५१ वर्षांच्या नार्जेस मोहम्मदी. इराणमधील स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध सरकारला खडे बोल सुनावणाऱ्या नार्जेस मोहम्मदी म्हणजे पेटती मशालच. इराण सरकारने त्यांना वर्षानुवर्षं तुरुंगात डांबून ठेवलं पण, तुरुंगाच्या भिंती भेदून बाहेर पडणारा मोहम्मदी यांचा इराण सरकारविरुद्धच्या निषेधाचा आवाज इराणमधील राजवट कोंडू शकली नाही. तुरुंगाच्या भिंतीआड त्यांच्या आयुष्याची ३१ वर्षं गेली. मोहम्मदी लहान होत्या तेव्हा त्यांची आई त्यांना ‘ मोठं होऊन चुकूनही राजकारणात जाऊ नकोस म्हणून बजावायची. इराणसारख्या देशात राजकीय व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्याची किंमत आपल्याला परवडण्यासारखी नाही हे सांगायची. ही भीती शेवटी खरी ठरली.
सध्या नार्जेस मोहम्मदी या देशविरोधी प्रचार केल्याच्या गुन्ह्यासाठी तेहरानमधल्या तुरुंगात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.अर्थात, तुरुंगवास आणि वेदनादायी फटके यांना घाबरून शांत बसण्याचा नार्जेस मोहम्मदी यांचा स्वभाव नाही. त्यांना १६ वर्षांची जुळी मुलं (मुलगा आणि मुलगी) आहेत, त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांना वर्षं झालं आहे. गेल्या आठ वर्षांपासून मोहम्मदी यांना आपल्या मुलांच्या डोक्यावरून साधा मायेचा हातही फिरवता आलेला नाही. मोहम्मदी यांचे ६३ वर्षांचे पती ताघी रहमानी हेदेखील लेखक आणि कार्यकर्ता आहेत. त्यांनी १४ वर्षं तुरुंगात काढली आणि आता आपल्या जुळ्या मुलांसमवेत ते फ्रान्समध्ये निर्वासित म्हणून राहात आहेत.
इराणमधल्या झांजण शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात मोहम्मदी लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे वडील खानसामे आणि शेतकरी होते तर, आई गृहिणी. १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीने इराणमधील राजेशाही उलथवून टाकली. त्यानंतर कार्यकर्ते असलेल्या त्यांच्या मामाला आणि त्यांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली. रोज कामं आवरली की मोहम्मदी यांच्या आई टीव्हीसमोर बसून देहदंड झालेल्या कैद्यांची नावं कान देऊन ऐकायची. एका दुपारी टीव्हीवर फाशी दिलेल्या कैद्यांच्या नावात दोन भाच्यांची नावं ऐकली. ती ऐकून त्यांच्या आईने शोक अनावर होऊन जमिनीवर लोळण घेतली. हे सर्व ९ वर्षांची मोहम्मदी पाहात होती. तेव्हाच छोट्याशा मोहम्मदीने इराणमधल्या या देहदंडाच्या शिक्षेविरुद्ध काम करण्याचा निर्धार केला.
आण्विक भौतिकशास्रातून पदवी मिळवलेल्या मोहम्मदी पुढे इंजिनिअर झाल्या. काॅलेजमध्ये असताना त्यांनी विद्यार्थिनींचं संघटन करून त्यांना नागरी हक्कांबाबत जागरूक केलं. काॅलेजमध्ये असतानाच इराणच्या बुद्धिवाद्यांमध्ये महत्त्वाचं नाव असलेल्या ताघी रहमानी यांच्याशी मोहम्मदी यांची ओळख झाली. रहमानी हे इराणमधील तरुणांचे गुप्त वर्ग घ्यायचे. रहमानी यांच्या वर्गाला मोहमदीही जायच्या. नंतर दोघांनी लग्न करायचं ठरवलं. लग्नानंतर ते तेहरानमध्ये राहू लागले. मोहम्मदी यांनी नागरी हक्क, स्त्रियांचे हक्क याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी एक संघटन तयार केलं. या संघटनेच्या माध्यमातून मोहम्मदी इराणमधील अल्पसंख्याकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवायच्या, देहदंडाच्या रांगेत असलेल्या कैद्यांना वाचवण्यासाठी धडपडायच्या. मोहम्मदी यांनी वर्तमानपत्रात सरकारच्या धोरणांविरुद्ध जहाल लेख लिहिले. त्याची शिक्षा म्हणून सरकारने मोहम्मदी काम करत असलेल्या कंपनीला त्यांना काढून टाकण्याचं फर्मान ठोठावलं.
इराणमधल्या न्यायालयाने मोहम्मदी यांना आतापर्यंत १३ वेळा तुरुंगवासात पाठवलं आहे. त्या एकूण ३१ वर्षे तुरुंगात राहिल्या. २०२३ मध्ये त्यांच्यावर आणखी ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या शिक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जवळपास अख्खी हयात तुरुंगात गेल्यानंतरही मोहम्मदी यांनी स्वत:मधील प्रेम,ओलावा, विरोधाची धार आणि स्वप्न सत्यात उतरण्याचा आशावाद जिवंत ठेवला आहे. तेहरानच्या इव्हिन प्रिझनमध्ये एक छोटीशी खिडकी आहे. त्या खिडकीतून त्यांना पाऊस, जंगली फुलांनी नटलेले डोंगर आणि इराणमधील क्षितिज दिसतं. हे स्वातंत्र्याचं क्षितिज आपल्याला कायम दिसत राहील, हा मोहम्मदी यांचा विश्वास आहे आणि निर्धारही.
मग जन्म का दिला?मोहम्मदी यांच्या मुलाला आपली आई जे काम करतेय त्याचा अभिमान वाटतो. पण, मुलगी कियाना मात्र आईचा सहवासच नसल्याने वैतागली आहे. तुम्हाला जर आयुष्यभर चळवळ करायची होती तर मग तुम्ही मुलांना जन्म का दिला, अशी तिची तक्रार आहे. वाढदिवस, सुट्या आणि सणाच्या दिवशी मुलांना आपल्या जवळ आपली आई नाही याचा जास्त त्रास होतो, असं ती म्हणते!