सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटच्या विजयाचा पाया रचला. त्यावर कळस चढवला महेंद्रसिंग धोनीने. परंतु, ही विजयी इमारत आपण उभारू शकतो हा आत्मविश्वास भारतीय क्रिकेटला दिला तो अजित वाडेकर यांनी. भारताला परदेशात पहिल्यांदा मालिका जिंकून देण्याचा पराक्रम वाडेकर यांनी आपल्या नेतृत्वात केला. अनपेक्षितपणे विजय मर्चंट यांनी वाडेकर यांच्याकडे कर्णधारपद सोपविले. त्या वेळी भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास सज्ज होत होता. तो काळ असा होता जेव्हा भारतीय संघाचे विदेशातील यश म्हणजे सामना अनिर्णीत राखणे. म्हणजे यजमान संघाला भारताविरुद्ध खेळताना कधीही पराभवाची चिंताच नसायची. एक तर आपण जिंकू किंवा भारत स्वत:हून सामना अनिर्णीत राखणार, असा विश्वासच इतर संघांना होता. मात्र, १९७१ साली वाडेकर यांनी संपूर्ण क्रिकेटविश्वाला भारताची दखल घेण्यास प्रवृत्त करताना वेस्ट इंडिज व इंग्लंड यांना त्यांच्याच भूमीत लोळवले. हा निकाल क्रिकेटविश्वासाठीही धक्कादायक होता. मुंबईच्या ‘खडूस’ आखाड्यात क्रिकेटचे धडे गिरवलेल्या वाडेकर यांनी कर्णधार म्हणून संघातील प्रत्येक खेळाडूला नवा आत्मविश्वास मिळवून दिला. आजच्या पिढीला वाडेकर यांनी दिलेले योगदान कदाचित फारसे महत्त्वाचे वाटणार नाही. पण ७० च्या दशकातील क्रिकेटचाहता मात्र आपल्या कर्णधाराच्या अचानक जाण्याने नक्कीच स्तब्ध झाला असणार. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वाडेकरच भारताचे पहिले कर्णधार होते. १९७४ साली पुन्हा इंग्लंड दौºयावर गेलेल्या भारताला वाडेकर यांच्या नेतृत्वाखालीच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी झालेल्या मोठ्या टीकेमुळे वाडेकर यांना कर्णधारपद गमवावे लागले आणि त्यांनी निवृत्तीही जाहीर करत आपल्या बँकिंग क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले. परंतु क्रिकेटप्रेम त्यांना स्वस्थ बसू देईना. ९० च्या दशकात त्यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि तत्कालीन कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने चार वर्षे शानदार कामगिरी केली. अप्रतिम प्रशासकीय, व्यवस्थापन कौशल्य, खेळाडूंची गुणवत्ता अचूक हेरण्यात ते तरबेज होते. सचिन तेंडुलकरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळविण्याचे श्रेयही त्यांचेच. वाडेकर केवळ क्रिकेटपटू म्हणून उत्तम नव्हते; तर एक व्यक्ती म्हणूनही ते अनेकांसाठी प्रेरणादायी होते. १९७१ साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडची मोहीम फत्ते करून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचे मुंबईत जंगी स्वागत झाले. तेव्हा जल्लोषासाठी उभ्या असलेल्या दिव्यांग चाहत्यांना पाहून त्यांच्यासाठी १९८८ साली त्यांनी विशेष क्रिकेट स्पर्धा आयोजित करत ‘आॅल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर दी फिजिकल चॅलेंज’ संस्थेची स्थापना केली. अखेरपर्यंत दिव्यांग खेळाडूंच्या क्रिकेटसाठी कार्य केलेल्या वाडेकर यांनी बीसीसीआयकडे या खेळाडूंना मान्यता देण्याची विनंती केली. लवकरात लवकर ती मान्यता देणे हीच वाडेकरांना खरी श्रद्धांजली ठरेल.
भारताचा कर्णधार हरपला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 4:43 AM