प्रतिष्ठापना.. ‘सुशील’ भवनात ‘दादां’चं आगमन..

By सचिन जवळकोटे | Published: September 12, 2021 08:49 AM2021-09-12T08:49:28+5:302021-09-12T08:51:21+5:30

लगाव बत्ती...

Installation .. Arrival of 'Dada' in 'Sushil' Bhavan .. | प्रतिष्ठापना.. ‘सुशील’ भवनात ‘दादां’चं आगमन..

प्रतिष्ठापना.. ‘सुशील’ भवनात ‘दादां’चं आगमन..

Next

- सचिन जवळकोटे


गेली अनेक दशकं ‘हात’वाल्यांचं ‘भवन’ पुरतं ‘शिंदे’मय राहिलेलं. या भवनातल्या फ्लेक्सलाही केवळ ‘सुशील’हास्यच ठावूक. इथल्या भिंतींनाही ‘प्रणिती’वाणीच माहीत. मात्र, इतिहासात प्रथमच या भवनात ‘अकलूजकरां’ची एंट्री झालेली. तेही ‘पिता-पुत्री’च्या परस्पर. ‘शिंदे’ फॅमिलीला म्हणे मुंबईच्या बंगल्यातला गणेशोत्सव महत्त्वाचा; मात्र इथं सोलापुरात वाजत-गाजत झालेली ‘प्रतिष्ठापना’ जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळं रंग देऊन गेलेली. ‘शिंदें’च्या ताब्यातला जिल्हा त्यांच्याच ‘हायकमांड’नं ‘हायजॅक’ केला की ‘धवलदादां’नी लातूरमधील ‘देशमुखां’च्या खांद्यावर ‘बंदूक’ ठेवून ही राजकीय ‘शिकार’ साधली, याचाच शोध आजच्या लगाव बत्तीत..

 ‘घोडेस्वारी अन् शूटिंग’मधली

दोस्ती राजकारणात कामाला..

एकवेळ पक्ष वाढला नाही तरी चालेल; मात्र मनस्ताप वाढविणारा उचापत्याखोर नेता अध्यक्षपदी नको.. हीच भूमिका ‘सुशीलकुमारां’नी आजपावेतो बाळगलेली. यामुळंच ‘मोदी’ वादळातही माळशिरसचा मिणमिणता ‘प्रकाश’ कसाबसा टिकून राहिलेला. मात्र, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ‘पटोले नानां’च्या डोक्यात ‘कुछ तो करकेऽऽ दिखाना है’चं वारं शिरलेलं. मग काय.. वारं फिरेल तसं पाठ फिरविणाऱ्यांसाठी ही खूप मोठी नामी संधी चालून आली, कारण बदलाबदलीची वावटळ उठली.

माळशिरसच्या ‘रामहरीं’चं अकलूजच्या ‘धवलदादां’शी गुफ्तगू रंगलं. कधीकाळी ‘कमळ’वाल्यांच्या पार्टीत कैक वर्षे राहिलेल्या ‘रूपनवरां’नी ‘डोस्कॅलिटी पॉलिटिक्स’ चांगलंच हस्तगत केलेलं. यापूर्वीही त्यांनी ‘वेणुगोपाल अन् प्रकाश’सारख्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून थेट दिल्लीहून आमदारकी मिळविलेली. आता ‘धवलदादां’साठी ‘लातूरची देशमुखी’ मदतीला धावली. ‘घोडेस्वारी अन् शूटिंग’मधली दोस्ती इथं कामाला आली. त्यात पुन्हा ‘एचके’ नीही ‘पाटील’की पणाला लावली.

