वाहनांची बेसुुमार संख्या, सतत सुरू असलेली बांधकामे यातून वाढलेल्या वायुप्रदूषणामुळे मुंबईत दोन वर्षांपूर्वी १०,५०० जणांचा अकाली मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंटने काढला आहे़ गेल्या आठवड्यात राज्य शासनानेही मुंबई व नवी मुंबईतील प्रदूषण वाढल्याचे जाहीर केले आणि ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले़ मुंबईभोवतीचा प्रदूषणाचा विळखा किती घट्ट होतो आहे आणि ते किती जीवघेणे ठरू शकते, याचा अंदाज या दोन्ही वृत्तांतून येतो़ मुंबईचे प्रदूषण काही काल-परवा वाढलेले नाही़ वाढती वाहने, वेगवेगळ्या कारणांनी होणारी वृक्षतोड, सततची बांधकामे अशी अनेक कारणे त्यासाठी कारणीभूत आहेत. पण ते रोखण्याच्या उपाययोजना तोकड्या असल्याने मुंबईची परिस्थिती दिल्लीसारखी होईल, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. प्रदूषण आणि वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून ‘एक कुटुंब एक वाहन’ असा पर्याय न्यायालयाने सुचवला़, त्याला तीन वर्षे झाली़ पण सरकार त्यावर विचारच करते आहे़ ध्वनिप्रदूषणाचा मुद्दाही अशाच प्रकारे हाताबाहेर गेला. अखेर रात्री १० नंतर लाऊडस्पीकरच्या वापरावर न्यायालयाने बंदी घातल्याने, आदेश पाळले नाहीत तर पोलिसांवर कारवाई होईल, असा दम दिल्याने हळूहळू का होईना ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आले. याच धर्तीवर हवेच्या प्रदूषणावरही ठोस उपाययोजनांची गरज आहे. तोच प्रकार प्लॅस्टिकबंदीचा. सध्या मुंबईत इमारतींचीच नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यातून हवा सतत प्रदूषित होत राहते. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपुलांशेजारी भिंत उभारण्याचा पर्याय समोर आला़ अशाच प्रकारे मोठ्या प्रकल्पांशेजारी कापडी भिंतीसह अडथळे उभारले तर किती प्रदूषण रोखता येईल, याची चाचपणी व्हायला हवी़ राज्य शासनाने प्रदूषण रोखण्याचा उपाय म्हणून प्लॅस्टिकबंदी केली़ हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी अशी काही सक्ती करता येईल का, याचा विचार व्हायला हवा़ ध्वनिप्रदूषणाचे आदेश देताना न्यायालयाने मुंबईतील प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन नियम तयार करण्याचे आदेश दिले होते़ त्याच पद्धतीने हवेचे प्रदूषण कोणत्या विभागात अधिक आहे, याचा अभ्यास करून त्यावर तोडगा शोधला; तर धोक्याची ठिकाणे सहजगत्या लक्षात येतील आणि तेथे उपाययोजना करून जलदगतीने प्रदूषण रोखता येऊ शकते़ दिल्लीतील वाहनांचे प्रदूषण रोखण्यासाठी विजेवर चालणाऱ्या एक लाख वाहनांना परवानगी देण्यात आली. मुंबई परिसरातही सार्वजनिक, खासगी वाहतुकीत विजेच्या वाहनांचा वापर वाढावा म्हणून धोरणात बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हवेची गुणवत्ता मोजण्यासोबतच अशा वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करून मुंबईतील हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणायला हवे, तरच या महानगरीची घुसमट कमी होऊ शकेल.
घुसमटणारे शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 5:05 AM