- प्रतीक कानिटकरएखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करताना, उद्योजकाला भांडवल उभारणी या मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते आणि म्हणूनच उद्योजकाने भांडवल उभारणीच्या विविध पर्यायांकडे बारकाईने पाहणे हे गरजेचे ठरते. मागील लेखात बँका आणि आर्थिक संस्था कंपन्यांना कर्ज देताना नेमके कोणते घटक लक्षात घेऊन कर्ज देतात, याबद्दल जाणून घेतले. या लेखांतर्गत आपण बँक आणि वित्तीय संस्थांव्यतिरिक्त भांडवल उभारणीच्या पर्यायांबद्दल जाणून घेऊ.१. व्हेंचर कॅपिटलिस्ट (व्हीसी)व्हेंचर कॅपिटल फंड हे गुंतवणुकीचे फंड असतात, जे गुंतवणूकदारांच्या पैशाचे व्यवस्थापन करतात. असे फंड्स सुरुवातीस अशा लघू व मध्यम स्वरूपाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे इक्विटी शेअर्स विकत घेतात. ज्यांच्याकडे एक सक्षम व्यवसाय योजना व उत्तम विकासाची क्षमता असते. या प्रकारच्या गुंतवणुकी सामान्यत: उच्च धोका/उच्च-परतीचे संधी म्हणून दर्शविले जातात. गुंतवणुकीच्या वेळेस व्यवसायाची परिपक्वता लक्षात घेऊन, त्यानुसार सीड भांडवल, अर्ली-स्टेज भांडवल किंवा विस्तार-स्टेज वित्तपुरवठा या गुंतवणूक स्वरूपाची निवड केली जाते.निधीसह फंड पुरविणाऱ्या गुंतवणूकदारांना मर्यादित भागीदार (लिमिटेड पार्टनर्स) म्हणून नियुक्त केले जाते, तसेच फंड व्यवस्थापित करणाºया व्यक्तीस सामान्य भागीदार म्हणजेच जनरल पार्टनर्स म्हणून संबोधले जाते. त्याने स्थापित केलेल्या मापदंडांच्या आधारावर फंड कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे, हे सामान्य पार्टनर ठरवितात. व्हेंचर कॅपिटल आपल्या कंपनीसाठी निधी मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे. कारण उद्यम गुंतवणूकदार अशा कंपन्या शोधत आहेत, जे खूप वेगाने वाढत आहेत आणि अनेक वेळा गुंतवणूकदारांसाठी प्रारंभिक गुंतवणूक करू शकतात, परंतु सक्षम व्यवसाय योजनेच्या अभावामुळे कंपनीसाठी व्हेंचर कॅपिटल मिळतेच असे नाही, अशा परिस्थितीत व्यावसायिकाने इतर संभाव्यता पडताळणे योग्य ठरते, ज्यामध्ये पुढील प्रकारच्या पर्यायांचा समावेश होतो.२. एंजेल गुंतवणूकदार (एंजेल इन्वेस्टर्स) : एंजेल गुंतवणूकदार हे असे भांडवलदार असतात, जे त्यांच्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा मिळविण्यासाठी प्रारंभिक-स्तरीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. उद्यम भांडवलदारांप्रमाणे, जे इतर लोकांच्या गुंतवणुकीच्या पैशाचा वापर करून व्यवसायांसाठी निधी देतात, असे भांडवलदार स्वत:च्या पैशासह गुंतवणूक करतात. गुंतवणूकदारांना आपल्या व्यवसायाबद्दल सर्वाधिक आकर्षक बनविण्यासाठी, इतर कंपन्यांच्या तुलनेत आपण व्यवसायिक जोखमी कशा प्रकारे कमी केल्या आहेत, हे दाखविणे आवश्यक असते. आपण नफा किंवा अगदी महसूल जरी मोठ्या प्रमाणावर कमावत नसलो, तरीही तुम्ही नफा उभारणीच्या मार्गावर प्रयत्नशील आहात, हे एंजेल गुंतवणूकदारांना प्रदर्शित करणे इष्ट ठरते.३. क्राउड फंडिंग- या तत्त्वप्रणालीत इंटरनेटद्वारे आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपला व्यवसाय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवून छोट्या गुंतवणूकदारांकडून निधीची उभारणी केली जाते. क्राउड फंडिंग, ही भांडवल उभारणीची संकल्पना अमेरिका आणि यूकेमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. इंटरनेट किंवा सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करून व्यवसायिक निधी उभारू शकतो. या प्रणालीत आपल्या व्यवसायाची एक आॅनलाइन प्रोफाइल तयार केली जाते, ज्यामध्ये आपल्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि निधी उभारणीची उद्दिष्टे स्पष्ट केली जातात व छोट्या भांडवलधारकांना निधी उभारणीसाठी आमंत्रित केले जाते.