ध्यानी-मनी नसताना आकस्मिक ‘धवलदादां’चं नाव जाहीर झालं. कार्यकर्त्यांमध्ये गहजब माजला. जुने दचकले. निष्ठावानही चमकले. ‘जनवात्सल्य’नं मात्र मौनव्रत बाळगलं. बदलत्या राजकारणात ‘ममं’ म्हणण्याशिवाय त्यांच्याकडं पर्यायच नव्हता.. कारण आगामी राज्यसभेच्या सहा जागांवर ‘पित्या’चं लक्ष होतं. मंत्रिमंडळाच्या विस्तारीकरणात ‘ताईं’ना अधिक इंटरेस्ट होता. लाल दिवा नाही मिळाला तरी किमान ‘विठ्ठल समिती’ किंवा ‘हुडको’ महामंडळाचं अध्यक्षपद तरी चाललं असतं. त्यामुळं जिल्हाध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठी आपली ताकद विनाकारण खर्ची करण्यात त्यांना बिलकुल रस नव्हता. मुंगीसाठी ब्रह्मास्त्र वापरायचं नसतं, हे दोघांनाही खूप चांगलं ठाऊक होतं. असो.

जरी जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळालं असलं तरी ‘शिंदे फॅमिली’ला दुखवून या पक्षात राजकारण करू शकत नाही, हेही ‘धवलदादां’च्या आधुनिक मार्गदर्शकानं सांगितलेलं. म्हणून त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी दोघांनाही निमंत्रण दिलं. मात्र, ‘घरातला गणेशोत्सव’ महत्त्वाचा असल्यानं म्हणे ‘पिता-पुत्री’नं या राजकीय प्रतिष्ठापनेला मुंबईतूनच शुभेच्छा (!) दिल्या. अखेर ‘दादा’ भवनात पोहोचले; त्यांच्यासोबत ‘जनसेवा टीम’ही होतीच. इथल्या भिंतीचा रंग या कार्यकर्त्यांनी अप्रूपतेनं पाहिला. अकलूजच्या हलगीचा आवाजही मंडपानं नवलाईनं ऐकला.

पूर्वी ‘विजयदादा अन् प्रतापसिंह’ही या पक्षात असताना कधी भवनात आल्याचं ऐकिवात नव्हतं. एकदाच फक्त ‘कमळे गुरुजीं’नी हट्ट धरल्यानं इलेक्शन अर्जासाठी ‘अकलूजकर’ नाइलाजानं इथं येऊन गेलेले. त्यामुळं आजपावेतो ‘साहेब, ताई, अण्णा अन् अप्पा’ असे टिपिकल शब्द ऐकण्याची सवय झालेल्या या भवनाला प्रथमच ‘दादा’ शब्द माहीत झालेला. ‘दादांची एंट्री’ ही पक्षाच्या बदलत्या राजकारणाची नांदी. ‘जनवात्सल्य’ची सूत्रं ‘प्रतापगडा’वर जाणं, हीही ‘हायकमांड’च्या बदलत्या मानसिकतेची लक्षणं.  मात्र, तीन इलेक्शनमध्ये तावून-सुलाखून निघालेल्या ‘ताई’ही पक्षावरची पकड एवढ्या सहजासहजी सुटू देणार नाहीत. मात्र, त्यासाठी त्या काय-काय करू शकतात, याचा सविस्तर स्वतंत्र भाग नंतर कधीतरी. तोपर्यंत लगाव बत्ती..

पप्पां’ची पुण्याई अन् ‘माऊलीं’ची साथ..

शेवटच्या श्वासापर्यंत ‘पप्पा’ राजकीय संघर्ष करत राहिलेले. ‘लढत राहणं अन् हार न मानणं’ हा त्यांचा उपजत गुण. तीच वृत्ती ‘धवलदादां’मध्येही आली असेल तर अधिकच उत्तम. मात्र, रात्रभर जागून जंगलातली शिकार साधणं वेगळं. सकाळी लवकर उठून सर्वसामान्य जनतेत मिसळणं वेगळं, यातला फरक पूर्वी एकदा  ‘थोरले काका बारामतीकरां’नी ‘इंजीन’वाल्या ‘राज’ना समजावून सांगितलेला. आता या ‘दादां’ना कदाचित त्यांच्या राजकीय गुरू अर्थात् त्यांच्या ‘माऊली’च सांगतील.
जिल्हाध्यक्षपदाचा चार्ज घेण्यापूर्वी ‘दादामाऊलीं’नी ज्या पद्धतीनं फोनाफोनी करून कार्यकर्ते कामाला लावले. जशी प्रचंड गर्दी जमवली, ते पाहता ‘दादा’ खूप भाग्यवान. ‘पप्पां’ची पुण्याई अन् ‘माऊलीं’ची साथ असल्यानं ते या नव्या खुर्चीवर बसून चमत्कार दाखवतीलच. मात्र, चौकात लोकांची गर्दी दिसली तर गाडीच्या काळ्या काचा खाली आल्याच पाहिजेत, ही लोकप्रिय नेत्याची यशस्वी राजनीती. लगाव बत्ती.. 

