- प्रशांत दीक्षितपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेहला भेट देऊन जवानांसमोर भारताचे धोरण मांडले. मोदींनी लेहमध्ये २८ मिनिटे भाषण केले. ते भाषण जवानांसमोर असले तरी त्यातून देशाला व जगाला भारताचे धोरण ध्वनित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.लेहला भेट देणे हे मोदी विरोधकांना नाटकीय खेळी वाटत असली तरी जगाच्या राजकारणात अशा खेळींमधूनच पुढची पावले ओळखता येतात. या भेटीमुळे एक बाब स्पष्ट झाली, की भारत आता माघार घेणार नाही. भारताचे धोरण हे 'वीरवृत्ती'चे राहणार आहे. वीरवृत्ती हा शब्द मोदींनीच दोन-तीन वेळा आपल्या भाषणात वापरला. पृथ्वी ही वीरांचाच सन्मान करते, असे त्यांनी महाभारतातील वचन उच्चारून सांगितले. भारतात बासरी वाजविणाऱ्या कृष्णाबरोबर सुदर्शनधारी कृष्णही आहे हेही त्यांनी सांगितले. भारताचे यापुढील धोरण सुदर्शनधारी कृष्णासारखे असेल, असे त्यांना ध्वनित करायचे होते. याचा अर्थ चीनच्या आक्रमक हालचालींचा प्रखर प्रतिकार करण्यास भारत सज्ज होत आहे, भारत यापुढे लेचेपेचे धोरण अमलात आणणार नाही हे मोदींना सांगायचे होते. सीमेवर रस्ते व अन्य पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याचे काम कसे चालू आहे याचे वर्णन मोदींनी केले. चीनचा प्रत्येक पावलावर प्रतिकार करण्यास भारत सज्ज होत आहे, हे केवळ चीनला नव्हे तर जगाला सांगण्याचा हा प्रयत्न होता.
हा बदल महत्त्वाचा आहे आणि भारतीय लष्कराचे मनोधैर्य वाढविणारा आहे. लष्कराला पंतप्रधानांकडून आता स्पष्ट दिशा मिळाली आहे. ही दिशा आहे प्रखर प्रतिकार करण्याची. जशास तसे धोरण राबवा हे मोदींनी सांगितले आहे. तिन्ही दलांमध्ये त्यामुळे जोश निर्माण होईल. राजकीय नेतृत्व आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे स्पष्ट संकेत लष्कराला नेहमी हवे असतात. यूपीएच्या काळात असे संकेत दिले जात नव्हते. नमते घ्या, सबुरीने घ्या असे धोरण होते. त्या धोरणाला आता तिलांजली मिळाली आहे.
मोदींनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेख केला नाही. विस्तारवादी शक्ती असा आडवळणाने चीनचा उल्लेख करून जगाला समजेल अशी भाषा वापरली. जगाच्या इतिहासात विस्तारवादी शक्तींचा कधीही विजय झालेला नाही हे लक्षात ठेवा, असे मोदींनी सांगितले. हे सांगताना त्यांचा रोख दुसरे महायुद्ध व अन्य लढायांकडे होता. चीनबरोबरच्या झटापटीत भारताच्या २० सैनिकांना हौतात्म्य मिळाल्यानंतर भारताने प्रथम राजनैतिक, नंतर आर्थिक आणि आता लष्करी अशा तीनही आघाड्यांवर कणखर धोरण अवलंबिले आहे. आजचे भाषण त्यातील लष्करी आघाडीला अधिक कणखर बनविणारे होते. चीनबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी मोदींनी गेल्या सहा वर्षांत बरीच धडपड केली होती. काही वेळा जादा नमते घेतले होते. पण चीनवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. मोदींची डिप्लोमसी फुकट गेली हे वास्तव आहे. शी जिनपिंग यांच्या कावेबाजपणाचा अंदाज मोदींनी आला नाही. नेते जोखण्यातील त्यांच्या मर्यादा कळून आल्या. मात्र अशी फसगत झाली असली तरी त्याने हताश न होता प्रखर प्रतिकारास सज्ज होण्याची पावले टाकण्यास मोदींनी सुरुवात केली आहे. अन्य देशांकडे मदतीसाठी याचना न करता, स्वत:च्या जिवावर चीनशी लढण्यास भारत सज्ज होत आहे हे मोदींना सांगायचे होते.
