नटसम्राटच्या ‘कोणी घर देता का घर?’चा टाहो पिढ्यान्पिढ्या आपले हृदय चिरत आलेला आहे. असंघटित क्षेत्रातील श्रमदेवतेच्या पूजकांच्या याच हृदयाला जखम करणा-या टाहोला एखादा हाडाचा कॉम्रेड कसे उत्तर देतो हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर सोलापूरला या! कामगारांच्या घरांची जादू काय असते याचा अनुभव आपल्याला इथला सच्चा कामगार नेता ‘श्रमिकांच्या घरांचा जादूगार’ नरसय्या आडम मास्तर हा देतो. जादू म्हटलं की तिचं नातं हे हातचलाखी आणि आभासाशी जोडलं जातं. येथे मात्र जादू तर आहे, पण सर्वकाही सत्य आणि सत्यच!अवघ्या २० हजार रुपयांत घर देऊन तब्बल १० हजार घरांमध्ये असंघटित कामगारांना हक्काचे घर याआधीच मिळालेले आहे आणि आता अवघ्या ३५-४० हजारांत घर देण्याची जिद्द बाळगून ३० हजार घरांच्या उभारणीला लागलेल्या माणसाला तुम्ही काय म्हणणार, घरांचा जादूगारच ना! सोलापूर शहरालगतच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे १० हजार घरांची जादू कामगार आनंदाने अनुभवतो आहे. भाषणातील आणि मोर्चामधील घोषणांच्या गगनभेदी आवाजासाठी ख्यातकीर्द असलेल्या कॉ. नरसय्या आडम यांनी महाराष्ट्राचे विधिमंडळही तीनवेळा आमदार म्हणून काम करीत असताना दणाणून सोडले होते, हे उभा महाराष्ट्र जाणतो.आडम मास्तर यांचे वडील नारायणराव आडम हे सोलापुरातील लक्ष्मी-विष्णू मिलमध्ये कामगार म्हणून कार्यरत होते. गणितात हुशार असलेले त्यांचे चिरंजीव नरसय्या शिक्षणात मात्र एसएससीपर्यंतच मजल मारू शकले. तिथेही नापासच झाले, पण गणितातील हुशारीमुळे कामगार वस्तीत शाळकरी मुलांच्या शिकवण्या घेऊ लागले. तिथेच त्यांना ‘मास्तर’ हे बिरुद चिकटले आणि श्रमिकांच्या प्रश्नात सर्वार्थाने झोकून दिलेला हा कार्यकर्ता आडम मास्तर म्हणूनच नावारूपास आला. तीनवेळा महापालिकेचे नगरसेवकपद, १९७८, १९९५ आणि २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा हाती घेऊन आमदारपद मिळाले. जसजशी पदे मिळत गेली तसतशी कामगार नेता म्हणून असलेली मास्तरांच्या चळवळीची धार अधिकच आक्रमक होत गेली. घोळदार विजार आणि सोलापुरी सदरा, अशा वेशात आपल्याच ढंगात काम करणाºया या माणसाने कामगारांची चळवळ हेच आपले विश्व बनविले. चळवळीत पाऊल ठेवल्यापासून या माणसाने आपले नाते सायकलशी जोडले. महापालिकेचा असो वा विधिमंडळाचा सदस्य असो सायकलवर फिरणे हेच आडम मास्तरांचे वैशिष्ट्य असायचे. ही सायकलची चळवळ भ्रमंती १९९५ पर्यंत राहिली. त्यानंतर कार्यकर्त्यांची रिक्षा भाड्याने घेऊन फिरण्याचा पर्याय त्यांनी अवलंबला. कामगारांना त्यांची तळमळ तर माहीत होतीच, पण वाढत्या वयाबरोबर होणाºया शारीरिक त्रासाची जाणीव ठेवून कामगारांनीच २०१५ साली कष्टाच्या घामाने मिळविलेल्या पै-पैतून त्यांना इनोव्हा ही चारचाकी गाडी भेट दिली. १ जून १९४३ साली जन्मलेल्या मास्तरांचे लग्न श्रीगोंद्याच्या कामिनी यांच्याशी झाले. परिचारिका सेवेत असलेल्या कामिनी यांनी मास्तरांना प्रत्येक वळणावर साथ दिली. आजही त्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत.राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांना पंतप्रधान आवास योजनेची जोड देऊन कॉ. आडम मास्तर यांंनी जागतिक पातळीवर विक्रम व्हावा, अशा असंघटित कामगारांसाठीच्या ३० हजार घरांची योजना हाती घेतली आहे. या अगोदर २००६ साली अशीच १० हजार घरे कामगारांना दिलेली आहेत. असंघटित कामगारांचा हा तारणहार हक्कांच्या घरांचा जादूगार ठरतो आहे. त्यांच्या या कामात नलिनी कलबुर्गी, कॉ. युसूफ शेख मेजर, अंकुर पंधे, अॅड. एम. एच. शेख, अनिल वासम, राजेंद्र दंडी, सलीम मुल्ला, सनी शेट्टी यासारखे हजारो हात मदत करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सीताराम येचुरी यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मास्तरांच्या मदतीला धावल्याचे दिसते.
वेध - घरांचा जादूगार आडम मास्तर...
By राजा माने | Published: September 15, 2017 12:11 AM