-संजीव साबडे (ज्येष्ठ पत्रकार)सध्या मुंबईसह अनेक शहरांत आणि राज्यांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. मुंबईत मेट्रोच्या कार शेडसाठी आरेच्या जंगलातील झाडे तोडण्यावरून मोठा गदारोळ झाला होता. निसर्गप्रेमी लोक रस्त्यावर आले होते आणि त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यात लक्ष घातले होते. गेल्या सहा वर्षांत विकासकामासाठी मुंबईतील २१ हजारांपेक्षा अधिक वृक्ष तोडण्यात आले. त्याऐवजी अन्यत्र झाले लावली तरी ती जगण्याचे प्रमाण नेहमीच कमी असते. नव्या रोपांची देखरेख न होणे हे त्याचे मुख्य कारण.
तेलंगणात गेल्या ५ वर्षांत १२ लाख १२ हजार झाडे तोडल्याचे वनविभागानेच मान्य केले आहे. हैदराबादच्या जवळ असलेल्या गच्चीबावली भागातील झाडे असलेल्या १०० एकरवर बुलडोझर चालवण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने चार दिवसांपूर्वीच संताप व्यक्त केला.
विकासकामांसाठी अशी वृक्षतोड केल्याने जंगल नष्ट होत चालले आहे आणि त्याचे चटके तर सर्वांनाच बसू लागले आहेत. जितकी झाडे तोडली जातात, त्या प्रमाणात रोपे लावली जात नाहीत आणि लावली तरी ती जगत नाहीत, हा जगभरातील अनुभव. तरीही देशातील काही व्यक्ती, संस्था आपली गावे, परिसर हिरवा ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात.
त्यात आता टाटा समूह आणि भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (बीसीसीआय) सहभागी झाले आहे, ही बाब मोठी कौतुकास्पद. सध्या देशात इंडियन प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामने सुरू आहेत आणि कोट्यवधी लोक प्रत्यक्ष वा टीव्हीवर हे सामने पाहत असतात. या निमित्ताने प्रत्येक ‘डॉट बॉल’ म्हणजेच निर्धाव चेंडूमागे यंदा देशात ५०० झाडे लावण्याचे टाटा समूहाच्या मदतीने बीसीसीआयने ठरवले आहे.
अर्थात टाटा समूह आणि बीसीसीआय यांनी गेल्यावर्षी आयपीएलमध्ये छोट्या प्रमाणात हा प्रयोग यशस्वीरीत्या राबविला. तेव्हा शेवटपर्यंत पोहोचलेल्या चार संघांत झालेल्या म्हणजे प्लेऑफच्या सामन्यातील प्रत्येक निर्धाव चेंडूमागे ५०० झाडे लावण्यात आली होती. ती संख्या होती १ लाख ६५ हजार.
यंदा तर पहिल्यापासून शेवटच्या सामान्यपर्यंत जितक्या चेंडूवर धावा होणार नाहीत, अशा प्रत्येक चेंडूमागे ५०० रोपे लावण्यात येतील. यावर्षी सुमारे १६ लाख ५० हजार झाडे बीसीसीआय व टाटा समूह मिळून लावतील, असा अंदाज आहे.
गेल्यावर्षी फक्त १ लाख ६५ हजार लावली, तर मग यंदा १६ लाख ५० हजार झाडे हा आकडा कुठून आला?- यावर्षी आयपीएलच्या १० संघांमध्ये एकूण ७४ सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक सामन्यात सरासरी ४० ते ४६ निर्धाव चेंडू पडतात, असे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. त्यामुळे ७४ सामन्यात साधारणपणे ३३०० निर्धाव चेंडू पडू शकतील, असा अंदाज आहे. या ३३०० चेंडूंना ५०० ने गुणले तर संख्या होते १६ लाख ५० हजार झाडे.
एका एकरावर सुमारे ५०० रोपे लावली जातात. याचा अर्थ ३३०० एकर जमिनीवर टाटा समूह आणि बीसीसीआयमार्फत हिरवळ निर्माण करण्याचे प्रयत्न यंदा होतील. यावर्षी महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान या तीन राज्यांत सर्वाधिक रोपे लावण्याचा या दोन्ही संस्थांचा प्रयत्न असेल.
आपला हा उपक्रम क्रिकेट पाहणाऱ्या देशभरातील लोकांच्या लक्षात यावा, यासाठी बीसीसीआयने आयपीएल सामन्यात एक अप्रत्यक्ष प्रकार केला. निर्धाव चेंडू होताच टीव्हीवर शून्यच्या ऐवजी एक हिरवे झाड दाखविले जात होते. त्यातूनच असा उपक्रम सुरू झाल्याचे उघड झाले. महिला प्रीमिअर लीगच्या बाबतीतही असे केले जाणार आहे. तिथे प्रत्येक निर्धाव चेंडूमागे ५० रोपे लावण्याचे बीसीसीआयने ठरविले आहे.
आता इतकी रोपे लावल्यानंतर ती जगवण्याची जबाबदारी कोणाची?- हे काम बीसीसीआय आणि टाटा समूहाकडून वृक्षवाढीसाठी काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांकडे सोपविण्यात येणार आहे. ते काम नीट झाले आणि कोणत्याही कामासाठी हिरव्या जमिनीवरून बुलडोझर वा कुऱ्हाड चालली नाही, तर हिरवळ थोडी तरी वाढेल. (sanjeevsabade1@gmail.com)