डॉ. एस. व्ही. आगरकर, विज्ञान, पर्यावरण अभ्यासक
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. त्याची उत्पत्ती उल्कापातामुळे झाली असे मानले जाते. हे सरोवर बेसाॅल्ट खडकातील विवर असून, त्यातील पाणी अल्कधर्मी गुणधर्माचे आहे. या सरोवराला जागतिक दर्जाचे रामसर पाणथळ व वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. जागतिक वारसास्थळाचा सरोवराला दर्जा मिळविण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.
लोणार सरोवराचा परिसर हा वैज्ञानिक, धार्मिक, पौराणिक, भूगर्भशास्त्रीय, खगोलशास्त्रीय व पर्यावरणशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा अद्वितीय आणि रहस्यमय नैसर्गिक ठेवा आहे. या परिसरात अनेक दुर्मीळ खडक, खनिजे, मौल्यवान स्फटिके, लोहयुक्त माती, क्षारयुक्त पाणी, विविध प्रकारचे सूक्ष्मजीव, हरितनील शेवाळ, प्राणी, पशू-पक्षी, विविध वनस्पती, पुरातन मंदिरे, मंगळावरील माती- खडकाशी मिळतेजुळते माती-खडक इ. आढळतात. सरोवरातील या विविधतेमुळे राज्यातील, देशातील व जगभरातील वैज्ञानिक संशोधक व पर्यटक सरोवराला भेट देण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी लोणार येथे येतात.
अशा वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक ठेव्याला पुढच्या पिढीसाठी, संशोधकांसाठी व सजीवसृष्टीच्या कल्याणासाठी अबाधित ठेवण्यासाठी सर्वच स्तरांवर संरक्षण व संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.
संरक्षण व संवर्धन करताना सरोवराला विविध कारणांमुळे धोके निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दूषित व सांडपाण्याचा निचरा, अभयारण्यात अनधिकृत प्रवेश, वृक्षतोड, सरोवरातील पाण्याच्या पातळीत वाढ, सरोवराच्या पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल, सरोवराजवळच्या भागातील शेती व पूर्वेकडील पाळेजवळील महामार्गावर वाढत्या रहदारीचा परिणाम ही महत्त्वाची कारणे!
अलीकडच्या काळात सरोवराच्या पूर्वेकडील पाळेला भूस्खलनामुळे धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले आहे. भूस्खलन हा एक नैसर्गिक धोका असून, त्याचा पूर्वअंदाज सहजरीत्या येऊ शकत नाही. भूस्खलनाची कारणे व परिणामांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास करून प्रभावी व्यवस्थापन गरजेचे आहे.
भूस्खलनाची महत्त्वाची कारणे..
१) सरोवराच्या पूर्वेकडील पाळेला लागूनच असलेल्या शेगाव-पंढरपूर मार्गावर अवजड वाहनांच्या रहदारीमुळे निर्माण झालेल्या कंपनाने व हादऱ्याने पाळेच्या संरचनेला धक्का पोहोचला. ही कंपने व हादरे पाळेच्या खालच्या भागात प्रत्यक्ष अनुभवास येतात. या कंपनांमुळे पाळेतील दगड-माती व खडक यातील एकसंघ आकर्षण सैल झाल्यामुळे उतारावर भूस्खलन झाले. २) शेगाव-पंढरपूर मार्गावर पावसाळ्यात पडलेले पाणी उतारामुळे पाळेच्या भागात आल्यामुळे मातीत ओलावा व जमिनीची धूप झाली.३) अवकाळी अतिवृष्टीमुळे सरोवराच्या पूर्वेकडील पाळेतील सछिद्र व भेगा असलेल्या खडकांत पाणी साचले. मातीत ओलावा वाढल्यामुळे पाळेचा वरचा भाग जड व ठिसूळ होऊन भूस्खलनाचा धोका निर्माण झाला. पाण्यामुळे छिद्रीय बल निर्माण होते व जमिनीची एकसंघ आकर्षणशक्ती कमी झाल्यामुळे तो भाग कमकुवत होतो व ढासळतो. ४) पूर्वेकडील भूस्खलन झालेला भाग तीव्र उताराचा असल्याने पाण्यामुळे जमिनीची/ मातीची धूप होऊन गवत व लहान वनस्पती वाहून गेल्या. मोकळी झालेली माती पकड नसल्यामुळे ढासळली.५) पाण्यामुळे तेथील जमिनीच्या पूर्वीच्या संरचनेत व उताराच्या कोनात बदल झाला. जमिनीत पाणी मुरताना मातीकणांतील घर्षण कमी होते व छिद्रीय बल निर्माण होते. त्यामुळे जमिनीची दाब झेलण्याची क्षमता कमी होऊन भूस्खलनाचा धोका वाढतो.
परिस्थिती हाताळण्यासाठी काही उपाय
उतार भागात संरक्षक भिंती किंवा कठडे बांधणे, खडकांमध्ये मोठे बोल्ट्स ठोकून त्यांच्यामध्ये लोखंडी जाळी लावणे, उतारावर खड्डे खणून त्यामध्ये उच्च दाबाने काँक्रीट भरणे, जमिनीची धूप कमी करण्यासाठी वनीकरण व गवत वाढविणे, पर्यावरण संरक्षण कायदे व नियम यांची काटेकोरपणे अंमलबजावणी पालन करणे हेही महत्त्वाचे आहे. सरोवर पाळेचे संरक्षण व संवर्धनासाठी सॅटेलाइट इमेजिंग, जीआयएस व ड्रोन अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचाही वापर करता येईल. भूस्खलन प्रक्रियेचा अंदाज सहजरीत्या लावणे शक्य नसल्यामुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य होत नाही. त्यासाठी सूक्ष्म व्यवस्थापन व एकात्मिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. लोणार सरोवराच्या पूर्वेकडील पाळेला झालेला धोका लक्षात घेऊन सरोवराच्या इतर दिशेला असलेल्या पाळांच्या बाबत धोक्याचा अभ्यास तातडीने करणेही महत्त्वाचे आहे.
- santoshagarkar@gmail.com