>> प्रशांत दीक्षित
इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करून ते कंधहारला नेण्याचा प्रकार १९९९मध्ये घडला. विमानातील भारतीय प्रवाशांना सोडविण्याच्या बदल्यात ३० कट्टर दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी दहशतवाद्यांनी केली. भारताने वाटाघाटी करून फक्त तीन दहशतवादी सोडले. त्यातील एक मसूद अजहर होता, जैशचा सध्याचा प्रमुख. पुलवामा हल्ला ही त्याची अलीकडील आगळीक. त्याआधी अनेक हल्ल्यांचा सूत्रधार.
मसूद अजहरला सोडण्याची फार मोठी किंमत भारताला मोजावी लागत आहे. त्यावेळी वाजपेयी सरकारने दहशतवाद्यांसमोर शरणागती पत्करली. या मसूदला सोडण्यासाठी स्वतः जसवंतसिंह कंधहारला गेले. विमानात मसूदला जसवंतसिंह यांनी पाणी देऊ केले. तेव्हा भारतीय पाण्याला शिवण्याची माझी इच्छा नाही असे मसूद याने गुर्मीत सांगितले. स्वतः मसूद यानेच ही माहिती दिली होती.
कंधहार घटनेच्यावेळी भारत दुहेरी मनःस्थितीत होता. इस्रायलने एन्टेंबी विमानतळावरून प्रवाशांना सोडवून अरब दहशतवाद्यांना धडा शिकविला होता. तसे करण्याची तयारी भारतीय लष्कराची होती, असे म्हणतात. परंतु, अपहरण झालेल्या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांची निदर्शने दिल्लीत सुरू झाली. कोणतीही किंमत देऊन आमच्या नातेवाईकांना सोडवा अशी मागणी सुरू झाली. टीव्हीवरून त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. या निदर्शनांमुळे वाजपेयी सरकार पेचात पडले. लष्करी कारवाई फसली व प्रवासी ठार झाले तर काय करायचे असा प्रश्न वाजपेयी सरकारला पडला. कोणतीही किंमत द्यावी लागली तरी चालेल, कठोर कारवाई करा व मसूदला काश्मीरच्या कैदेतच ठार करा, अशी मागणी जनता, मिडिया, विरोधी पक्ष अशा कोणाकडूनच झाली नाही. वाजपेयी त्यांच्या मवाळ स्वभावाला अनुसरून वागले व भारताने शरणागती पत्करली.
इथे इंदिरा गांधींच्या कामाची आठवण येते. परराष्ट्र खात्यातील अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचे इंग्लंडमध्ये अपहरण करण्यात आले होते व मकबूल भट्ट या काश्मिरी दहशतवाद्याला सोडण्याची व दीड कोटी रुपयाची खंडणीची मागणी करण्यात आली होती. (याच रवींद्र म्हात्रे यांचे नाव पुण्यातील पुलाला दिलेले आहे.) इंदिरा गांधींनी ती मागणी मान्य केली नाही. म्हात्रेंची दहशतवाद्यांना हत्या केली. म्हात्रेंची हत्या झाल्याचे कळताच, ज्यांना सोडून देण्याची मागणी झाली होती, त्या भट्टला इंदिराजींनी तत्काळ फाशी दिले.
कंधहारला भारत बचावात्मक पवित्र्यात होता. कारण दीडशेहून अधिक प्रवाशांच्या प्राणांची किंमत मोजावी काय, हा अतिशय कठीण प्रश्न वाजपेयींसमोर होता. त्यानंतर लगेचच पाकिस्तानने कारगिलमध्ये आगळीक केली. कारगिलमध्ये पाकिस्तानचे छुपे सैनिक भारतात घुसले. ही घुसखोरी वेळीच लक्षात आली व भारताने प्रतिकारवाई सुरू केली. थोडा काळ आणखी गेला असता तर पाकिस्तानी रेग्युलर्सनी लेह-लडाख भारतापासून तोडले असते.