इकडं ‘रणजितदादा’.. ..तिकडं ‘संजयमामा’

या पदासाठी ‘दक्षिण’चे ‘पीके’ देव पाण्यात ठेवून बसलेले. मात्र मोठ्यांच्या राजकारणात नेहमीप्रमाणं त्यांचा बळी गेला. अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर या ‘हसापुरें’नी चरफडत अनेकांना कॉल केले. अकलूजच्या ‘रणजितदादां’कडं दु:ख व्यक्त केलं, ‘या पक्षासाठी एवढं मर-मरूनही उपयोग नसेल तर बाहेर पडायचा विचार करतोय’ अशी भावनाही प्रकटली. मात्र, समोरचा प्रॉब्लेम तर म्हणे वेगळाच होता. ‘कमळ’वाल्यांच्या पार्टीतही म्हणे सध्या गढूळ वातावरण बनलेलं. कुणाचा कुणाला मेळ नसलेला. त्यामुळं आगीतून फुफाट्यात पडण्यापेक्षा आहे तोच ‘हात’ हातात धरून ठेवण्याचा प्रामणिक सल्ला दिला गेलेला.

मग ‘निमगाव’च्या ‘संजयमामां’ना त्यांचा कॉल गेला. त्यांच्या पार्टीची तर म्हणे याहूनही विचित्र अवस्था झालेली. ‘भरणेमामा’ काही हटेना, ‘संजयमामां’कडं काही पालकत्त्व येईना. त्यात पुन्हा बारामतीचे ‘थोरले काका’ही जवळ करेनात. हे ऐकून ‘सुरेश’ ताळ्यावर आले. ‘पाय ओढाओढी’च्या खेळात माहीर असलेल्या  ‘धनुष्य’वाल्या ‘बरडें’ना अन् ‘बेस की भाषा’वाल्या ‘शाब्दीं’ना मोबाईल रिंग देण्याचा मोह आवरला.

इकडं ‘दक्षिण’मध्ये वेगळंच राजकारण रंगलेलं. ‘धवलदादां’ना घोडेस्वारीची पूर्वीपासून आवड; मात्र त्यांना ‘दक्षिण’ आमदारकीच्या रणांगणात बळंबळंच घोड्यावर बसविण्यात येऊ लागलेलं. म्हणूनच की काय, पहिला दौरा ‘दक्षिण’चाच ठेवलेला. खरंतर सध्या  ‘प्रतापगडा’ची नजर ‘माढ्या’वर, कारण या मतदारसंघातली बरीच गावं माळशिरस तालुक्यातलीच. त्यात ‘जनसेवे’ची मोठी ताकदही इथंच. त्यामुळं भविष्यात आपल्याच भूमीत  ‘बबनदादां’ना (की सुपुत्र रणजितसिंहांना ?) मोठा संघर्ष करावा लागणार असल्याची कुजबुज रंगलेली. अशावेळी ही ‘दक्षिण’स्वारी अकस्मात चर्चेत आलेली.. म्हणूनच ‘बबनदादा’ अन् ‘सुभाषबापू’ फोनाफोनी करून आपुलकीनं एकमेकांची विचारपूस करताहेत, असंही स्वप्न उगी-उगीच त्यांच्या कार्यकर्त्यांना पडू लागलेलं. लगाव बत्ती..

( लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Installation .. Arrival of 'Dada' in 'Sushil' Bhavan ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.