात मी कशासाठी आहे आणि माझी जबाबदारी काय?’- याचंही पुरतं भान त्या सर्वांना ‘टीम’ म्हणून होतं.
ॲडलेडच्या पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर खरं तर ऑस्ट्रेलियाला नमवण्याची सुवर्णसंधी भारतापुढं होती. तिसऱ्या दिवशीच्या सकाळचे दोन-तीन तास खेळून काढले असते तर ऑस्ट्रेलियाच्या नावावर पराभवाची नोंद दणक्यात करता आली असती. खेळपट्टीवर उभं राहणं मुश्कील नाही, हे जसप्रित बुमराहनं ‘नाइट वॉचमन’ म्हणूून दाखवून दिलं होतं. मिचेल स्टार्क, हेझलवुड आणि कमिन्स हे तिघंही कमालीच्या शिस्तीत, अचूक आणि तिखट मारा करत होते हे मान्य केलं तरी खेळपट्टीवर उभंच राहता येऊ नये, इतका दंश त्यांच्या गोलंदाजीत नव्हता. कमी पडला तो भारतीय फलंदाजांचा निर्धार. पहिल्या डावात अजिंक्य राहणेनं एका धावेसाठी विराटचा घात केला नसता तर, ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे सोपे झेल भारताने सोडले नसते तर.. या जर-तरला शून्य अर्थ आहे. विक्रमवीर विराटच्या नावे एका नकोशा विक्रमाची नोंद मात्र झाली.
आता पितृत्वाच्या सुट्टीसाठी विराट मायदेशी परतणार असला तरी भारतीय संघाला मेलबोर्न, सिडनी आणि ब्रिस्बेन इथं पाठोपाठ आणखी तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. ॲडलेडमधलं पानिपत तिथंच विसरून भारताला पुढं जावं लागेल. विराटच्या अनुपस्थितीत संघातला जोश टिकवून ठेवण्याचं सर्वात कठीण आव्हान अजिंक्य राहणेपुढं आहे, आणि संधीदेखील ! अजिंक्यच्या हाताशी कांगारुंची शिकार करण्यासाठी हवा तो सगळा दर्जा, वैविध्य, अनुभव आहे. प्रश्न आहे तो संघात जिद्द आणि निर्धार निर्माण करण्याची ताकद अजिंक्य दाखवणार का? अन्यथा ॲडलेडमधली शिकार ‘अपघाती’ ठरणार नाही.