द्वारकानाथ संझगिरीआयपीएलची सर्कस पाहताना माझं मन भूतकाळात जातं. मग मी आयपीएल सर्कसचा एक फ्रेंचायजी म्हणजे मालक बनतो. माझ्या मनातल्या म्युझियममधले क्रिकेटपटू तिथून बाहेर येतात. त्यांना मी तारुण्य बहाल करतो. त्यांचा एक संघ बनवतो आणि तो या सर्कसमध्ये उतरवतो. अर्थातच, माझा संघ जिंकतो. पुन्हा जेव्हा मी वर्तमानात येतो तेव्हा चरफडतो. मनाशीच म्हणतो, हे आमचे देव किती कमनशिबी. वाटत राहतं की किमान यातले काही देव तरी टी-ट्वेन्टीच्या सर्कशीत आज हवे होते. परवा शारजाहच्या स्टेडियममध्ये झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकता नाइट रायडर्स मॅचमध्ये ए.बी. डिव्हिलीयर्सला पाहताना मला त्यातल्या एका देवाची आठवण झाली.
त्याचं नाव होतं व्हिव रिचडर्स. एबीडी जे फटके मारतो, जे इंप्रोवायझेशन करतो ते जगातला दुसरा कुठलाही फलंदाज या क्षणी करू शकत नाही. विराट कोहली आज जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज असेल; पण म्हणून एबीडीचं इंप्रोवायझेशन, पहिल्या चेंडूपासूनची आक्रमकता ही त्याच्याकडे नाही. एबीडीसाठी लेंथ बॉल हा सिंहापुढे टाकलेलं कोकरू आहे. पण यॉर्कर, बाउन्सर, ऑफ स्पिन, टॉप स्पिन, लेन स्पिन वगैरे कुठलेही चेंडू तो मैदानात कुठेही फेकून देऊ शकतो असं वाटतं. त्यात शारजाहची सीमारेषा बऱ्यापैकी लहान दिसते. पण एबीडीने चेंडू थेट रस्त्यावर फेकले. मैदानावर येऊन त्याने दोन श्वास घेतले की तिसऱ्या श्वासाला त्याने चेंडू सीमारेषेबाहेर फेकलेला असतो. चेंडूचा वेगही एबीडीसाठी अडचण नाही. उलट चेंडूला सीमापार भरधाव घेऊन जाणारा तो पांढरा घोडा आहे. ज्या माणसाने काही वर्षांपूर्वी दबावाखाली डेल स्टेनच्या प्रत्येक चेंडूला मैदानाचा कोपरा फिरवून आणला त्यासाठी कमिन्स म्हणजे बिअरपुढे ताक.
एबीडीला पाहताना मला व्हिव रिचडर्सची आठवण येते. याचं कारण व्हिव रिचडर्स एबीडीपेक्षा जास्त आक्रमक होता. जास्त स्फोटक आणि जास्त गुणवानसुद्धा! तो हे सगळं करू शकला असता! ज्या काळात पुस्तकाबाहेरचे फटके कल्पनेपलीकडचे होते त्या काळात व्हिव डोळ्यांना खोटारडे ठरवणारे फटके खेळायचा. मुळात तो हेल्मेट न घालता खेळायला यायचा. गोलंदाज कितीही वेगवान असो, तो एक पाय पुढे टाकायचा आणि मग ठरवायचा काय करायचं? चेंडू कुठे मारायचा? अगदीच अशक्य झालं तरच मग चेंडू तो बचावात्मक खेळायचा.
१९७९च्या विश्वचषकाची फिल्म यू-ट्यूबवर पहा. त्यात हेंड्रीक्सचा शेवटचा चेंडू पहा. हेंड्रीक्स म्हणजे मिस्टर अचूकता. त्यावेळी इंग्लंडचा कॅप्टन होता माइक ब्रेअर्ली. तो म्हणजे क्रिकेटमधल्या डावपेचांचा अर्क. त्याला कल्पना होती की व्हिव रिचडर्स शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकणार. हेंड्रीक्सने पराकाष्ठा केली, चेंडू स्टंपवर टाकला. व्हिव रिचडर्सने काय केलं असेल? तो ऑफला गेला आणि त्याने स्क्वेअर लेगवरून सरळ षटकार ठोकला. त्या काळात तो फटका जादूगाराने हवेतून घड्याळ काढून दाखवावं तशी जादू वाटली. हेंड्रीक्सच्या अतिशय उत्तम चेंडूतून त्याने षटकार अगदी सहज काढून दाखवला.