याचा चीनवर किंवा सध्या सुरू असलेल्या लष्करी वाटाघाटींवर काय परिणाम होईल याचाही विचार झाला पाहिजे. दोन्ही देशांच्या सीमेमधील वादग्रस्त जागेवर सध्या चीनने कब्जा मिळविला आहे. भारत गाफील राहिला हे खरे आहे. चीनने त्याचा फायदा मिळविला आणि वादग्रस्त भाग ताब्यात घेतला. मोदींच्या आजच्या भाषणाने चीन बिचकून जाईल अशी अपेक्षा करणे हास्यास्पद ठरेल. हाँगकाँग, तैवानवरून चीनला अडचणीत आणणे, आर्थिक करार थांबविणे आणि आता कणखर लष्करी धोरणाचा स्पष्ट उच्चार करणे यामुळे चीन हबकणारा नाही. चीन ही बलाढ्य सत्ता आहे आणि हटवादी देश आहे. मात्र कणखर लष्करी प्रतिकार ही भारताची शक्तीची भाषा आहे आणि त्याचा विचार चीनला करावा लागेल.
याशिवाय बलाढ्य सत्तेलाही नमावे लागते असा इतिहासाचा निर्वाळा आहे. बलाढ्य तटबंदीलाही छिद्रे असतात. आज तंत्रज्ञान, सैन्यबळ, सोयीसुविधा, युद्धसामग्री यामध्ये चीन संख्येने मोठा असला तरी डोंगरी लढायांमध्ये चीन निष्णात नाही असे लष्करी अधिकारी सांगतात. चीनबरोबर याआधी झालेल्या चकमकींमध्ये भारतीय सैन्याने चीनला जोरदार झटके दिले आहेत. कित्येकदा पिटाळून लावले आहे. भारतीय सैन्याला चीनची अजिबात धास्ती वाटत नाही हे वास्तव आहे.
चीनचा सपशेल पराभव करण्याची क्षमता भारताकडे आहे असा कोणी याचा अर्थ करू नये. चीनचा पराभव होऊ शकत नाही. आणि हाच चीनचा पेच आहे. आत्ताच्या संघर्षात आक्रमणशील चीन आहे. चीनला भूभाग ताब्यात घेऊन विजय मिळवायचा आहे. चीनच्या आक्रमणाला भारताने सडतोड उत्तर दिले, झटापटी लांबवत ठेवल्या, आपला भूभाग भारताने राखण्यासाठी जबर झुंज दिली, चीनची मोठी लष्करी व मनुष्यहानी केली तरी चीनची पंचाईत होईल. व्हिएतनामने ज्या पद्धतीने अमेरिकेला माघार घेणे भाग पाडले तसा प्रकार इथे होऊ शकतो. भारताने उत्तम बचाव केला तरी तो चीनचा पराभव असेल. चीन वाटतो तितका भीतिदायक नाही, असा संदेश त्यातून जाईल. जगाचा लष्करी इतिहास असे सांगतो की चीनसमोर चिवटपणे कोणी उभा राहिला की चीन नमते घेतो. भारताने लष्करी ताकद वाढवीत नेली आणि जबर झुंज दिली तर जगही भारताच्या बाजूने उघडपणे उभे राहील. सध्या जागतिक व्यासपीठावर चीन अडचणीत येत आहे, तो अधिक अडचणीत येईल.
इथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची पंचाईत होऊ शकते. त्यांनी स्वत:ला चीनचे तहहयात प्रमुखपद घेतले आहे. परंतु, चीनची अर्थव्यवस्था मंदावते आहे. विकासदर वेगाने घटतो आहे. लोकांमध्ये अस्वस्थता आहे. हाँगकाँगमधील तिढा सुटलेला नाही. जगातील अधिकाधिक देश व्यापारी निर्बंध लादू लागले तर चीनची अडचण होईल. लष्करी ताकद महत्त्वाची की आर्थिक ताकद यावर खल करावा लागेल. शी जिनपिंग यांच्या धोरणावर पक्षातून टीका होऊ लागेल. शी जिनपिंग यांना या सर्वांचा विचार करावा लागेल. गलवान खोऱ्यातील घुसखोरी हा चीनच्या अस्मितेचा प्रश्न बनविणे कितपत फायद्याचे ठरेल, या प्रश्नाचे उत्तर त्यांना शोधावे लागेल.भारत नमते घेणार नाही, विस्तारवादी शक्तींच्या विरोधात चिवटपणे दीर्घ झुंज देण्यास तो तयार आहे, हे मोदींनी आज जगाला सांगितले. चीनही तितकाच चिवट आहे. माघारीची भाषा चीनही करणार नाही. मात्र माघार न घेण्याची किती किंमत द्यावी याचा विचार शी जिनपिंग यांना करावा लागेल. अद्याप युद्ध सुरू झालेले नाही व कदाचित कधीच होणार नाही. पण भारताने वॉर गेमला सुरुवात केली आहे. भारत-चीनमधील ही झुंज दीर्घकाळ चालणार हे स्पष्ट होऊ लागले आहे. झुंज लांबत गेली की चीन अधिक अडचणीत येईल.(पूर्ण)