आज पहाटे झालेला सर्जिकल स्ट्राईक अपेक्षित होता. काही दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या गंभीर फिदाईन हल्याच्या संदर्भात होता हे सर्वश्रुत आहे. मागच्या वेळेस सर्जिकल स्ट्राईक हा सैन्याने केलेला जमिनीवरील हल्ला होता व तो काही ठरावीक अंतरापर्यंत करता येतो. कारण त्यात रिस्क फॅक्टर बराच असतो. तो हल्ला आपण एलओसीपासून काही अंतरावर असलेल्या लाँचिंग पॅडपर्यंतच सीमित होता. ह्या वेळेस आपल्याला डॉक किंवा पाकिस्तानच्या बऱ्याच आतमध्ये असलेल्या त्यांच्या कॅम्पवर किंवा प्रशिक्षण केंद्रावर करणे आवश्यक होते. त्याशिवाय पाकिस्तानला धडा शिकवला गेला नसता. अशा प्रकारच्या पाकिस्तानच्या कारवाया थांबल्या नसत्या. फिदाईन हल्ल्यानंतर संपूर्ण देश रागाने जळत होता. असे अनेक हल्ले येत्या काही दिवसात करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा होता. तेव्हा हा हल्ला अत्यंत आवश्यक होता. पंतप्रधानांनी याबाबत राष्ट्राला वचन दिले होते.यात आपण मिराज २००० सारखे सर्वात शक्तिशाली विमान वापरले. एक नाही तर तब्बल १२ विमानांचा समावेश होता. या लढाऊ विमानाला अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. लढाईच्या दृष्टीने एक हजार पौंडाच्या बॉम्बचा मारा केला. हा बॉम्ब शेकडो चौरस यार्ड अचूकपणे उद्ध्वस्त करू शकतो. या सर्व लष्करी कारवाईच्या अगोदर काही दिवसांपासून याचे प्लॅनिंग सुरू होते. सर्व भारतीय सैन्य दले आपआपल्या जागी काही दिवसांपासून तैनात आहेत. आता आपण पाकिस्तानला हे सिद्ध करून दाखविले आहे की, आम्ही एकच सर्जिकल स्ट्राईक करून स्तब्ध बसणारे नाहीत.परत कुरापत काढली तर जास्त शक्तीने प्रत्युत्तर देऊ. त्या व्यतिरिक्त राजकीय, डिप्लोमॅटिक, आर्थिक स्तरावर पाकिस्तानची कोंडी केलेली आहेच. पाकिस्तान स्वस्थ बसणारा देश नाही. आपण जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन आता जास्त जोमाने सुरू होईल. आशा आहे की विरोधी पक्ष या ऑपरेशनचा पुरावा मागण्याचा निर्लज्जपणा करणार नाही. सरकारच्या व सैन्याच्यापाठी उभे राहणे व सर्व राष्ट्राचे कर्तव्य. पाकिस्तान व आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रियेची वाट बघणे आवश्यक आहे.
-अरविंद वर्टी, ब्रिगेडियर (निवृत्त)