जगाला क्राउड फंडिंग या तत्त्वप्रणालीची ओळख होण्याआधी भारतात मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणीची यशोगाथा रिलायन्स इंडस्ट्रिजच्या माध्यमाने राबविली गेली होती. ज्यात वस्त्रोद्योग व्यवसायातील अनेक लहान भांडवलधारकांनी योगदान केले. क्राउड फंडिंग ही एक प्रभावी भांडवल उभारणीची तत्त्वप्रणाली ठरत असल्याने, नजीकच्या काळात भारतात लवकरच क्राउड फंडिंगला नियमबद्ध करण्यासाठी आवश्यक कायदे येणे अपेक्षित आहे.४. गुंतवणूकदारांकरिता उत्तम प्रोजेक्ट रिपोर्टची आखणी- सध्याच्या स्पर्धात्मक युगात केवळ व्यवसायिकाच्या कल्पनांना किंवा योजनांना बँकांकडून वित्तपुरवठा मिळण्याची शक्यता फार धूसर असल्याने, व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात व्यावसायिकाने गुंतवणूकदारांकडे व्यवसाय योजना सादर करणे हे अधिक योग्य ठरते आणि म्हणूनच व्यावसायिकाने सर्वप्रथम एक सक्षम व्यवसाय योजना, ज्यामध्ये व्यवसायातील कामगिरीचा सशक्त ट्रॅक रेकॉर्ड गुंतवणूकदाराना प्रदर्शित करावा. या प्रोजेक्ट रिपोर्ट सादरीकरणात काही प्रमुख मुद्दे असणे हे आवश्यक ठरते. जसे व्यवसायाचे स्वरूप म्हणजेच प्रमुख उत्पादने आणि सेवांचा सारांश, प्रमोटर्सचा व्यवसायिक क्षेत्रातील अनुभव, उद्योगाची भविष्यातील समस्या संभावना म्हणजेच रिस्क, उत्पादनाची योग्य माहिती आणि उत्पादनाची निवड करण्याची कारणे, मार्केटिंगच्या योजना.तसेच आपण आपल्या प्रारंभिक कल्पनांसाठी निधी प्राप्त करू इच्छित असल्यास, आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की, व्यवसायिक योजनेत गुंतवणूकदार नेमके काय शोधत आहेत? व्यवसायिकाने गुंतवणूकदारांकडे हे प्रस्तापित केले पाहिजे की, तो कंपनीच्या रोख मिळकतीमधूनच म्हणजेच व्यवसायिक उत्पन्नामधूनच कर्ज अथवा गुंतवणुकीची परतफेड कशा प्रकारे करू शकतो, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा स्टार्ट-अप कंपनीवरील विश्वास प्रगल्भ होण्यास मदत होईल.५. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स देऊन निधी उभारणी - व्यवसायाच्या प्रारंभिक टप्प्यात गुंतवणूक करणाºया गुंतवणूकदारांना व्हेंचर कॅपिटलिस्ट (व्हीसी) असे संबोधले जाते आणि या टप्प्यावर व्यवसायात प्राप्त होणारी गुंतवणूक ही ‘सीरिज अ फंडिंग’ म्हणून ओळखली जाते. रजिस्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स देऊन निधी उभारण्यासाठी उत्तम संधी मिळू शकतात.प्रायव्हेट लिमिटेड प्रकारच्या व्यवसायात व्यवसाय आणि मालकामध्ये वैधानिक भेद असतो. म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वेगळे पॅन कार्ड असल्याने कंपनीचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते आणि म्हणूनच करार किंवा व्यवसायातून उद्भवलेल्या नुकसान भरपाईसाठी वैयक्तिकरीत्या गुंतवणूकदाराच्या खासगी मालमत्तेचा उपयोग केला जाऊ शकत नाही, तसेच एका भागीदाराच्या चुकांकरिता इतर भागीदारास वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जात नाही.व्हेंचर कॅपिटलिस्ट (व्हीसी) किंवा एंजेल इन्वेस्टर्स हेदेखील भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप फर्म किंवा प्रोप्रायटरी स्वरूपाच्या व्यवसायापेक्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मोठी आर्थिक मदत देण्यास पसंत करतात आणि म्हणूनच व्यावसायिकाने व्यवसायिक गरजेनुसार व्यवसाय प्रकारात बदल करणेही इष्ट ठरते.
भांडवल उभारणीसाठी नावीन्यपूर्ण पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 4:27 AM