यावेळी वाजपेयी थोडे आक्रमक झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाकिस्तानवर मोठा दबाव टाकण्यात आला. त्याचवेळी लष्करी कारवाईही सुरू झाली. वायूदलाचाही वापर केला गेला. आजच्या बालाकोट कारवाईत वापरण्यात आलेली मिराज विमाने व त्यावरील लेसर गायडेड बॉम्ब त्यावेळीही वापरण्यात आले होते. टायगर हिलवरील पाकिस्तानी बंकर याच विमानांनी उद्ध्वस्त केले आणि भारताचा विजय जवळ आणला.
मात्र त्यावेळी एक मर्यादा पाळण्याचे स्पष्ट आदेश वाजपेयी यांनी दिले होते. कोणत्याही परिस्थितीत भारतीय हद्द ओलांडायची नाही असे सक्त आदेश वायूदल व लष्कराला देण्यात आले होते. भारत आक्रमण करीत आहे असे जगाला दिसता कामा नये हा उद्देश त्यामागे होता. ‘मी गुड बॉय आहे’, असे जगाला समजावून सांगण्याची भारताची धडपड होती. भारताचा तो स्वभाव विशेष होता. याचा थोडाफार फायदा नक्कीच झाला. भारताच्या चांगल्या वागणुकीची अमेरिकेने दखल घेतली व अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी कारगिलमधून माघार घेण्यास पाकिस्तानला भाग पाडले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुशर्रफ त्यावेळी बरेच चरफडले पण अमेरिकेसमोर काही करू शकले नाहीत.
त्यानंतरही भारतावर हल्ले सुरू राहिले. वाजपेयींच्या काळातच संसदेवर हल्ला झाला व त्यामागे मसूदच होता. त्यावेळी भारताने फार मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली. ही जमवाजमव पाहून पाकिस्तान धास्तावले होते. कारण त्यावेळी पाकिस्तानची पुरेशी तयारी नव्हती. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साकडे घातले व भारताने अमेरिकेचे ऐकले.
युद्ध टळले, पण भारतावरील दहशतवादी हल्ले टळले नाहीत. युपीएच्या काळात अनेक हल्ले झाले. मुंबईवरील हल्ला तर भीषण होता. जगाची सहानुभूती त्यावेळी भारताच्या बाजूने होती. पण लहान प्रमाणात प्रतिहल्ला करण्याचे भारताला सुचले नाही. काही प्रतिहल्ले केले गेले असे काँग्रेसचे नेते सांगतात. पण त्याला पुष्टी मिळालेली नाही. किंबहुना बचावात्मक भूमिका बाळगा, भारत आक्रमक देश आहे अशी प्रतिमा होता कामा नये, अशी भारत सरकारची एकूण धडपड होती.
मात्र आता परिस्थिती बदलली आहे. उरी येथील लष्करी तळावर हल्ला झाल्यावर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला झटका दिला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईबद्दल बरेच संशय निर्माण करण्यात आले, पण कारवाई झाली हे नाकारता येत नाही. अशी कारवाई करण्याचे आणि अशी कारवाई केल्याचे जगाला उघडपणे सांगण्याचे धाडस भारताने त्यावेळी दाखविले. हा बदल महत्वाचा होता. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांना लष्करी प्रत्युत्तर दिले जाईल हे भारताने निक्षून सांगितले.
बालाकोट येथील हल्ला ही त्यापुढील आक्रमक पायरी आहे. हा हवाई हल्ला आहे व यावेळी कारगिलप्रमाणे सीमेच्या मर्यादा पाळण्यात आल्या नाहीत. उलट पाकिस्तानी भूमीत घुसून हल्ला करण्यात आला. हे सरळ सरळ आक्रमण आहे. हा बदल कंदहार, संसद, मुंबई हल्ल्यानंतरच्या प्रत्युत्तरापेक्षा किंवा सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही महत्त्वाचा आहे.