नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा अन्वयार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 04:54 AM2020-02-25T04:54:09+5:302020-02-25T07:03:24+5:30
आदित्यला मायेने जवळ घेऊन मोदींनी दिलेले संकेत महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची भगवी दिशा ठरवणारे आहेत
- विकास झाडे, संपादक, लोकमत दिल्ली
मुख्यमंत्री झाल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची पहिलीच दिल्ली भेट ही महाविकास आघाडीमध्ये अस्थिरता निर्माण करणारी ठरली. ‘छोटा भाई-मोटा भाई’ करीत पंतप्रधान नरेद्र मोदी-ठाकरेंनी विधानसभेची एकत्र लढलेली निवडणूक आणि त्यानंतर खुर्चीसाठी दोघांचीही उफाळलेली परमोच्च भावना ही भाजप-सेनेला विभक्त करणारी ठरली. उद्धव ठाकरे टोकाची भूमिका घेऊन आपल्यापासून विभक्त होऊ शकतात, असे मोदी-शहांना स्वप्नातही वाटत नव्हते. परंतु शरद पवारांची संपूर्ण शक्ती पाठीशी असल्याने ठाकरेंना भाजपच्या विरोधात दंड थोपटता आले.
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार बसले. परंतु या तिन्ही पक्षांतील मंत्री एकही दिवस स्वस्थ झोपू शकले नाहीत. त्यांना म्हणे सरकार गडगडल्याची स्वप्ने पडतात. त्यांच्यात स्वस्थता तरी कशी असेल? शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधाराच भिन्न आहे. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे. वेगळे झाले असले तरी भाजप आणि शिवसेनेचे अद्यापही ३६ गुण जुळतात. किमान समान कार्यक्रमाअंतर्गत आमचे ३६ गुण जुळल्याचे भासवून महाविकास आघाडीने कसेबसे तीन महिने काढले आहेत. महाविकास आघाडीची ‘पत्रिका’ बनविणारे पंडित शरद पवार यांना या काळात ठाकरेंच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त करावी लागली. सीएए, एनपीआरला पाठिंबा देणे पवारांना आवडले नाही. काँग्रेसही यावरून ठिणग्या उडवित असते. असे असले तरी महाविकास आघाडीचे सरकार संपूर्ण पाच वर्षे चालेल अशा बातम्या पवारांना द्याव्या लागतात. ओढूनताणून तयार करण्यात आलेली पत्रिका खोटी ठरू नये याचा प्रयत्न पवारांना करावाच लागेल. दुसरीकडे सर्वज्ञात असेही आहे की, पवार जे बोलतात, वास्तवात तसे होत नाही. यावरूनच महाविकास आघाडीच्या लग्नाची गोष्ट ही एक दंतकथा बनण्याच्या मार्गावर दिसते.
महिनाभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बरेच बदललेले दिसतात. केंद्राच्या काही धोरणांचे मुक्तपणे स्वागत करण्याचा त्यांचा आत्मविश्वास चिंतनीय आहे. शरद पवारांची जागा मोदी-शहांनी तर घेतली नाही ना, असेही ठाकरेंच्या कृतीवरून दिसून येते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डोळे दाखविले तरी आपल्या खुर्चीला जराही धोका नाही याची खात्री त्यांना असावी. किमान समान कार्यक्रमाचा विषय नसलेल्या सीएएसारख्या बाबींची ते दिल्लीत पत्रकारांपुढे जोरकसपणे बाजू मांडतांना दिसतात. उलट शाहीनबागचे आंदोलन भडकविणाऱ्यांनी सीएएचा आधी अभ्यास करावा, असेही सूचवतात. खरे तर नाव न घेता त्यांनी काँग्रेसच्या मुस्काटात हाणण्याची हिंमत दाखवली. त्यांच्यात हे बळ आले कुठून? शुक्रवारी मोदींसोबत भेट झाल्यानंतरचे गुपित यात दडले नसेल कशावरून?
मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदी हे ठाकरेंना पहिल्यांदाच ठरवून भेटले. मोदींनीही त्यांना तब्बल एक तास दिला. आदित्य ठाकरेही सोबत होते. या भेटीचे फोटो शिवसेनेने जारी केले आहेत. त्यात आदित्यला मोदींनी मायेने जवळ घेतले आहे. पंतप्रधान झाल्यापासून एकाही विरोधकास मोदींनी इतक्या प्रेमाने जवळ घेतल्याचे याआधी एकही छायाचित्र पुढे आले नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्याला फटका मारला याचे जराही शल्य मोदींच्या चेहऱ्यावर नव्हते किंवा ठाकरे पिता-पुत्रास आपण मोदींपासून दूर आहोत असे त्यांच्या देहबोलीवरून जाणवले नाही. तासाभराच्या बैठकीत काय झाले? पत्रकारांच्या या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी बगल दिली. मोदींची भेट झाल्यानंतर त्यांना लगेच सोनिया गांधी यांना भेटायचे होेते. दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊ शकले असते. दोन्ही नेत्यांचे झालेले हितगुज त्यांना कथन करता आले असते. ठाकरेंनी मात्र ते टाळले. उलट सोनिया गांधी यांच्याकडे जाण्यापूर्वी, सीएएला विरोध करण्यापूर्वी अभ्यास करा, असा इशाराच काँग्रेसला दिला.
ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांची जराही पर्वा न करता मोदींचे कौतुक करण्याचा जो धडक कार्यक्रम सुरू केला आहे, यातच बरेच काही दडलेले दिसते. आता भाजपही सौम्य झाली आहे. शिवसेनेला सापत्न वागणूक दिली होती याचा साक्षात्कारही त्यांना झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या धमन्यांमध्ये भगवी राष्ट्रभक्ती ठासून भरली आहे. अशात महाराष्ट्रासारखे मोठे राज्य दूर ठेवणे मोदी-शहांनाही परवडणारे नाही. उद्धव ठाकरेंच्या खुर्चीला जराही धक्का न लावता दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान केल्याचे पुण्य भाजप पदरी पाडून घेऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही मोदी-ठाकरे दीर्घ भेटीचा अन्वयार्थ लक्षात घ्यावा. आदित्यला मायेने जवळ घेऊन मोदींनी दिलेले संकेत महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची भगवी दिशा ठरवणारी आहे.