अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत आणि पाकिस्तान या दोहोंना एकाच तराजूत तोलणे, चीनने उघड उघड पाकिस्तानची पुन:पुन्हा तरफदारी करणे, पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारताने पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाचे सहर्ष स्वागत करणे, परंतु भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला पाकिस्तानात जाऊन तपास करण्याची वेळ येताच उभय देशांमधील संवादसत्र निलंबित झाल्याचे दिल्लीतील पाकच्या उच्चायुक्तांनी जाहीर करणे या साऱ्या घटनाक्रमात निश्चितच एक संगती दिसते. पठाणकोट प्रकरणी भारताच्या हाती जे पुरावे लागले त्यांची शहानिशा करण्यासाठी दोन्ही देशांच्या तपास यंत्रणांनी परस्परांच्या देशात जाऊन आपल्याकडील पुराव्यांची छाननी करण्याला उभय पंतप्रधानांच्या पातळीवर मान्यता मिळाली होती. पण पाकचे उच्चायुक्त अब्दुल बसीत आता म्हणतात की, विषय सहकार्याचा होता, परस्पर देवाणघेवाणीचा कधीच नव्हता. पठाणकोटच्या हल्ल्याची सूत्रे जैश-ए-मुहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याने हलविली असे भारतीय तपास यंत्रणेला आढळून आले असले, तरी या यंत्रणेने पाकच्या हवाली केलेल्या कागदपत्रांमध्ये त्याच्या नावाचा उल्लेखच म्हणे केला नव्हता. तरीही आम्ही भारतीय तपास अधिकाऱ्यांना त्याची चौकशी करू देणार नाही, असे पाकने जाहीर करून टाकले. याच मसूदवर बंदी लादण्याचा जो प्रस्ताव भारताने युनोला सादर केला होता, त्या प्रस्तावाच्या विरोधात चीनने नकाराधिकाराचा वापर केला. आता तर पाकिस्तानने एकतर्फीच चर्चेचे सारे दरवाजे बंद करून पुन्हा काश्मीरचा प्रश्न उकरून काढला आहे. बसीत यांची संबंधित घोषणा झाल्यानंतर काही तासांच्या आतच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून काश्मीरचा गुंता सोडविला पाहिजे असा शहाजोग सल्ला दिला आहे. हा जो काही सारा गुंता झाला त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसने पाकिस्तानला जो काही बोल लावायचा तो लावतानाच विद्यमान भारत सरकारलाही जे दूषण दिले आहे ते योग्यच आहे. व्यावहारिक भाषेत बोलायचे तर पाकिस्तान भारताचा खेळ करतो आहे आणि भारत स्वत:ला खेळवून घेत आहे, असेच म्हणणे भाग आहे.