भारताने २७ मार्चला उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अशी क्षमता प्राप्त केलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चवथा देश ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत नाट्यमयरीत्या भारताच्या या यशाची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना पंतप्रधानांनी अशी घोषणा करणे योग्य आहे का, या मुद्यावरून देशात बरेच रणकंदनही माजले. अपेक्षेनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताच्या चाचणीचे पडसाद उमटले. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या चाचणीवर चिंता व्यक्त केली आणि काही काळासाठी भारताची अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’सोबतचे सहकार्य स्थगित केले. भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या चीनने मात्र आश्चर्यजनकरीत्या अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणत्याही बाबतीत भारताशी स्पर्धा करू बघणाºया आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात खिजगिणतीतही नसलेल्या पाकिस्तानने बाह्य अवकाशाच्या लष्करीकरणाविषयी चिंता व्यक्त केली. त्यानंतर भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीवरून उठलेला धुराळा खाली बसल्यासारखे वाटत असतानाच, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने गुरुवारी भारताच्या चाचणीची पाठराखण करून पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले. बाह्य अवकाशाचा लष्करी वापर करणे योग्य की अयोग्य, या मुद्यावर अमेरिकेच्या प्रथम उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीपासूनच चर्चा सुरू आहे. भारताने तशी चाचणी घेतल्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर ती चर्चा नव्याने सुरू होणे अपेक्षितच होते. सोबतीला भारताने अशी चाचणी घेण्याची खरेच आवश्यकता होती का, अशीही चर्चा भारतातच सुरू झाली आहे. भारताने ही क्षमता बरीच आधी प्राप्त केली होती आणि प्रत्यक्ष चाचणी घेण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असा युक्तिवाद भारतातील काही मंडळी करीत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीचा खरा उद्देश वेळप्रसंगी शत्रू देशाचे उपग्रह निकामी करण्याची क्षमता दाखवून देणे हा नव्हताच, तर बॅलिस्टिक क्षेपणास्त्ररोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेणे हा होता, अशी चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात युद्धांमध्ये क्षेपणास्त्र हेच प्रमुख अस्त्र असणार आहे. भारताने वेगवेगळ्या क्षमतांची बॅलिस्टिक व क्रुझ क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत; परंतु शत्रू देशांनी डागलेल्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्याची क्षमता विकसित करण्यात भारताला अद्याप हवे तसे यश मिळालेले नाही. भारताने २७ मार्चला घेतलेली उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करण्याची क्षमता विकसित करण्यामध्येही मदत करेल, असे मत अमेरिका व चीनमधील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर आधी अवकाशात जातात आणि मग अवकाशातूनच लक्ष्याच्या दिशेने प्रवास करून खाली लक्ष्यावर येऊन आदळतात. त्यांना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी अवकाशातच नष्ट करणे हाच सर्वोत्तम मार्ग असतो. भारताने कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रास ३० किलोमीटर ते १५० किलोमीटर उंचीवर नष्ट करण्याची क्षमता प्राप्त केली होती; मात्र लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रास नष्ट करण्यासाठी ही मर्यादा वाढविणे आवश्यक होते. भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीमध्ये भूपृष्ठापासून २७४ किलोमीटर उंचीवर मार्गक्रमण करीत असलेला उपग्रह नष्ट करण्यात आला. याचाच अर्थ आता भारत तेवढ्या उंचीवर मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्रही सहज नष्ट करू शकतो. अर्थात, उपग्रह नष्ट करण्याच्या तुलनेत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नष्ट करणे अधिक कठीण असते; मात्र ती क्षमता प्राप्त करणे आता भारताच्या आवाक्यात आले आहे. कोणत्याही बाबतीत भारताशी स्पर्धा करण्याच्या गप्पा करणाºया पाकिस्तानला इतर कोणत्या क्षेत्रात तर ते शक्य झाले नाही; मात्र अण्वस्त्रे आणि अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रांच्या बाबतीत पाकिस्तानने निश्चितपणे भारताची बरोबरी केली आहे. भारतासाठी हा मोठा चिंतेचा विषय आहे. या पृष्ठभूमीवर भारताने क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विकसित करण्यात यश प्राप्त केल्यास, भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची पाकिस्तानची क्षमता मोठ्या प्रमाणात कमकुवत होईल. रशियाकडून एस-४०० यंत्रणा विकत घेण्याच्या भारताच्या निर्णयावर थयथयाट करण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेमागे नेमके तेच कारण आहे. भारताला अण्वस्त्रांचा धाक दाखवून भारतविरोधी दहशतवादी संघटनांना मदत करण्याच्या पाकिस्तानच्या कुटनीतीला ‘सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘बालाकोट एअर स्ट्राइक’मुळे मोठा धक्का बसला आहे. आता भारताने क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विकसित करण्यातही यश प्राप्त केल्यास, भारताला उठसूट अण्वस्त्रांची भीती दाखविणे पाकिस्तानला शक्य होणार नाही. इतर देशांच्या उपग्रहवाहकांद्वारा पाठविलेले इनमिन दोनचार उपग्रह असलेल्या पाकिस्तानला भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे पोटशूळ उठण्याचे खरे कारण हे आहे. - रवी टाले
ravi.tale@lokmat.com