- विनय उपासनी(मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई)आपल्या व्यक्तिमत्त्वावर लहानपणापासून कोणाचा ना कोणाचा तरी प्रभाव असतो. घरात आई किंवा वडिलांचा. शाळेत आवडत्या शिक्षकांचा. मित्र परिवारात जवळच्या मित्राचा. जसजसं वय वाढतं तसतसं प्रभावाचं वर्तुळ विस्तारत जातं आणि त्यातून आपली वैचारिक बैठक वगैरे पक्की होते. पुढे नोकरीपेशात आपल्यावर प्रभाव टाकणारे खूप असतात. त्यातल्या त्यात आपल्या राशीला जो चांगला, त्याचा प्रभाव आपल्या कामावर आणि व्यक्तिमत्त्वावर अधिक पडतो. नेता, अभिनेता, खेळाडू, लेखक, पुस्तक अशांचाही आपल्यावर वयाच्या त्या त्या टप्प्यात कितीतरी काळ प्रभाव असतो. मात्र, दीर्घ काळपर्यंत टिकणारा प्रभाव म्हणजे अर्धांगिनीचा. असो! सांगायचं तात्पर्य असं की, अनेक ‘प्रभाव’शाली व्यक्तिमत्त्वांनी आपल्या जीवनाचा पैस व्यापलेला असतो. समाजमाध्यमी कल्लोळावर पोसल्या जात असलेल्या मिलेनियल्सच्या भाषेत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणजे इन्फ्लूएन्सर्स. ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब अशा प्रभावी समाजमाध्यमांवर अनेक क्षेत्रातले अनेक इन्फ्लूएन्सर्स आपापले सवतासुभा राखून आहेत. अशा या इन्फ्लूएन्सर्सचे अनुयायी (पक्षी : फॉलोअर्स) त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट फॉलो करत असतात. समाजमाध्यमांच्या वेगवेगळ्या मंचांवर हे इन्फ्लूएन्सर्स आपापल्या अनुयायांना मोलाचे सल्ले देत असतात. उदाहरणार्थ एखादे गॅझेट बाजारात लाँच झाले असेल तर ते तुम्ही घ्यावे का, वगैरेचा सल्ला हे इन्फ्लुएन्सर्स देतात. तेच वाहनांच्या बाबतीत. तेच व्हिला वा तत्सम आलिशान घरांच्या बाबतीत. तेच खाण्या-पिण्याच्या बाबतीत. एवढेच नव्हे तर तुम्ही कोणत्या ब्रँडचे कपडे वापरायला हवेत, हेही इन्फ्लुएन्सर्स ठरवतात. विशिष्ट राजकीय विचारधारेचे इन्फ्लूएन्सर्सही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ‘गाइड’ करत असतात. अध्यात्मिक बाबा-बुवांची युट्यूब चॅनेल्स, युट्यूबर हे तर स्वतंत्र लेखाचे विषय. या इन्फ्लूएन्सर्सचा प्रभाव एवढा असतो, की काही बलाढ्य कंपन्या त्यांची उत्पादने लाँच करण्याआधी या इन्फ्लूएन्सर्सकडे परीक्षणासाठी देतात. त्यांनी उत्पादनांना चांगले रेटिंग दिले तरच पुढे ते मार्केटमध्ये लाँच केले जाते. त्यामुळे मेगा ब्रॅण्ड्स आपापल्या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी इन्फ्लूएन्सर्सना सदिच्छादूत म्हणून नियुक्त करतात.
इन्फ्लूएन्सर्स अर्थात ‘प्रभाव’ळकर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:51 AM