शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

इराणी : कहाणी राखेतून रांगोळीची

By admin | Published: April 03, 2017 12:11 AM

माहीमला नव्यानं सुरू झालेल्या इराण्याच्या निमित्तानं अधोरेखित झालंय

इराणी हा मुंबईच्या मनाचा कोपरा आहे, हेच माहीमला नव्यानं सुरू झालेल्या इराण्याच्या निमित्तानं अधोरेखित झालंय. राखेतून काढली गेलेली रांगोळीच जणू! एक बरंय की त्या कारणाने इराण्याच्या दाट पानी कम चहाची दंतकथा उकळती राहणार आहे. तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी सामूहिक उन्मादातून बाबरी मशीद पाडली गेली. त्यानंतरच्या हिंसाचार आणि सशस्त्र कारवाईने शरयू नदी लाल झाली. त्याचे पडसाद देशभरात उमटले. मुंबईही त्याला अपवाद नव्हती. त्यावेळच्या सामूहिक उन्मादाला कसलेच भान नव्हते. माणुसकीचा धर्म वेगवेगळ्या रंगांमध्ये गुंडाळून ठेवला गेला होता. त्यात मुंबईचे वैभव असलेली इराण्याची हॉटेलंही होरपळली. आखाती तेलाचा तवंग झुगारून भारतीय जीवनप्रवाहात बेमालूम मिसळलेल्या विशुद्ध इराण्याला जमावाने भयभीत केले. प्रसंगी इराण्याची हॉटेलं आगीच्या हवाली केली. खरं सांगायचं तर जिच्याविषयी अपार कृतज्ञता बाळगावी अशा इराणी नामक सामाजिक संस्थेशी आपण खूप कृतघ्नपणे वागलो. पण काळाने माणसाच्या निर्दयीपणावर मात केल्याचा एक सुखद अनुभव आता हीच मुंबई घेत आहे. पाव शतकाचे एक छोटेसे आवर्तन पूर्ण होताना मुंबईत एक नवा इराणी उभा राहिला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत मुंबईत नव्याने सुरू झालेलं इराण्याचं हे पहिलं हॉटेल.इराणी हे एका दर्जेदार कल्चरचं आरस्पानी प्रतिबिंब आहे. इराण्यांनी मुंबईकरांना फावला वेळ सस्त्यात विकला. ज्या फाटक्या इसमाला जगात कसलाही आणि कुठलाही मान नाही, त्याची इभ्रत सांभाळली. कफल्लक बेकारांना नवकोट नारायणाची ट्रीटमेंट देणारी असम दुनियेतली ही एकमेव जागा. मुंबईतल्या चार पिढ्यांची मशागत हॉस्पिटॅलिटीच्या या इराणी गालिच्यावर झाली. इराण्याची स्वत:ची मानसिकता भोगण्याची नाही. हे जग नश्वर असल्याचा भाव चेहऱ्यावर चिरंतन बाळगणारा माणूस म्हणजे इराण्याचा मालक. इराण्याच्या गल्ल्यावर लालबुंद गालांचा, टिपिकल मोठ्या नाकाचा आणि निर्विकार चेहऱ्याचा मालक ठाण मांडून असतो. मॅनेजर वगैरे नेमायचा भानगडीत इराणी कधीच पडला नाही. इराण्याचं डेकॉरही कमालीचं टिपिकल. अदृश्य दरवाजे, किमान दोन ठिकाणांहून प्रवेश. एका दारात शिसवी काउंटरचा भला थोरला गल्ला, त्यामागच्या लाकडी कपाटात काचेच्या तावदानांच्या आत मांडलेलं कन्फेक्शनरीचं प्रदर्शन. मेजाच्या चार लाकडी खुरांच्या वर संगमरवरी पाटाचं खोगीर शिवाय भोवताली झोकदार बाकाच्या साध्याच लाकडी खुर्च्या. सगळा मामला शत प्रतिशत पारदर्शक. इराण्याकडे मिळणारी सर्वात मोलाची गोष्ट कुठली, तर निवांतपणा. पंखा, पेपर, माचिस आणि पाणी ही तिथल्या ‘फुकट’च्या पुरुषार्थाची चौकट. मेन्यू काय हा तिथे गैरलागू ठरणारा प्रश्न. कारण हवीहवीशी स्पेस, निवांतपणा, आत्मपरीक्षण, मंथन असला बाबनकशी ऐवज कुठल्या मेन्यूत असूच शकत नाही. दहा-वीस पैसे खाणारा वजनाचा काटा, रफी-लता, मुकेश-मन्ना डे पासून सलीलदा-मदनमोहनपर्यंत अवीट गाणी ऐकवणारे त्याच्याकडले ज्यूक बॉक्स म्हणजे दर्द का इजहार करण्यासाठी सामान्य माणसाला मिळालेलं अनमोल साधन. अनेक वर्षे आपलं ब्रीद सांभाळणारा इराणी स्थित्यंतराच्या लाटेला पुरून उरला. गिरण्यांच्या चिमण्या शांत झाल्या आणि स्क्वेअर फुटाच्या हिशेबात विकासाचा रेटा आला. या रेट्यात अनेकजण वाहून गेले. त्यातही टिकून राहिलेल्या इराण्याला १९९२-९३ च्या दंगलीत धर्मांधतेचा खून सवार झालेल्यांनी लक्ष्य केलं. मंदिर-मशिदीच्या झगड्यात हॉटेल समजून इराणीही जाळला. प्रत्यक्षात आपण हॉटेल नाही, तर आपलं मन जाळलं होतं. या हॉटेलचा मालक अमुक नसून इराणी आहे, हे लिहिण्याची वेळ त्याच्यावर आणली होती. ते करणाऱ्यांना इराण्याचा विश्वधर्म कळलाच नाही. आर्थिक रेट्यातही गर्दीत माणूस एकटा आहे, तोवर इराणी संपणार नाही. इराणी हा मुंबईच्या मनाचा कोपरा आहे, हेच माहीमला नव्यानं सुरू झालेल्या इराण्याच्या निमित्तानं अधोरेखित झालंय. राखेतून काढली गेलेली रांगोळीच जणू! एक बरंय की त्या कारणाने इराण्याच्या दाट पानी कम चहाची दंतकथा उकळती राहणार आहे. मुख्य म्हणजे खुद्द इराणमध्ये असलं इराणी हॉटेल आहे का, याची चिकित्सा लांबणीवर पडली आहे.- चंद्रशेखर कुलकर्णी