माझ्या या युगाइतके, इतिहासातील कोणत्याही युगाने पेटविले नव्हते रक्तरंजित वैर परमेश्वराशी. दिसता आहेत मला सहस्र कट्यारी, ईश्वराच्या मारेकऱ्यांनी उपसलेल्या, त्याच्या उरातील रक्त तांबडे आहे आपल्याप्रमाणे की पांढरे आहे खचलेल्या वृक्षातून वाहणाऱ्या द्रवाप्रमाणे हे शोधण्यासाठी आसुसलेल्या...- कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या कवितेची आठवण येण्याचे कारण म्हणजे पुतळ्यांसदर्भात शासनाने काढलेला नवा आदेश. एखाद्या महापुरुषाचे एकापेक्षा अधिक पुतळे एकाच शहरात उभारण्यासाठी दोन किलोमीटर हद्दीची मर्यादा आखून देण्यात आली आहे. पुण्यासारख्या शहरात तर चौकाचौकात असे पुतळे असून, वाहतुकीच्या जटिल प्रश्नाला एका अर्थाने हे ‘महापुरुष’ही जबाबदार आहेत. त्याचबरोबर पुतळा उभारणाऱ्या संस्थेवर संबंधित पुतळ्याची देखभाल, पावित्र्य आणि मांगल्य राखण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. पुतळ्यांच्या उभारणीबाबत कोणाचाही विरोध किंवा दुमत असल्याचे कारण नाही. अनुयायांसाठी ती प्रेरणास्थळेच असतात. त्यांच्या रूपाने महापुरुषांच्या विचारशलाका तेवत असतात. परंतु, दुर्दैवाने हा उत्साह टिकत नाही. एखादा पुतळा उभारण्यासाठी गौरव समितीसारखी संस्था उभी राहते. पण त्यानंतर या महापुरुषाच्या नशिबी वनवास येतो. ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक संकटांबरोबर माथेफिरूंपासूनही धोका होतो. मग त्यातूनच दया, करुणेची शिकवण देणाऱ्या महापुरुषांचे अनुयायी हिंसेवर उतरल्याची उदाहरणे आहेत. जयंती, पुण्यतिथीशिवाय या पुतळ्यांची देखभालही होत नाही. यासाठी पुतळा उभारणाऱ्या संस्थेवरच ती जबाबदारी टाकण्याची केलेली तरतूदही स्वागतार्ह आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. ही अट पाळली गेली नाही तर पुतळा हटविण्याबरोबरच दंडाचे अधिकारही या समितीला दिले गेले आहेत. नेत्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनीही ही नियमावली सकारात्मकपणे घ्यावी हीच अपेक्षा आहे. महापुरुषांच्या दोन पुतळ्यांमध्ये किती अंतर आहे यापेक्षा त्याचे विचार आपल्या अंतरी किती वसत आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
प्रेरणास्थळ ‘अंतरी’चे
By admin | Published: May 08, 2017 11:37 PM