जाहीर सभा असो की, विविध सरकारी कार्यक्रम, आक्रमक शैलीत संवाद फेकत, पंतप्रधान मोदी स्वत:ला नेहमी एखाद्या दबंग नेत्याच्या भूमिकेत सादर करीत आले आहेत. ५६ इंची छातीचाही अनेकदा त्यांनी उल्लेख केला आहे. चौफेर हल्ले चढवताना काँग्रेस, गांधी घराणे हे त्यांच्या खास आवडीचे विषय. जाहीर सभांद्वारे गांधी घराण्यावर अथवा अन्य विरोधकांवर कडवट टीका करताना, विचित्र शब्दकोट्या करीत मोदी तुटून पडत आले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय)ला दिलेल्या प्रकट मुलाखतीत मात्र, पंतप्रधान मोदी अनपेक्षितरीत्या विनम्र रूपात प्रथमच पाहायला मिळाले. साडेचार वर्षांत स्वत:ला पत्रसृष्टीपासून कटाक्षाने दूर ठेवणारे पंतप्रधान एकाही जाहीर पत्रपरिषदेला सामोरे गेले नाहीत. साहजिकच बहुतांश वृत्तवाहिन्यांनी या मुलाखतीचे थेट प्रसारण केले. विरोधकांवर आपण हल्ले चढविले, तरी शहरी मध्यमवर्गीय पूर्वीसारखा प्रतिसाद देत नाहीत. समाज माध्यमांवर आपल्या भाषणांची यथेच्छ खिल्ली उडविली जाते. तेव्हा निवडणुकीच्या काळात नेहमीची शैली कामाची नाही, हे मोदींच्या लक्षात आले असावे. राहुल गांधींचे काही प्रयोगही पंतप्रधानांच्या बदलत्या शैलीला कारणीभूत ठरले असावेत. लोकसभेत राहुल गांधींनी मोदींना थेट सुनावले, ‘प्रधानमंत्री हमेशा नफरत की बात करते है और हम प्यार की बात करते है.’ पंतप्रधानांच्या आसनाजवळ जाऊन राहुलनी त्यांना मिठीही मारली. हे पे्रमालिंगन पंतप्रधानांच्या बहुदा जिव्हारी लागले असावे. मग आपल्या बदलत्या रणनीतीनुसार नेहमीचा आवेश बाजूला ठेवून, जनतेशी स्वैर संवाद साधण्याची संधी त्यांनी एएनआयच्या मुलाखतीद्वारे घेतली. हिंदुत्व अथवा अयोध्येतील राम मंदिर हा अजेंडा भाजपाच्या दिग्विजयासाठी फारसा उपयुक्त नाही, हे तीन राज्यांतल्या पराभवानंतर मोदींच्या पुरेपूर लक्षात आले असावे, म्हणूनच या वादग्रस्त विषयावर संभावित पवित्रा घेत, राम मंदिरासाठी वटहुकूम काढणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच या विषयाचा निर्णय सरकार घेईल, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. नोटाबंदीच्या निर्णयाने देशाला झटका दिला नाही, हे उत्तर देताना मोदींची देहबोली अन् चेहऱ्यावरचे आविर्भाव बरेच बचावात्मक होते. राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा उद्धव ठाकरेंनीही अलीकडेच पुनरुच्चार केला. मुलाखतीत प्रश्नकर्तीने त्याचा उल्लेख करताच, आपल्या पक्षाची ताकद प्रत्येकाला वाढवायची असते, तेव्हा हे स्वाभाविक मानले पाहिजे, असे उत्तर देत, या अवघड प्रश्नाची मोदींनी बोळवण केली. शेतकºयांच्या समस्यांसाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही़ मात्र राज्य सरकारांच्या कर्जमाफीच्या निर्णयांना आमचा विरोध नाही, असा ‘नरो वा कुंजरोवा’ पवित्रा पंतप्रधानांना घ्यावा लागला. भारतीय सैन्यदलाच्या सर्जिकल स्ट्राइकचा राजकारणासाठी वापर नको, हे एकीकडे मान्य करताना स्ट्राइक्सचे आॅपरेशन पूर्ण होईपर्यंत रात्रभर आपण कसे झोपलो नाही, अशा भावनात्मक प्रसंगाद्वारे सीमेवर देशासाठी प्राणांची बाजी लावणाºयांचा जाहीर गौरव करण्यात गैर काय? असा प्रतिसवालही त्यांनी केला अन् सर्जिकल स्ट्राइक्सचे सारे श्रेय पुन्हा एकदा स्वत:कडे घेतले. आपल्या प्राधान्यक्रमात देशाचे संरक्षण सर्वप्रथम आहे, असे नमूद करणाºया मोदींना सर्जिकल स्ट्राइक्सनंतर नेमके काय साधले गेले? ते स्पष्ट करता आले नाही. सरकारच्या विविध योजनांची मोदींनी पुन्हा एकदा उजळणी केली. चलनवाढीची टक्केवारी खूपच खाली आली, याचाही आवर्जून उल्लेख केला. मात्र, ती खाली का आली, त्याची कारणे स्पष्ट करण्याचे मोदींनी टाळले. बाजारपेठेत मंदी आहे, कोणत्याही मालाला हवा तसा उठाव नाही. शेतकºयांना आपला कृषिमाल रस्त्यांवर ओतावा लागतोय. चलनवाढ खाली येण्याची ही खरी कारणे आहेत. सामान्य जनतेला ही विसंगती समजते. मोदींनी प्रथमच आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रश्न उपस्थित करणारे काही अवघड प्रश्नही स्वीकारले. मात्र, त्याची उत्तरे देताना काठाकाठाने तरंगण्याची पळवाट त्यांनी शोधली. ९५ मिनिटांच्या मुलाखतीचे थोडक्यात वर्णन करायचे झाले, तर त्याला मोदींच्या ‘कसदार अभिनयाचा अभिनव साक्षात्कार’ असेच म्हणता येईल.
‘कसदार अभिनयाचा अभिनव साक्षात्कार’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 2:00 AM