१९८७च्या विश्वचषकात पाकिस्तानमध्ये व्हिव रिचडर्सची श्रीलंकेविरुद्धची ३१ धावांची खेळी पाहिलेली आहे. त्याने चेंडूला मैदानाचा प्रत्येक कोपरा दाखवला होता. म्हणून मला वाटतं जे आज एबीडी करतो ते व्हिव रिचडर्सने आजच्या बॅटने, आजच्या मैदानांवर, आजची गोलंदाजी, आजचे नियम पाहता करून दाखवलं असतं. सुदैव गोलंदाजांचं की व्हिव रिचडर्स आज खेळत नाही. एबीडी आणि व्हिव रिचडर्स दोघांमध्ये एक समानता आहे. दोघांचं मूलभूत तंत्र उत्तम, फटका कुठलाही इंप्रोवाईज करो, फटका मारताना त्यांचं डोकं स्थिर असतं. आणि चेंडूच्या जास्तीत जास्त जवळ असतं. मुख्य म्हणजे विशिष्ट इंप्रोवायझेशन किंवा फटका मारण्याच्या चेंडूची त्यांची निवड अत्यंत योग्य असते. व्हिव रिचडर्स कुठल्याही चेंडूला किंचित पुढे येत असे. पण त्याचबरोबर तो पूल आणि हुक शॉट अप्रतिम खेळत असे. कारण त्याचा बॅलन्स उत्तम असे. पटकन मागच्या पायावर रेलत तो फटके मारायचा. आणि ते फटके मारताना त्याचं डोकंसुद्धा स्थिर असायचं. तो जास्तीत जास्त साइड ऑन खेळायचा. दोघात फरक एवढाच आहे की मैदानाबाहेर आणि मैदानावर एबीडी बॅटची अदाकारी सोडली तर ओबामा असतो. व्हिव रिचडर्स बॅटसह मैदानावर आणि मैदानाबाहेर ट्रम्प होता! व्हिव रिचडर्सचे डोळे आग ओकायचे.
एक किस्सा सांगतो. एकदा लेन पास्कोने व्हिव रिचडर्सला एक बाउन्सर मारला. व्हिव रिचडर्सने सोडून दिला. पास्कोने व्हिवच्या समोर जाऊन व्हिवला चिडवून दाखवलं. व्हिव रिचडर्सला चिडवून दाखवणं म्हणजे सिंहाच्या आयाळीचा भांग पाडण्यासारखं! व्हिवने काय केलं असेल? तो पास्कोकडे गेला. त्याने पास्कोच्या कपाळावर क्रॉसची खूण केली. त्यानंतर पास्कोने त्याला चार बाउन्सर मारले. त्या प्रत्येक बाउन्सरला व्हिव रिचडर्सने हूक मारला आणि चौकार वसूल केला. प्रत्येक चौकारानंतर तो स्लिपमध्ये उभ्या असलेल्या डेनिस लिलीकडे जायचा आणि त्याला सांगायचा, ‘इट वॉझ बटर मॅन, इट वॉझ बटर!’
एकदा पाकिस्तानामध्ये व्हिव रिचडर्स बॅटिंगला येत होता. त्याला बॅटिंगला येताना बघून कर्णधार आणि गोलंदाज इम्रान खानला जावेद मियाँदाद म्हणाला, ‘याला पहिला चेंडू बाउन्सर मार!’ इम्रानने जावेदला शिवी घातली आणि म्हटलं, ‘त्याने मला मैदानाबाहेर फेकून दिलं तर?’- एका वेगवान गोलंदाजाला फलंदाजाची भीती होती. फलंदाजाला वेगवान गोलंदाजाची नाही. एबीडीच्या बाबतीतही ‘त्याला आल्या आल्या बाउन्सर टाकू का?’ असा जर प्रश्न कुणा कर्णधाराला विचारला तर तो वेड्यात काढेल. कारण त्याला माहितेय की पहिला बॉल असो किंवा शेवटचा एबीडी त्याला एकच उत्तर देणार : हूक षटकार!
(लेखक चित्रपट-क्रीडा समालोचक आहेत)