युवक काँग्रेसच्या महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकवार त्या पक्षात रुजलेली घराणेशाही विजयी झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले सत्यजीत तांबे हे महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. याअगोदरच्या निवडणुकीतही या भाच्याने त्याच्या मामाच्या भरवशावर ही जागा जिंकली होती. अमित झनक हे उपाध्यक्षपदावर निवडून आलेले युवक माजी महिला व बालकल्याण मंत्री सुभाष झनक यांचे चिरंजीव आहेत. तर दुसरे उपाध्यक्ष कुणाल राऊत हे माजी मंत्री व काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत. बापाची जागा मुलाने घेऊन किंवा मामाची जागा त्याच्या भाच्याने बळकावणे यात परंपराविरोधी असे काही नाही. आपली ती अनेक शतकांची परंपरा आहे. अडचण एवढीच की या परंपरेत लोकशाहीच नव्याने घुसली आहे. १५ आॅगस्ट १९४७ या दिवशी हा देश स्वतंत्र झाला आणि १९५२ मध्ये त्याने आपल्या घटनेनुसार संसदीय लोकशाहीचा स्वीकार करून निवडणुका घेतल्या. तशी त्या निवडणुकांची सुरुवात १९१९ व १९३७ पासूनच झाली. मात्र १९५२ मध्ये खऱ्या लोकशाहीला सुरुवात झाली. ही लोकशाही राजकीय पक्षातही यावी यासाठी या देशाचे राजकारण व त्याचे नेतृत्व गेली पाऊणशे वर्षे नुसताच आकांत करीत आहे. परंतु सत्तेची घमेंड आणि तिच्यावरची परंपरागत मालकी सोडायला जुनी माणसे तयार नाहीत आणि त्यांच्या घरातल्या नव्यांना हे सारे फुकटात मिळत असेल तर ते हवेच आहे. त्यातून बाप पक्षात पदाधिकारी असला की त्याचे चेले-चपाटे, स्नेही, दलाल, उपकृत व त्याच्या दारात पाणी भरणारी चापलूसखोर माणसे यांचा पाठिंबा अशा नव्यांना तत्काळ मिळतो. त्यातही बाप सत्ताधारी असेल तर त्याचे सत्तास्थान त्यातील अधिकारी व यंत्रणांसह राबवूनही घेता येते. पूर्वी अशाच एका निवडणुकीत राज्याच्या वनमंत्र्याचे पोर अध्यक्षपदासाठी उभे होते आणि त्याच्यासाठी सारे वनखाते, त्यातील अधिकारी, कर्मचारी व डाकबंगले असे सारे कामाला लागलेले दिसत होते. अशा निवडणुका पद देतात, इभ्रत देत नाहीत. आताची स्थिती आणखी वेगळी आहे. सध्या बापांच्याच जागांचा, तिकिटांचा व निवडून येण्याचा भरवसा नाही. त्यांनाही ते चांगले ठाऊक आहे. जे राजीव गांधी वा राहुल गांधींच्या वाट्याला येते ते या साºयांच्या वाट्याला येत नाही. त्यांच्यामागे शतकांचा इतिहास व अभूतपूर्व त्याग उभा आहे. त्या इतिहासाने व त्यागाने त्यांना देशाचे प्रतीक बनविले आहे. आताच्या महाराष्ट्रातील पुढाºयांच्या पोरांनाही आपण तसेच बनलो आहोत असे वाटत असेल तर विदर्भाच्या भाषेत सांगायचे झाले तर तो त्यांचा ‘बह्याडपणा’ आहे. तो त्यांना दूर करता येत नसेल तर त्यांच्या बापांनी तो दूर करावा आणि बापही त्यातलेच असतील तर पक्षाच्या अन्य नेत्यांनी ते काम करावे. गांधीजी म्हणायचे, काँग्रेस ही लोकचळवळ आहे. तीत लोक येत राहतील. नित्य नव्यांचा भरणाही होत राहील. आताचे संघटनशूर मात्र पक्षाला कुंपणे लावून बसले आहेत आणि जमेल तेव्हा ती कुंपणे आतून मजबूत करीत आहेत. बाहेरचे कुणी आत येणार नाहीत आणि आम्हाला कुणी बाहेर जायला लावणार नाहीत अशा चिंतेत असलेली ही लाडावलेली बाळे पक्ष वाढू देत नाहीत आणि त्यात नव्यांना येऊ देत नाहीत. अशी बंद मनाची आणि मंद बुद्धीची पोरे हाताशी धरून राहुल गांधी त्यांचा पक्ष विजयाच्या दिशेने कसा नेतील? राहुल गांधींना पक्षात नवीन संजीवनी आणायची असेल तर आताची महाराष्ट्र युवक काँग्रेसची नव्याने निवडून आलेली जुन्यांचीच कार्यकारिणी त्यांनी तत्काळ बरखास्त केली पाहिजे. कोणत्याही सत्ताधारी राहिलेल्या बापाच्या पोराला अशी निवडणूक लढवायला त्यांनी बंदी घातली पाहिजे. कितीही काळ बदलला तरी संघटनेचा चेहरा तसाच राहणार आहे. काँग्रेसचे खरे नूतनीकरण करायचे तर त्यासाठी अतिशय खंबीर उपायच आता करणे गरजेचे आहे. राहुल गांधींकडून ती अपेक्षा आहे. तसे झाल्यास पक्षात नवे तरुण येतील आणि ते पक्षाला विजयापर्यंत पोहोचवू शकतील.
बाटली तीच, पेयही तेच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 6:16 AM