सचिन जवळकोटे
सोलापूर : गावोगावच्या पारावर सध्या एकच चर्चा आहे. ‘राष्ट्रवादीचा कोणता नेता भाजपमध्ये जाणार अन् काँग्रेसचा कोणता पुढारी शिवसेनेत प्रवेश करणार?’... अकलूजच्या मोहिते-पाटलांनी लोकसभेला पक्षांतराचा नारळ फोडल्यापासून जिल्ह्यात जणू आयारामांची मांदियाळीच निर्माण झाली आहे. मात्र, या गदारोळात ‘युतीतील’ मूळ निष्ठावानांचा श्वास पुरता घुसमटत चाललाय़ या साºया घडामोडींचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार, हे निश्चित.
सोलापूर अन् माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आल्यापासून पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला आहे. निवडून येऊ शकणाºया साºयाच आयारामांना पक्षात घेण्यासाठी जणू चढाओढ सुरू झालीय़ काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे या दोघांच्याही संपर्कात आहेत़ युतीत अक्कलकोट मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल, यावर म्हेत्रेंचा निर्णय अवलंबून आहे़ ‘सोलापूर शहर उत्तर’मध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी निर्माण केलेल्या साम्राज्याला आव्हान देण्याचं धाडस सध्यातरी कोणत्याच काँग्रेस नेत्यानं दाखविलेलं नाही; मात्र राष्ट्रवादीकडून पाच जणांनी दंड थोपटण्याची तयारी दाखविली आहे.
‘शहर मध्य’मध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे लोकसभा निवडणुकीतील पित्याच्या पराभवाची मरगळ झटकून कामाला लागल्या आहेत. यदाकदाचित काँग्रेस अन् ‘वंचित बहुजन’ची आघाडी झाली तर या ठिकाणी ‘एमआयएम’चाही उमेदवार दिसणार नाही़ त्याचा फायदा प्रणितींना होऊ शकत असला तरी पूर्वभागातील आडम मास्तरांचं राजकारण ‘कोठे’ फिरतं, त्यावर पुढील साºया गोष्टी अवलंबूऩ दक्षिण सोलापूर मतदारसंघात सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी आपलं चांगलं बस्तान बसविलं असलं तरी सध्या विस्कळीत झालेल्या काँग्रेस नेत्यांची भूमिकाही शेवटच्या क्षणी ठरू शकते महत्त्वाची.
बार्शीत सध्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेचे भावी आमदार म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत (केले!) असले तरी राजाभाऊ राऊतांची बंडखोर वृत्ती लक्षात घेऊनच युतीच्या वरिष्ठ नेत्यांची मतं अद्याप गुलदस्त्यात आहेत़ माढ्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली असली तरी मोहिते-पाटलांचा कडाडून विरोध होऊ शकतो. पंढरपुरातही काँग्रेसचे आमदार भारत भालके सध्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असले तरी त्यांना शिवसेनेत नेण्यासाठी आखली गेलीय जोरात व्यूहरचना़ सांगोल्यात तर खुद्द राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षच तळ्यात-मळ्यात. हा मतदारसंघ दशकांनुदशके शेकापच्या पर्यायानं गणपतराव देशमुखांच्या ताब्यात राहिल्यानं दीपक साळुंखे-पाटील गट पक्षाचा उंबरठा ओलांडण्याच्या तयारीत आहे.
‘करमाळा विधानसभेला रश्मी बागल यांच्या विरोधात उभारणार नाही,’ असा शब्द मिळाल्यानं लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांचा बागल गटानं प्रचार केलेला़ मात्र, पराभवानंतर शिंदे गटानं पुन्हा एकदा नेहमीप्रमाणं उसळी मारलीच.
त्यामुळं किमान इथंतरी शरद पवारांचा शब्द जपला जातो की नाही? याकडं तमाम जिल्ह्याचं लक्ष. राहता राहिला विषय माळशिरस अन् मोहोळ राखीव मतदारसंघांचा. माळशिरसचे आमदार हणमंतराव डोळस यांचं निधन झाल्यानं अन् मोहोळचे आमदार रमेश कदम अद्याप आर्थिक घोटाळ्यात ‘आत’मध्येच असल्यानं नव्या चेहºयांची प्रतीक्षा आता लागून राहिलीय.